हॅलो मैत्रिणींनो! मी आहे आर.जे. ढींच्याक आणि तुम्ही ऐकत आहात तुमचा आवडता कार्यक्रम, ‘चील मार’! आज आपल्याशी गप्पा मारायला आली आहे, आपली मैत्रिणी सुजाता! सुजाता, तुझं मनापासून स्वागत. आजचा आपला विषय जरा वेगळा आणि तितकाच महत्त्वाचा आहे. मैत्रिणींनो, जर तुमच्या घरातील वातावरण एकदम खेळीमेळीचं असेल, घरात आई-वडील एकमेकांशी आणि ते तुमच्याशी छान प्रेमाने वागत असतील तर तुम्ही नक्कीच एका सुखी कुटुंबात राहत आहात. पण सगळ्याच मुलींच्या नशिबात इतके प्रेम, आणि इतकं सुरक्षित कौटुंबिक वातावरण नसतं.
वडिलांना व्यसन असेल आणि त्यापायी जर घरात रोज आरडाओरडा, तमाशा, असभ्य वर्तन घडत असेल तर त्या घरातील मुलं मुली कायम भेदरलेली, असुरक्षित आणि दडपणाखाली असतात. अशा वेळी मुला-मुलींना आपल्या आईवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध बंड करावंस वाटतं. रोजच्या जाचातून आपली आणि आईची सुटका करावीशी वाटते. काय करावं अशा वेळी? काय भूमिका घ्यावी? आजचा आपला विषय हाच आहे. त्यासाठी आज आपण बोलू या सुजाताशी.
“ सुजाता, मला सांग, तुझ्या घरात नेमकी काय समस्या होती आणि तू त्याचा सामना कसा केलास?”
“माझे वडील एका खासगी कंपनीत नोकरी करत होते. त्यांना दारूचं अति व्यसन होतं. रोज रात्री घरातला त्यांचा प्रवेशच शिवीगाळीने होत असे. आईनं जराही प्रश्न विचारला किंवा काही सांगायचा प्रयत्न केला, की त्यांचा संताप अनावर होत असे. अनेकदा त्यांनी आईवर हात उगारला आहे. मी लहान होते तेव्हा खूप भेदरून जायचे. थोडं कळू लागलं, तसं आईबद्दल खूप काळजी वाटू लागली. ती शाळेत शिक्षिका होती, चांगला पगार होता, पण नवऱ्याला विरोध करण्याची हिम्मत नव्हती तिच्यात, पण मी मोठी झाल्यावर मात्र तिच्याशी बोलू लागले. अनेकदा तिला म्हणाले, की आपण पोलिसात तक्रार करू, पण आपल्या संसाराची फाटकी अवस्था अशी चव्हाट्यावर मांडायला ती तयार नव्हती. मग एक दिवस मीच हिम्मत केली. वडील घरात यायच्या वेळी दरवाजा आतून लावून घेतला. आधी तर त्यांना विश्वासच बसला नाही की मी किंवा आई असं काही करण्याची हिम्मत दाखवू. बराच वेळ ते आम्हाला धमकी देत बाहेर उभे होते. नंतर अर्वाच्य भाषेत ओरडू लागले. मग मी हिम्मत करून आई आणि मी बाहेर गेलो. त्यांना खडसावून सांगितलं, की या पुढे आईवर हात उगारला किंवा शिवीगाळ केली तर घरात प्रवेश मिळणार नाही. तेव्हा त्यांनी संतापून मला मारण्यासाठी माझा हात धरला, मी तो वरच्यावर थोपवला तसं त्यांनी मला मारण्यासाठी त्वेषाने तिथली एक काठी उचलली. ते बघून आईचा संयम संपला. ‘खबरदार माझ्या लेकीवर हात उगारला तर,’ असं म्हणून तीच त्यांच्यावर तुटून पडली. हे सगळं बघून कुणीतरी पोलिसात तक्रार केली, आणि पोलिसांनी वडिलांना उचलून नेलं. काय समज दिली मला माहीत नाही, पण तीन दिवसांनी आईनं त्यांना सोडवून आणलं तेव्हा ते एकदम वरमलेले होते. पुढे त्यांनी दारू पूर्णपणे सोडली असं नाही, पण कधी नशेत सुद्धा आवाज नाही केला. नंतर पाच सहा वर्षात त्यांचा आजारपणाने मृत्यू झाला,” सुजातानं तिचा अनुभव सांगितला.
हेही वाचा : समुपदेशन : आई की बायको?
“तुझं खूप कौतुक सुजाता, आपल्या आईसाठी तू आवाज उठवलास. पण अशा वेळी अनेक महिला संघटना आणि सुरक्षा समिती आहेत त्यांची मदत घ्यावी असं तुला नाही वाटलं?”
“मला अशा संस्था आणि संघटनांबद्दल कल्पना होती, आणि इंटरनेटवर सगळी माहिती उपलब्ध पण आहे …तरीही मला वैयक्तिक प्रयत्न करायचे होते, कारण आईमध्ये ती हिम्मत यायला हवी होती. तिच्यातला आत्मविश्वास जागा व्हायला हवा होता. मला आपल्या मैत्रिणींना सांगायचं आहे, की कुठलाही अत्याचार मुकाट सहन करायचा नाही, मग अत्याचार करणारी व्यक्ती तुमच्या अगदी जवळची व्यक्ती का असेना. वेळीच आवाज उठवा. लागलं तर सामाजिक संस्थांची किंवा पोलिसांची मदत घ्या.”
हेही वाचा : अनोळखी महिलेला ‘डार्लिंग’ म्हणणे हा विनयभंगच! कोलकाता उच्च न्यायालयाचे निरीक्षण
“मैत्रिणींनो, सुजातानं तिच्या आईसाठी कशी हिम्मत दाखवली आणि वडिलांना चांगलं वागण्यास भाग पाडलं. तुमच्या घरात जर तुमच्या आईवर किंवा इतर व्यक्तीवर असा काही अन्याय होत असेल तर त्या विरुद्ध तुमचं एक पाऊलही खूप मोठा बदल घडवून आणू शकतो. भेटू पुढील एपिसोडमध्ये आपल्या लाडक्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे, चील मार!”
adaparnadeshpande@gmail.com