अनेकानेक वर्षे महिलांना विविध प्रकारच्या बंधनात जखडून ठेवण्यात आलेले आहे. या बंधनांमध्ये सामाजिक बंधने, वावरण्यावर बंधने एवढेच कशाला पेहरावाची आणि पोषाखाचीसुद्धा बंधने घालण्यात आली होती. बदलत्या काळासोबत यातील काही बंधने गळून पडलेली असली तरीसुद्धा पूर्णपणे नाहिशी झालेली नाहीत. स्त्रियांनी चेहरा झाकणे, घुंघट, पडदा इत्यादी घेणे ही प्रथा आजही अनेक ठिकाणी प्रचलित आहे. चेहरा न झाकणे, घुंघट वा पडदा न घेता सार्वजनिक ठिकाणी वावरणे ही पतीप्रती क्रूरता ठरून त्या कारणास्तव घटस्फोट मिळू शकेल का? हा महत्त्वाचा प्रश्न अलाहाबाद उच्च न्यायालयात पोचला होता.
या प्रकरणात पतीने दीर्घकाळ एकत्र न राहणे आणि क्रूरता या कारणास्तव घटस्फोट मिळण्याकरता याचिका केली होती. पतीची याचिका कौटुंबिक न्यायालयाने फेटाळली आणि त्याविरोधात उच्च न्यायालयात दाद मागण्यात आली.
आणखी वाचा-पुनर्विवाहित विधवेसही वारसाहक्क!
उच्च न्यायालयाने-
१. पतीने दीर्घकाळ एकत्र न राहणे आणि क्रुरतेच्या कारणास्तव घटस्फोटाची मागणी केलेली आहे.
२. पत्नी मुक्त विचारांची व्यक्ती आहे आणि बाजारात आणि इतरत्र सार्वजनिक ठिकाणी ती पडद्याशिवाय वावरते याच्याशिवाय क्रुरतेबद्दल पतीच्या याचिकेत काहीही कथन नाही.
३. सध्याच्या काळात पत्नीच्या या वर्तनाला क्रूरता कसे म्हणता येऊ शकेल? हा प्रश्नच आहे.
४. पती अभियंता तर पत्नी सरकारी शिक्षिका आहे उभयता उच्चशिक्षित आहेत आणि नोकरी करत आहेत.
५. एखाद्याच्या वर्तनाकडे बघण्याचा प्रत्येकाचा दृष्टिकोन भिन्न असू शकतो आणि अशा भिन्न दृष्टिकोनामुळे एखादे कृत्य एखाद्याला क्रूरता वाटेल तर दुसर्याला वाटणार नाही.
६. पत्नी मुक्त विचारांची असणे आणि तिने बाजारात आणि इतरत्र सार्वजनिक ठिकाणी पडद्याशिवाय वावरणे याला क्रूरता म्हणता येणार नाही.
७. उभयता पती पत्नी दीर्घकाळ एकत्र राहत नाहीत हे वास्तव आहे आणि पत्नीला पतीसोबत राहायची इच्छादेखिल नाही.
८. पत्नीला पतीसोबत राहायचे नाही आणि तिने तसा एकत्र राहण्याचा कधी प्रयत्न देखिल केला नाही,
९. साहजिकच या प्रकरणात क्रुरतेचा विचार करता त्याची व्याप्ती दीर्घकाळ स्वतंत्र राहण्यापर्यंतच मर्यादित राहिल अशी महत्त्वाची निरीक्षणे नोंदविली आणि याचिका मान्य करून घटस्फोटाची मागणी मान्य केली.
वैवाहिक वादाचा विचार करताना पती आणि पत्नी उभयतांच्या बाजूचा समतोलपणे विचार करून देण्यात आलेला म्हणून हा निकाल निश्चितच महत्त्वाचा आहे.
आणखी वाचा-कोनेरू हम्पी… जलद बुद्धिबळाची विश्वसम्राज्ञी
काळ बदलला असे आपण कितीही म्हणत असलो तरी अजूनही स्त्रियांनी काही नियम आणि बंधने पाळावीत, विशेषत: सार्वजनिक ठिकाणी वावरताना पोषाखाची काही बंधने पाळावीत ही अपेक्षा उच्चशिक्षित वर्गामध्येसुद्धा असल्याचे अधोरेखित करणारा म्हणूनही हा निकाल महत्त्वाचा ठरतो. त्याचबरोबर एकत्र राहत नसलेल्या आणि राहण्याची इच्छा नसलेल्या जोडीदारांचा विवाह कायम ठेवण्यापेक्षा घटस्फोट मंजूर करण्याचा सुज्ञपणा दाखवणारा म्हणूनही हा निकाल महत्त्वाचा आहे.
शिक्षणाने समाज आणि लोक बदलतात हे गृहितक किती खोटे आणि वरवरचे आहे हे अशा प्रकरणांनी लक्षात येते. शिक्षणाने समाजात काही बदल होत असले तरी सगळ्यांमध्ये मूलभूत बदल होतातच असे नाही, काही लोक उच्चशिक्षण घेऊनही आपल्या जुन्या बुसरटलेल्या विचारसरणीलाच चिकटून राहतात आणि तसेच वर्तन इतरांनी करावे अशी अपेक्षाही करतात हे आपले सध्याचे कटू सामाजिक वास्तव आहे. स्वेच्छेने कोणाला एखादी घुंघट किंवा पडद्यासारखी प्रथा पाळावीशी वाटत असेल तर ते स्वातंत्र्य आहेच, मात्र त्याची बळजबरी करता येणार नाही किंवा तसे न केल्यास त्याला क्रुरता ठरविता येणार नाही हे या निकालाचे सर्वात महत्त्वाचे फलित आहे.