How Much Sex Do We Need: अनेक गुन्ह्यांच्या मागे एक सुप्त लैंगिक असमाधान असल्याचे अनेक अभ्यासात समोर आले आहे. लैंगिक शिक्षणाच्या अभाव हे यामागील मुख्य कारण असू शकते. म्हणूनच एक पत्रकार म्हणून लोकांच्या मनातल्या प्रश्नांना आपण वाचा फोडायला हवी हे लक्षात घेऊन सेक्सॉलॉजिस्ट डॉ. राजन भोसले यांच्याशी संवाद साधला. माझे प्रश्न साधे होते, महिलांना किती सेक्सची गरज असते? किती सेक्स हा खूप सेक्स असतो? मला आधी वाटलं की एवढा वेगळा विषय घेतला म्हणून डॉक्टर कौतुक करतील पण माझा प्रश्न ऐकून डॉक्टर आधी हसले, हा काय वेडपट प्रश्न आहे म्हणाले आणि मग तासभर चर्चेतून समोर आलं जगभरातील महिलांच्या प्रश्नाचं एक क्रांतिकारी उत्तर..

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तुम्ही जेव्हा जेवायला बसता तेव्हा तुम्ही किती पोळ्या खायला हव्यात? त्यासाठी तुम्ही कुठली नियमावली तपासून बघता की तुमचं मन आणि पोट जो कौल देतो ते ऐकता? अर्थात नंतरचा पर्याय अधिक जवळचा आणि सहज वाटतो, हो ना? हाच नियम आणि हाच पर्याय तुमच्या सेक्स लाइफला सुद्धा लागू होता. व्यक्ती तशा वल्ली, व्यक्ती तशा गरजा.. ज्या महिलेला महिन्यात जितक्यांदा सेक्स करावासा वाटेल तितकी तिची गरज असते.

वयानुसार महिलांना किती Sex ची गरज असते?

अनेकदा सेक्सची इच्छा ही वयानुसार ठरवली जाते. पण यात काहीच तथ्य नाही. डॉ. भोसले म्हणतात वयस्कर महिला ज्या मेनोपॉजच्या टप्प्यावर आहेत त्यांनी आता संन्यास घ्यावा असा एक समज असतो. पण अशाही महिला आहेत ज्यांना मेनोपॉज नंतर सेक्सची अधिक इच्छा असते. याची विविध कारणे आहेत. काहींना तारुण्यात आपल्या जोडीदारासह तितका सहवास लाभलेला नसतो, जबाबदाऱ्यांचं ओझं, दडपण, मनातील भीती यामुळे शरीर संबंध जरी ठेवले गेले तरी सुख अनुभवता आलेलं नसतं. काहींना गरोदर होण्याची इच्छा नसते म्हणूनही त्यांना मनसोक्त आनंद उपभोगता येत नाही. या सर्व चिंता मेनोपॉजनंतर काही अंशी दूर होतात, नात्यात जवळीक व विश्वास वाढलेला असतो अशावेळी सेक्श्युअल हार्मोन्स अधिक ऍक्टिव्ह होऊ शकतात, हे नॉर्मल आहे!

तर याच्या अगदी विरुद्ध काही महिलांना चाळिशीपासूनच इच्छा कमी होत असल्याचं जाणवतं, नैसर्गिकरित्या योनी कोरडी होणे हे याचं मुख्य कारण असतं आणि हे ही अगदी नॉर्मल आहे. वयाच्या विशीत व तिशीत असणाऱ्या तरुणींनी आपल्या इच्छेनुसार व आपल्या सेक्श्युअल जोडीदाराच्या इच्छेनुसार महिन्यात किती वेळा संबंध ठेवायचे हे ठरवायचे असते, यासाठी मनाचा नियम ऐकावा. तुम्हाला वाटलं महिन्यात दोन वेळा हवं, तर नॉर्मल आहे आहे आणि तुम्हाला वाटलं दिवसात दोन वेळा तरी नॉर्मल आहे.

सेक्स: किती जास्त म्हणजे खूप जास्त?

शरीरसंबंधांच्या बाबत आणखी एक प्रश्न म्हणजे खूप सेक्स केल्याने काय नुकसान होतं? किती जास्त म्हणजे खूप जास्त? यावर डॉ. भोसले सांगतात की, तुम्ही श्वास घेता, तुमचं हृदय धडधडतं, तुमची पचनप्रक्रिया सदैव सुरु असते, किडनी, मेंदू, डोळे सगळं काही तुमच्या वयाच्या प्रत्येक टप्प्यात २४X७ सुरु असतं. ज्याप्रमाणे तुमच्या अन्य अवयवांना अधिक वापरल्याने कार्यक्षमता कमी होत नाही तोच नियम जनेंद्रियांचा सुद्धा आहे.

हे ही वाचा<< अगं उर्मिला, किती खरं बोललीस!

तुम्हाला ज्या क्षणी कामात लक्ष न लागणे, डोक्यात सतत सेक्सचाच विचार येणे आणि परिणामी तुमचं मन विचलित होणे अशी लक्षणे दिसतील तेव्हा ती परिस्थिती Too Much Sex चा प्रभाव आहे. अन्यथा सुरक्षित सेक्स केल्याने शरीरासाठी धोका उद्भवण्याचा टक्का नगण्य आहे.

यामुळे वरील सर्व प्रश्नांचं उत्तर एकच.. तुमचं मन हेच तुमच्या गरजेची नियमावली!

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How much sex do we need as per age expert doctor says how many times make physical relations in a month svs