शरीरसंबंधात सहमती नसेल तर तो बलात्कार ठरतो. मात्र शरीरसंबंधाकरता सहमती कशी मिळवली जाते हा मुद्दा सुद्धा ते शरीरसंबंध बलात्कार ठरेल का नाही याकरता महत्त्वाचा आहे. विवाहाच्या वचनाने ठेवलेले शरीरसंबंध हा असाच एक संभ्रम निर्माण करणारा मुद्दा आहे. याच मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयाने नुकताच एक महत्त्वाचा निकाल दिला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या प्रकरणात आपल्याला विवाहाचे वचन देऊन आपल्याशी शरीरसंबंध ठेवल्याबद्दल तक्रारदार महिलेने बलात्काराचा गुन्हा नोंदवला होता. हा गुन्हा रद्द होण्याकरता आरोपीने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली.

सर्वोच्च न्यायालयाने-
१. आपल्याला विवाहाचे वाचन देऊन आपल्याशी ठेवलेले शरीरसंबंध ठेवल्याने तो बलात्कार ठरतो असे तक्रारदार महिलेचे मुख्य आरोप आहेत.
२. भारतीय दंडविधान कलम ९० मध्ये सहमती / संमतीबाबत तरतूद आहे आणि त्या तरतुदीनुसार गैरसमजुतीतून दिलेली संमती ही कायद्याने संमती ठरत नाही आणि आपल्याला दिलेले विवाहाचे वचन पूर्ण न झाल्याने आपण दिलेली संमती विधी अग्राह्य असल्याचे महिलेचे म्हणणे आहे.
३. उभयतांमधील शरीरसंबंध सहमतीनेच झालेले असल्याने तो बलात्कार नाही असे याचिकाकर्ता आरोपीचे म्हणणे आहे.
४. विवाहाच्या वचनाने शरीरसंबंध ठेवले या एकाच कारणास्तव असे शरीरसंबंध बलात्कार ठरत नाहीत हे आम्ही वेळोवेळी स्पष्ट केलेले आहे. ५. असे शरीरसंबंध बलात्कार ठरण्याकरता दोन महत्त्वाचे घटक उपस्थित असणे आवश्यक आहे.
६.पहिला घटक म्हणजे विवाह करायचा कोणताही विचार नसताना केवळ शरीरसंबंधांकरता सहमती मिळविण्याकरता आरोपीने विवाहाचे वचन देणे.
७. दुसरा घटक महिलेने अशा खोट्या वचनावर विश्वास ठेवून अशी सहमती देणे.
८. प्रस्तुत प्रकरणातील कागदपत्रे बघता आरोपीने दिलेले विवाहाचे वचन काही सुरुवातीपासून खोटे नव्हते आणि काही कारणास्तव ते वचन प्रत्यक्षात येऊ शकले नाही असे दिसून येते.
९. परिणामी उभयतांमधील संबंध संपले आणि प्रस्तुत गुन्हा दाखल करण्यात आला.
१०. अशा परिस्थिती अपीलार्थीला सुनावणी आणि बाकी कायदेशीर प्रक्रियेस सामोरे जायला लावणे हा कायदेशीर प्रक्रियेचा दुरुपयोगच ठरेल अशी महत्त्वाची निरीक्षणे नोंदविली आणि आरोपी विरोधात दाखल गुन्हा रद्द करण्याचा आदेश दिला.

बलात्कार हा अत्यंत गंभीर आणि घृणास्पद अपराध असला तारी हा अपराध कायद्याच्या चौकटीत सिद्ध होणे अशक्य नसले तरी कठीण नक्कीच असते. विशेषत: जेव्हा सहमतीने किंवा गैरसमजुतीखातर दिलेल्या सहमतीने शरीरसंबंध निर्माण केले जातात तेव्हा बहुतांश साहजिकपणे त्या ठिकाणी दोघेच उपस्थित असतात आणि त्यामुळेच अशा बहुतांश प्रकरणात ठोस पुरावे किंवा साक्षीदार मिळणे फार कठीण असते.

साहजिकच अशा गुन्ह्यांमध्ये निकाल हासुद्धा दाखल केलेला गुन्हा आणि त्यातील कथन, अप्रत्यक्ष आणि परिस्थितीजन्य पुरावे यावरच बहुतांश वेळेस आधारलेला असतो. त्यातही दाखल केलेला गुन्हा आणि त्यातील कथनावरून गुन्ह्याचे सगळे घटक असल्याचे निष्पन्न होत नसतील तर संपूर्ण सुनावणी अंतीसुद्धा तो गुन्हा सिद्ध होण्याची शक्यता कमीच असते, आणि जो गुन्हा सिद्ध होण्याची शक्यता कमीच आहे तो कायम ठेवण्यापेक्षा रद्द करण्याकडे न्यायव्यवस्थेचा कल अधिक असणे साहजिक आहे. म्हणूनच शक्यतो वैवाहिक नात्याबाहेर असे सहमतीने किंवा कोणत्यातरी वचनावर विसंबून शरीरसंबंध निर्माण न करणेच श्रेयस्कर.