प्रिया भिडे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शिल्प, काव्य, चित्र, अध्यात्म यावर आपली अमीट छाप उमटवणारे कमळ हे भारताचे राष्ट्रपुष्प आहे. सुमार सौंदर्याने ते आपले अन् म्हणूनच देवाचेही आवडते फूल आहे. याचे नाव नेब्यूला न्यूसीफेरा. मोठ्ठा जलाशय हे कमळाचे आवडते स्थान. याचे रताळ्यासारखे पांढुरके कंद चिखलात वाढतात अन् मोठे देठ पाण्याबाहेर वाढून नाजूक, पातळ मोठी पाने येतात. कमळाचे फूलही मोठे असते. यात लाल, गुलाबी, पांढरा रंग आढळतो. मध्ये पिवळे पुंकेसर असते. फुले पाण्याच्या बरीच वर येतात. पाकळ्या गळाल्यावर मधल्या पेल्यात गोल गोल कप्प्यात बिया येतात. बिया वाळल्यावर हा पेला सुंदर दिसतो. पुष्परचनेमध्ये वापरता येतो. कमळाचे प्रजनन कंदापासून व बियांपासून होते. कंदापासून ही प्रक्रिया सहजगत्या होते. बियांपासून रोप होण्यास वेळ लागतो. बियांची प्रजनन क्षमता शेकडो वर्ष राहू शकते. चीनमध्ये बाराशे वर्षांची जुनी जिवंत बी सापडल्याचे पुरावे आहेत.

‘सूर्ये फाकती कमळे’ ज्ञानदेव म्हणतात. कारण ती सूर्योदयानंतर उमलतात अन् दुपारी मिटतात. कमळास उष्मा आवडतो. पूर्वी बंगल्यामध्ये अंगणात पुष्करणी असत ज्यात कमळे फुलत. आता सोसायट्यांमध्ये जलतरण तलाव असतात, तर कमळासाठी उथळ जलाशय करता येतील. नाही तर सिमेंटच्या मोठ्या कुंडीत, प्लॅस्टिकच्या गोल टाकीत कमळ लावता येते. कुंडीत तळात माती घालून कमळकंद लावावा. वर हळूहळू पाणी वाढवावे. कुंडी उन्हाच्या जागी ठेवावी. कमळास शेणखत आवडते. खताची मात्रा कुंडीचा आकार व रोपाचे वय यावरून ठरवावी. आम्ही दोन महिन्यातून एकदा शेणखत घालतो. कंद रुजला की पाण्यावर तरंगणारी पाने येतात. नंतर उंच देठाची हवेतली पाने येतात. पानांचा आकार ताटाएवढा वाढतो आणि सशक्त दांडा फुटून त्यास कमळाचे देखणे फूल येते. त्याचा आनंद काय हा अनुभवायलाच हवा.

आणखी वाचा-आयुर्वेदाच्या स्मृतीतून: बहुगुणी हळद

कमळासारखेच फूल असणारे निम्फिया कुटुंबाचे सदस्यही लोकप्रिय आहेत. कारण ते सहज रुजतात, खूप फुलतात. यात जांभळा, गुलाबी, पिवळा असे अनेक रंग उपलब्ध असतात. या वॉटर लिलीचे कंद छोट्या प्लास्टिक टबमध्ये ही माती व शेणखत एकत्र करून लावता येतात. पिवळा रंग दुर्मीळ व कमी फुलतो. ही फुले दिसतात सुंदर, अगदी कमळासारखीच पण हे ‘खरे कमळ’ नाही. याची पाने किंचित जाडसर, पाण्यावर तरंगणारी. फुलांचे दांडे जेमतेम चार-पाच इंच असतात. कमळ, वॉटर लिली यांची सडलेली पाने काढावीत. गोगलगायी होणार नाहीत याची दक्षता घ्यावी, सर्वात महत्त्वाचे कुंडीत गप्पी मासे सोडावेत. ते पाण्यात डास होऊ देणार नाहीत.

आणखी वाचा-गच्चीवरची बाग: इथे विहरती फुलपाखरे

कमळे व निम्फियाची रोपं नर्सरीत उपलब्ध असतात. छोट्या-छोट्या जलाशयातील प्लास्टिक ड्रममधील, प्लास्टिक कागद लावून केलेल्या तळ्यांमधील असंख्य लाल, गुलाबी, पांढरी, कमळे फुललेली पाहून मन मोहून जाईल. अन् दोन-चार कमळ आणि वॉटर लिली तुमच्या बागेचे सदस्य होतील. कमळाचे वैशिष्ट्य म्हणजे याचे सर्व भाग खाण्यास योग्य असतात. पातळ, नाजूक पानांवर जेवू शकतो. देठांची, कंदाची भाजी आणि रायतं करतात. पाकळ्या पदार्थ सजावटीसाठी वापरतात. पण आपणास बाजारात सहज उपलब्ध पदार्थ म्हणजे कमळाच्या बियांच्या लाह्या ‘मकाणे’ अत्यंत पौष्टिक. कच्चे खाता येतात पण साजूक तूप, हिंग, जिरे, हळद, मीठ घालून परतले तर जाता-येता तोंडात टाकता येतात. अथवा मकाण्याच्या पीठाची खीरही करता येते.

असा हा कमळ प्रपंच कशासाठी, तर कमळाचे लोभस लावण्य बागेस लाभावे यासाठी. घराचे पद्मालय व्हावे यासाठी अन् गणरायाच्या पूजेत ‘आवडती तुज म्हणून आणिली रक्तवर्ण कमळे’ म्हणता यावे यासाठी!

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How to plant lotus in small area mrj
Show comments