डॉ. संजय जानवळे

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जन्माच्या वेळी बाळाच्या शरीराची बांधणी जवळजवळ पूर्ण झालेली असते, पण मेदूंचा विकास मात्र वयाच्या विशीपर्यंत चालूच राहतो. २ ते ७ वर्षे या वयोगटात तो सर्वांत जास्त होत असतो. मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि वाढीसाठी त्यांचा योग्य आहार, संसर्गजन्य आजारांपासून त्यांचा बचाव, व्यायाम याबाबत पालकांनी जागरुक असायला हवं. कारण या काळात होणाऱ्या कुपोषणाचा, रक्तक्षयाचा अनिष्ट परिणाम थेट मुलांच्या मेंदूच्या विकासावर होत असतो.

आर्थिक ऐपत चांगली असलेल्या कुटुंबातील मुलंही कुपोषित असू शकतात. जर मुलांचं वजन वाढत नसेल, तर त्याच्या कुपोषणाचं कारण त्याला असलेला एखादा आजार असू शकतो. उदा. मलेरिया, मूत्रमार्गाचा जंतूसंसर्ग, न्युमोनिया, अतिसार, क्षयरोग, मूत्रपिंडाचे आजार, हृदयाचे आजार वगैरे. मूल जर नेहमी आजारी पडत असेल आणि त्या आजाराचं नेमकं निदान होत नसेल, तर कदाचित त्याच्या वाढीसाठी आवश्यक असलेल्या कॅलरीज (उष्मांक) आणि प्रथिनं त्याला रोजच्या आहारातून मिळत नसतील. म्हणजेच त्याचं खाणं खूप कमी असेल.

हेही वाचा… डेटिंग अ‍ॅपवरील ओळख म्हणजे लग्नाचे वचन नव्हे! दिल्ली उच्च न्यायालयाचे निरीक्षण

कुपोषणाचं कारण जर एखादा आजार असेल, तर त्यावर नीट इलाज करणं हे क्रमप्राप्त ठरतं. जगातली एक तृतीयांश कुपोषित बालकं भारतात आहेत. मूल जर कुपोषित असेल तर त्याची शैक्षणिक प्रगती, शारीरिक विकास होत नाही. त्याची कार्यक्षमताही कमी होते. बालपणीच्या कुपोषणाचे परिणाम त्याच्या बालावस्थेत, किशोरावस्थेत आणि प्रौढावस्थेतही दिसून येतात. कुपोषित मुलं नेहमी आजारी पडतात.

रक्तक्षय

लोह, ‘ब’ जीवनसत्व आणि फाॅलिक ॲसिडच्या कमतरतेमुळे होणाऱ्या रक्तक्षयाचे लहान मुलामध्ये प्रमाण प्रचंड आहे. मूल लवकर दमतं, त्याचं लक्ष लागत नाही, भूक कमी होते. अशी मुलं माती खाताना दिसतात. गंभीर रक्तक्षय असणाऱ्या मुलांमध्ये पायांवर सूज येते, धाप लागायला सुरुवात होते. रक्तक्षयाची शिकार झालेली मुलं नेहमी आजारी पडतात. गैरहजर असणाऱ्या मुलांत शाळेत न जाण्याचं एक कारण म्हणजे रक्तक्षय हे आहे. त्याला वारंवार होणारे आजार, त्याला वयानुसार हवा असलेला आहार अन् प्रत्यक्षात सेवन करीत असलेला आहार, शौचावाटे होणारा रक्तस्राव, वरचेवर अतिसार, जंत होणं, या सर्व बाबींचा विचार करावा लागतो.

रक्तक्षय असलेल्या मुलांना डाॅक्टरांच्या सल्ल्यानुसार इलाज करावे लागतात. ॲनिमिया न होण्यासाठी लोहयुक्त पदार्थाचा आहारात समावेश करणं अत्यंत गरजेचं आहे. रक्तक्षयावर उपचार करण्याची वेळ येण्यापेक्षा विकार होऊच नये म्हणून प्रतिबंधक उपाय करणं खूप सोपं आहे. लोहयुक्त औषधं किंवा अन्नपदार्थ भरपूर प्रमाणात घेतल्यास दीर्घकाळ ॲनिमिया होत नाही. आहारात हिरव्या पालेभाज्या, पालक, खजूर, गूळ, अंड्याचा पिवळा बलक, लिव्हर (कलेजी) यांचा समावेश करावा. मांसाहारी पदार्थ, मनुका, यांत लोहाचं प्रमाण जास्त असतं. लोखंडाच्या कढईत अन्न शिजवल्यास त्यातलं लोहाचं प्रमाण वाढतं. गहू, गव्हाचे पदार्थ, हातसडीचे तांदुळ, कोबी, गाजर, टोमॅटो, सफरचंद, द्राक्षं, चेरी, मध, काकडी यांत भरपूर प्रमाणात लोह मिळतं.

मुलांच्या आहारविहारावर लहान वयापासून लक्ष ठेवणं पालक म्हणून आपली जबाबदारी आहे. ते योग्य रीतीनं झालं, तर मुलांना कुपोषण होणं, ॲनिमिया होणं टाळता येईल आणि अर्थातच त्यांची तब्येत चांगली राहण्यास त्यामुळे मदत होईल.

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How to maintain the fitness of children to avoid malnutrition and anemia dvr