प्रिया भिडे

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बाजारामध्ये श्रावण घेवडा जवळजवळ वर्षभर मिळत असला तरी श्रावणात तो जास्त चविष्ट लागतो. घेवड्याच्या वेगवेगळ्या जाती आहेत. त्यातल्या काही झुडपांएवढ्या म्हणजे २० सें.मी. ते ६० सें.मी. पर्यंत उंच वाढतात, तर काही वेलीसारख्या पसरत २ ते ३ मीटपर्यंत उंच होतात. कुंडीमध्ये आणि परसबागेमध्ये हे दोन्ही प्रकार चांगले वाढतात. शेंगा भरपूर येण्यासाठी बी मातीत पेरण्यापासूनच काळजी घ्या.

घेवड्याच्या बियांचं टरफल थोडं टणक आणि कडक असतं. त्यामुळे ते पेरण्याअगोदर रात्रभर पाण्यात भिजत टाका, म्हणजे टरफल थोडं मऊ होईल आणि बी लवकर रुजेल. सकाळी पाणी काढून बिया थोडा वेळ निथळत ठेवा. बिया फार कोरड्या होऊ देऊ नका. बिया ओलपट असतानाच एका बाटलीत टाका. त्यात रायझोबियम हे जैविक खत टाका. तीस बियांना एक चमचा ‘रायझोबियम्’ पुरेसं होतं. हे खत बी-बियाणांच्या दुकानात विकत मिळतं! जीवाणू (बॅक्टेरिया) पासून हे खत तयार करतात. हे जीवाणू रोपांच्या, झाडांच्या मुळांवर गाठीच्या रुपात वाढतात. ते जमिनीतला नत्र (नायट्रोजन) शोषून घेऊन झाडांना- मुळांना देतात. त्यामुळे रोपं, झाडं जोमाने वाढतात. हे खत बिया असलेल्या बाटलीत टाकले की बाटली चांगली हलवा, म्हणजे ते खत बियांच्या बाहेरच्या आवरणाला चिकटून बसेल. रायझोबियमने बी पूर्ण काळी करू नका. थोडेसे खतही रोपं वाढण्यासाठी उपयोगी पडतं! बी मोठ्या कुंडीत पेरा, कारण त्यांची मुळं खूप वाढतात. गादी वाफ्यावर बी पेरण्याअगोदर वाफ्यात लाकडी पट्टीने किंवा काठीने ओळी आखून घ्या. दोन ओळीतलं अंतर ३-४ इंच ठेवा. प्रत्येक ओळीवर दोन-तीन इंचांवर बोटाने किंवा काठीने बोटाच्या पेराऐवढी खोल छिद्र करा. कुंडीत मध्यभागी एक आणि त्याच्या चार दिशांना एक एक अशी चार छिद्र पाडून त्यात ‘रायझोबियम’चे कोटिंग असलेलं बी पेरा. एका ठिकाणी दोन दोन बिया पेरा. त्या उगवल्यानंतर जे सशक्त रोप असेल तेच ठेवा आणि बाकीची रोपं काढून दुसऱ्या पिशवीत/ कुंडीत लावा. घेवड्याचं खोड नाजूक, बारीक असल्यामुळे त्याला पहिल्यापासूनच आधाराची गरज असते. पानंही खूप पातळ असल्यामुळे वारा जास्त असेल अशा ठिकाणी कुंडी ठेवू नका.

कुंडीत बिया पेरण्यापूर्वीच आधारासाठी बांबूच्या पातळ कामट्या कुंडीत रोवून ठेवा. जमिनीत बिया किंवा रोपं लावायची झाल्यास आणि जागा कमी असल्यास ‘टेपी टेक्निक’ वापरून बिया पेरा. जमिनीत गोलाकार पद्धतीत बांबूच्या कामट्या रोवा आणि त्याची वरची टोकं एकत्रित बांधा, म्हणजे छोटा ‘डोम’ तयार होईल. प्रत्येक काठीभोवती २-३ बिया पेरा. हे टेक्निक वेली घेवड्यांना जास्त उपयुक्त आहे. झुडपासारख्या वाढणाऱ्या घेवड्याच्या प्रकारालाही थोडा आधार द्यावा लागतो. शेंगा यायला लागल्या की त्याच्या भारामुळे झाड वाकतं. कोवळ्या शेंगा मातीत टेकल्या तर लवकर कुजतात. झुडपाचे बी रुजून थोडे मोठे झाले की त्याच्या मातीजवळच्या खोडाभोवती मातीचा छोटा ढीग करा म्हणजे खोडाला आधार मिळेल. ह्य़ा मातीत थोडं सेंद्रिय खतही मिसळा. घेवड्याचं खोड भराभर वाढतं. नुसतेच खोड आणि पानं वाढत राहिली तर फुलं लवकर येत नाहीत. वेली घेवड्याला आधार दिलेला असतो. त्यावर खोडाचा शेंडा गुंडाळून ठेवा म्हणजे तो त्यावर वाढत जाईल. आधारासाठी एकच काडी रोवली तर त्यावर पानं, खोड भरपूर वाढू द्यावीत. नंतर खोडाचा शेंडा हलक्या हाताने खुडून टाकावा. तो कात्रीने शक्यतो कापू नये. घेवड्याच्या जातीनुसार त्याला पांढरी, गुलाबी किंवा जांभळट फुले येतात. रोपं लावल्यापासून ५० ते ६० दिवसात झाडाला शेंगा येतात.

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How to plant common bean in the garden amy