नीलिमा किराणे
आजही पृथाचं फोनवर अमितशी जोरदार भांडण झालं. पृथा ‘पॉलिमर सायन्स’मधली डॉक्टरेट, प्राध्यापक, तर अमित पॉलिमर प्रॉडक्ट बनवणाऱ्या कंपनीमध्ये मार्केटिंग मॅनेजर होता. याच विषयावरच्या एका सेमिनारमध्ये त्यांची ओळख झाली होती. आवडीच्या विषयांवर चर्चा, देवाणघेवाण, विचार जुळण्यापासून एकमेकांना जोडीदार म्हणून स्वीकारण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास खूप आनंदाचा होता. परस्परांची ओढ इतकी होती, की अमितची पूर्वी झालेली पोटाची एक शस्त्रक्रिया, त्यात झालेल्या गुंतागुंतीमुळे कायमस्वरूपी घ्यावी लागणारी औषधं, याबद्दल पृथाला त्यानं कल्पना दिल्यावर तिनं तेही सहज स्वीकारलं होतं. अमितचा शांत स्वभाव आणि पृथाचा सडेतोडपणा जोडी म्हणून परस्परपूरक आहे असं दोघांचंही मत होतं.
या रिलेशनशिपबद्दल सांगितल्यानंतर पृथाच्या घरच्यांनी लग्नाची घाई सुरू केली. त्यांच्या आग्रहामुळे वर्षभरापूर्वी लग्नाची बैठक झाली, साधारण तारीखही ठरली, पण लग्न कुठे करायचं? यावरून वाद झाले, वाढले आणि काहीच न ठरता बैठक उठली. त्यानंतर दोन्ही कुटुंबं नाराज झाली. सगळंच बदललं. दोघांच्याही घरच्यांनी त्यांना, ‘तुमचं कसं पटणार नाही’ हे पटवायला सुरुवात केली. ‘लॉन्ग डिस्टन्स रिलेशनशि” असल्यामुळे फोनवर भांडणं व्हायला लागली. चांगला संवाद सुरू असला, तरी लग्नाचा विषय निघाल्यावर सगळं बिनसायचं. आपापल्या घरच्यांच्या अपेक्षा, मानसन्मान मध्ये यायचे. ‘त्या दिवशी तुझ्या घरचे अमुक-तमुकच बोलले’ यावरून भांडणं व्हायची. एकमेकांना दोष देऊन फोन संपायचा. गेलं वर्षभर हेच चालू होतं.
अशाच एका जोरदार भांडणानंतर, ‘‘तू अत्यंत आक्रस्ताळी, हट्टी आहेस. माझ्या घरच्यांना मानत नाहीस. त्यामुळे आपलं पटणं शक्यच नाही.’’ वगैरे बोलून अमितनं नातं संपवलं. पृथाला चांगलाच धक्का बसला. मैत्रीण ईशाजवळ मन मोकळं करत पृथा उदासपणे म्हणाली,
“गेलं वर्षभर लग्नाचा विषय निघाला, की आमचं भांडण ठरलेलंच होतं. बैठकीच्या त्या एका दिवसामुळे सगळं इतकं बदललं? अमितला माझ्या सोबतीची गरजच वाटत नाही? कुठे गेलं तेव्हाचं प्रेम? सगळा दोष आमच्यावर टाकून नातं संपवून टाकलं त्यानं. आम्हीच कसे जबाबदार? त्यांचं काहीच चुकलं नाही?”
“तुला त्रास कशाचा होतोय पृथा? लग्न मोडल्याचा की त्याच्या आरोपांचा?” ईशानं विचारलं.
“माहीत नाही. भांडणं झाली, तरी नातं संपवावं असं मला कधीच वाटलं नव्हतं. त्याचं पोटाचं कायमचं दुखणंसुद्धा मी आनंदानं स्वीकारलं होतं. खूप छान होतं गं आमचं! त्याचा असा चवताळलेला अवतार मी पूर्वी कधीच पाहिला नव्हता.”
“तुझा भांडकुदळ अवतार त्यालाही अनोळखीच असेल. त्यामुळे घरचे म्हणताहेत तसं आपलं पटलंच नाही तर? अशी भीती वाटलीही असेल त्याला. तुमच्या घरच्यांच्या अपेक्षा, मानपान इतके महत्त्वाचे होतील असं दोघांनाही आधी कुठे माहीत होतं? त्यात भरीला अमितची कायमस्वरूपी पोटदुखी ही उद्या गंभीर समस्या होऊ शकेल अशीही भीती वाटली असेल. लग्न टाळण्यामागचं तेही एक छुपं कारण असू शकतं.”
“असेलही, पण संताप होतो. त्याला हडसून खडसून जाब विचारावासा वाटतो.”
“मला वाटतं, तुझ्यावर दोष टाकून त्यानं रिजेक्ट केलंय, हे झेपत नाहीये तुला. शिवाय आपणही जरा जास्तच सडेतोडपणे भांडून त्याला दुखावलं असं अपराधी वाटत असेल. पण मला सांग, जाब विचारल्यामुळे काय होईल? ‘लग्न कुठे करायचं?’ यावरून वर्षभर भांडत होतात, आता ‘कुणाचं चुकलं?’ म्हणून भांडणार. घरच्या विरोधाला तुमचं प्रेम पुरून उरत नाहीये हे तर खरं ना?”
“मला खूप भकास वाटतंय गं! दोघांनी पाहिलेली स्वप्नं संपली. आता पुढे काय?”
“समजा, अमित आयुष्यात आलाच नसता, तर तू काय केलं असतंस?” ईशाच्या प्रश्नावर पृथा विचारात पडली.
“पोस्ट डॉक्टरल रिसर्च. परदेशी स्कॉलरशिप शोधली असती.”
“मग ती शोधायला सुरुवात करायची, की अजूनही रडत-चिडत राहायचं? एवढंच आज ठरव. त्यानंतर जेव्हा एखादी स्कॉलरशिप मिळेल किंवा अमितला तुझी किंमत समजून तो परत येईल किंवा तुला दुसरं कोणीतरी आवडेल, तेव्हा तुझ्या हातात खरा चॉइस असेल!” ईशा हसत म्हणाली. नव्या शक्यतांच्या कल्पनेनंच पृथाचे डोळे चमकले.
(लेखिका रिलेशनल कौन्सिलर आहेत)
neelima.kirane1@gmail.com