आराधना जोशी 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘चंदा है तू, मेरा सूरज है तू’ किंवा ‘मेरे घर आयी एक नन्ही परी’ असं म्हणत बाळावर कोडकौतुकाचा वर्षाव करणाऱ्या आईला नोकरीवर परत रुजू होताना मोठा प्रश्न असतो, तो म्हणजे कामावर जाताना बाळाला कोणाकडे सोपवायचं? हल्ली आजीसुद्धा नोकरी करणारी असेल किंवा फॅमिली न्यूट्रल असेल तर, पाळणाघर म्हणजेच डे केअरचा पर्याय निवडावा लागतो. आपल्या फॅमिलीतला सगळ्यात लहान तरीही महत्त्वाचा घटक काही तास तरी जिथे राहणार आहे, त्या ठिकाणाची निवड आपण काळजीपूर्वक करतो का? किंवा डे केअरची निवड करताना कोणते मुद्दे महत्त्वाचे असतात? याचा विचार होणं खूप गरजेचं आहे.

डे केअरचे ठिकाण

तुमचे घर आणि डे केअर यांच्यात फार अंतर नको. अगदी ऑफिसला जाता-येता सहजपणे तुम्ही बाळाला सोडू शकाल आणि येताना घेऊन येऊ शकाल, अशा अंतरावर असणारे डे केअर सोईचे पडते. शिवाय, काही इमर्जन्सी आलीच तर, आजी किंवा आजोबा बाळाला सोडणे किंवा घरी आणणे हे काम करू शकतील.

डे केअरमधील सोयीसुविधा

स्वच्छ, नीटनेटके असणारे डे केअर कधीही निवडावे. याशिवाय, तिथे बाळाच्या सर्वांगिण विकासासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी किंवा उपक्रम, खेळणी, तिथे उपलब्ध असणारं मनुष्यबळ, डे केअरमध्ये एकंदर किती मुलं येतात आणि त्यांच्याकडे वैयक्तिकरित्या किती लक्ष दिलं जातं, तिथली सुरक्षाव्यवस्था, मुलांना वावरायला तिथे उपलब्ध जागा किती आहे? हवा-उजेड कसा आहे? खिडक्यांना ग्रिल्स तसंच सेफ्टी डोअर आहेत का? आपत्कालीन परिस्थितीत वैद्यकीय सुविधा जवळपास उपलब्ध आहेत का? याचा विचार करावा. घरगुती स्वरूपात जर डे केअर असेल तर, मुलांना सांभाळणं म्हणजे टीव्हीवर कार्टून फिल्म वा तत्सम कार्यक्रम सुरू ठेवणं, असा तर प्रकार होत नाही नं? ही तपासणीही करावी. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, मुंबईसारख्या ठिकाणी जिथे आई-वडील ट्रेनचा प्रवास करतात, समजा काही इमर्जन्सी उद्भवली, ट्रेन्स बंद झाल्या तर, पालक येईपर्यंत या मुलांची तिथे व्यवस्थित काळजी घेतली जाईल, याचीही खातरजमा करून घ्यावी.

हेही वाचा >> आज खाऊच्या डब्यात काय देऊ? आईला सतत पडणाऱ्या प्रश्नाचं उत्तर कसं शोधायचं?

मुलांचा मानसिक आणि सामाजिक विकास

मुलांच्या मानसिक आणि सामाजिक विकासासाठी डे केअरमध्ये उपलब्ध असणाऱ्या सुविधा खूप गरजेच्या असतात. आपल्या घरापासून, आई-बाबांपासून काही काळ दूर राहणाऱ्या या मुलांना एकटं वाटू नये किंवा आपण त्यांचे लाडके नाही म्हणूनच आपल्याला इथे ठेवतात, असा विचार करणाऱ्या मुलांच्या मानसिकतेचा विचार करून, त्यांना समजून घेऊन डे केअरमध्ये रमवता येणारा कर्मचारीवर्ग खूप मोठी जबाबदारी पार पाडत असतात. तशी जबाबदारी नीट पार पाडली जात आहे का किंवा आपलं मूल सगळ्यांमध्ये मिळून-मिसळून राहावं, सामाजिक जबाबदारीचं भान त्याच्यात निर्माण व्हावं यासाठी डे केअरचा कर्मचारी वर्ग किती सक्षम आहे, याचाही अंदाज पालकांना असावा.

जेवणाची आणि झोपण्याची सोय

ज्या डे केअरमध्ये तुम्ही बाळाला किंवा आपल्या मुलांना ठेवणार आहात, तिथे जेवणाची सोय आहे का? ती कशी आहे? ताजे, स्वच्छतेचे नियम पाळून जेवण तयार केलं जातं का? जेवणाची सोय जर तिथे नसेल तर, पालकांनी टिफिन देणं अपेक्षित आहे का? एखाद्या दिवशी टिफिन द्यायला जमत नसेल तर, दुसरा काही पर्याय डे केअरमध्ये किंवा जवळपास उपलब्ध होईल का? या गोष्टी तपासणे उत्तम. जेवणाबरोबरच दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे झोप. खुद्द राज्यपाल रमेश बैस यांनी लहान मुलांच्या झोपेबद्दल चिंता व्यक्त केली होती. त्यांची झोप पूर्ण होणे आवश्यक असण्यावर त्यांनी भर दिला होता. याच अनुषंगाने दुपारी किती वेळ मुलांना झोपण्यासाठी दिला जातो? त्यासाठी लागणाऱ्या गोष्टी म्हणजे अंथरुण, पांघरुण प्रत्येक मुलाने घरून आणून तिथे ठेवायचं की, डे केअरमधून ही सोय केली जाते? या गोष्टी कितीवेळा धुतल्या जातात? त्यांची स्वच्छता कशी केली जाते? हे प्रश्न पालकांनी विचारायला हवेत.

कर्मचारीवर्ग

डे केअर लहान असो किंवा मोठं, मुलं कमी असो किंवा जास्त, वेगवेगळ्या वयोगटातल्या मुलांना सांभाळणारा कर्मचारीवर्ग प्रशिक्षित, योग्य वर्तन असणारा, निर्व्यसनी, मुलांची आवड असणारा हवा. आपलं मूल ज्यांच्यावर आपण सोपवून जाणार ते ही जबाबदारी कशी पार पाडतात? आपल्या मुलाला तिथे राहायला आवडतंय का? एखादा कर्मचारी मुलांवर घरातला राग तर काढत नाही नं? या गोष्टींचाही विचार करणे आवश्यक असते. घरगुती डे केअरमध्ये मूल जात असेल तर घरातल्या इतरांकडून घरगुती हिंसाचार किंवा लैंगिक शोषणासारखे प्रकार तर होत नाहीत ना, हे सतत तपासून बघितलं पाहिजे.

हेही वाचा >> मुलांना घडवताना पालकांनी ‘या’ गोष्टींची काळजी घेतलीच पाहिजे

दैनंदिन शेड्यूल

प्रत्येक डे केअरचं स्वतःचं एक दैनंदिन शेड्यूल असतं, जे मुलांच्या शाळेच्या, क्लासच्या वेळांनुसार बनवलेलं असतं. पालक म्हणून आपल्याला त्याची माहिती असायला हवी. जेवणाच्या वेळा, दुपारी झोपण्याची वेळ, शाळेचा अभ्यास पूर्ण करण्याची वेळ अनेकदा डे केअरमध्ये ठरलेल्या असतात. पालकांनीही शक्य ते शेड्यूल पाळण्याचा प्रयत्न करावा. मुलांना या शेड्यूलची लवकर सवय होते, पण पालकांना नाही. जर एखाद्या दिवशी उशीर होणार असेल किंवा शाळेत काही कार्यक्रम असल्याने डे केअरमधून मुलांना लवकर आणायचं असेल तर, तशी पूर्वकल्पना पालकांनी तिथल्या स्टाफला देऊन ठेवावी.

डे केअरचा खर्च

डे केअरमध्ये मिळणाऱ्या सुविधा आणि त्यासाठी लागणारा खर्च यांचा ताळमेळ नीट बसतोय का? याचाही विचार पालकांनी करावा.
डे केअर ही मुलांची दुसरी शाळाच असते. इतर मुलांमध्ये राहून हळूहळू आपलंही मूल समाजात कसं वागायचं, मिळून-मिसळून कसं राहायचं? कसं बोलायचं? हे शिकत असतं. अर्थात, अनेकदा ओल्याबरोबर सुकंही जळतं तसं चांगल्या गोष्टींबरोबर वाईट गोष्टीही मुलं शिकू शकतात. वर सांगितलेल्या सगळ्याच मुद्द्यांनुसार चालवली जाणारी डे केअर सेंटर्स किंवा पाळणाघरं आपल्या जवळपास कदाचित नसतील; पण सुरक्षा, स्वच्छता आणि योग्य वातावरण हे मुद्दे लक्षात घेऊन तरी योग्य डे केअर किंवा पाळणाघराची निवड करावी.

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How to choose a baby sitting for a baby what are the serveices provided baby sitting sgk
Show comments