प्रियंका वाघुले
साडे पाचचा अलार्म खणखण करू लागला.. स्मिता, आज तरी त्याच तोंड बंद ठेव न … रविवार आहे आज, राकेश कानावर उशी घेत म्हणाला. स्मिताने पटकन अलार्म बंद केला. केसांचा बुचडा बांधून उठणार तितक्यात राकेश तिच्याकडे वळून म्हणाला, अगं आज रविवार आहे. आपल्याला सुट्टीय. झोप जरा आज तरी निवांत. ती हो म्हणाली. झोपली एका कुशीवर डोळे बंद करून. राकेश ही लगेच झोपी गेला. दहा मिनिटात खाडकन उठली, अरे देवा पाणी भरायचंय. रविवार आहे तर पाणी नाही का लागत प्यायला? स्वतःशीच पुटपुटत ती किचनमध्ये आली. देवाला हात जोडले आणि चटकन पाण्याचा नळ चालू केला. एकीकडे प्यायला गरम पाणी केलं. प्यायचं पाणी भरून झाल्यावर तिनं गरम पाणी घेतलं आणि बाहेरच्या खोलीत आली. निवांत बसून पाणी प्यावं आज असा विचार करत ती समोरच्या सोफ्यावर बसली. पाण्याचा एक एक घोट पिता पिता हॉलच्या जाळ्या निरखू लागली. आज हात मारून घ्यायला हवा, स्मिता स्वतःलाच म्हणाली.
स्मिता मला अंघोळीला पाणी काढ ग. हो आई म्हणत स्मिता हातातल्या ग्लासकडे बघत राहिली. आज मी पण निवांत अंघोळ करून केसांना छान पंख्याखाली सुकू देईन… घामेजून जातात रोज पार. स्मिताचा पुढचा प्लान तयार होत होता. तितक्यात सासूबाई म्हणाल्या, अगं काढलस का पाणी? जरा कडकच तापव. पाठ चोळून दे मला आज चांगली. स्मिता हो म्हणत किचन मध्ये गेली.
आणखी वाचा : थायरॉइडसाठी उपयुक्त योगासन
सासूबाईंची पाठ चोळून अंघोळ घालून झाल्यावर स्मिता अंघोळीला गेली. तिने ही कडक पाणी घेतलं होतं. तिलाही निवांत अंघोळ करायची होती. रविवारी तर वेळ मिळतोय, सुट्टी असते न. पाच च मिनिटात राकेश चा आवाज आला , स्मिता यार याला घे जरा. एक दिवस मिळतो अगं झोपायला. त्यात ही आहेच काही न काही. आहे तेवढं पाणी अंगावर ओतून घेऊन स्मिताने आवरत घेतलं. डोक्याला पंचा गुंडाळून पारोशीच मॅक्सी पुन्हा घालून पटकन अर्णवला घ्यायला ती बेडरूममध्ये गेली. राकेशची झोपेतच चिडचिड चालू होती. ती त्याच्याकडे दुर्लक्ष करत अर्णवला शांत करत होती. दुधाची बाटली दे ग त्याला, सासूबाई म्हणाल्या. अरे देवा या रविवारच्या नादात सकाळी दूध तापवायलाच विसरले, स्मिता एकटीच पुटपुटली. अर्णवला आजीकडे देऊन ती पटकन किचन मध्ये गेली. दूध तापवून ,कोमट करून त्याची बाटली भरली. आजीच्या हातात देणार तितक्यात.. पाज त्याला पटकन भूक लागली असेल लेकराला, सासूबाई म्हणाल्या आणि कपाळावर कुंकू लावत बसल्या…
नऊ वाजायला आले होते. ती जरा कचरतच राकेश कडे गेली. उठता का आता नऊ वाजले, स्मिता म्हणाली. अगं तू ही आराम कर, रविवार आहे आज, राकेश. घरातल्या जाळ्या झटकल्या असत्या न आज जरा मी . मला थोडी मदत करा न, स्मिता म्हणली. हो दुपारी करू म्हणत राकेश ने कूस बदलली. मग आता जरा मसाल्याचे डबे धुते म्हणत स्मिता किचन मध्ये गेली. सासऱ्यांना गरम पाणी ओतून तिने किचन मध्ये हात मारायला सुरुवात केली. अगं तो मिक्सरपण पूस जरा, सासूबाई म्हणाल्या. आवरा आवर करून दुपारचं जेवण तयार झाल्यानंतर तिने राकेशला पुन्हा हॉलच्या जाळ्या काढायला मदतीसाठी विचारलं.
आळोखेपिळोखे देत, हो म्हणत तो उठला. चहा दे म्हणत तो हॉल मध्ये आला. टीव्हीचं बटन दाबून सोफ्यावर पाय वर करून रेलला. चहा पितो मग आवरू म्हणत त्याने पुन्हा एक आळस दिला. अरे आमची जेवणं सुद्धा झाली, आता कसला चहा पितोस, राकेशचे वडील म्हणाले. बाबा एक दिवस तर मिळतो आठवड्यात असा. रोज आहेच न करा अंघोळ प्या चहा, उचला बॅग,निघा ऑफिस. राकेश म्हणाला. ते ही खरंय म्हणत बाबा पेपर वाचत बसले. स्मिताने राकेशला चहा दिला आणि झाडू घेऊन तिने हॉल मध्ये झटकायला सुरुवात केली. सासरे पेपर घेऊन गॅलरीत गेले. सासूबाई अर्णवला घेऊन शेजारी गेल्या. राकेश बसल्या जागेवर पुन्हा झोपी गेला.
आणखी वाचा : शॅम्पू की शॅम्पू बार काय योग्य? महिलांनो जाणून घ्या
चार वाजायला आले. स्मिताचा कोपरा न कोपरा झाडून पुसून झाला होता. सोफ्याची बाजू सोडली तर. तेवढ्यात सासरे म्हणाले. चहा कर गं आपल्याला, दमली अशील तू पण.स्मिताने स्वच्छ हातपाय धुतले. चहा केला. राकेशला उठवलं. सासूबाईंना आवाज दिला. सगळे चहा प्यायले. अगं मला झोप कशी लागली कळलंच नाही, राकेश म्हणाला. हरकत नाही म्हणत स्मिता कपबश्या घेऊन आत गेली. चहाची भांडी विसळून संध्याकाळच्या स्वयंपाकची काही तयारी करून ती बेडरूममध्ये आली. कपड्यांची नीट घडी करत, अर्णवशी गप्पा मारत बसली.
सात वाजता देवाला दिवा लावून संध्याकाळचा स्वयंपाक करून तिने अर्णवला झोपवलं त्याची सगळी खेळणी धुवून पुसून नीट ठेवली. सगळ्यांची जेवणं आवरल्यावर किचनचा ओटा पुसून ,सगळं आवरून ती बेड वर शांत पडून राहिली. तितक्यात तिचा फोन वाजला. काय गं कसा गेला रविवार? मज्जा आहे बाबा तुम्हा ऑफिस वाल्यांची , समोरून असा आवाज आला. नेहमी सारखाच, एकदम मस्त, निवांत गेला हा ही रविवार. एक तर सुट्टी मिळते आठवड्यात. मज्जा तर करायलाच हवी न म्हणत स्मिताने फोन ठेवला, डोळे बंद केले!