नीलिमा किराणे

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आज लग्नानंतर जवळजवळ सहा महिन्यांनी निशा निवांतपणे तिच्या लाडक्या काकूकडे आली होती. काकूच्या हातचं आवडीचं जेवल्यावर निशा खुलली. काकूनं रुचिरवरुन चेष्टा केल्यावर लाजली, मात्र एकदम गप्प झाली. “काय गं? भांडलीस की काय रुचिरशी?” काकूनं विचारलं.
“भांडण नाही, पण…”

“निशा, सांग मला. सुरुवातीचे हे छोटे ‘पण’ वेळेत सोडवले नाहीत, तर नंतर राक्षस होतात हं त्यांचे!” काकू म्हणाली.
“रुचिरला घरात फार गृहीत धरलं जातं काकू. थोरला म्हणून सगळ्या जबाबदाऱ्या रुचिरनं घ्यायच्या. पण ॲप्रीसिएशन शून्य. रोहननं, त्याच्या धाकट्या भावानं एवढंसं काही केलं, तरी त्याचं घरभर कौतुक. त्याच्या मोठ्या चुकांकडेही दुर्लक्ष. रुचिरला मात्र कामं करूनही बोलणी.” निशा फुणफुणली.
“धाकट्याचे लाड आणि मोठ्यांकडून जबाबदारीची अपेक्षा ही जगरहाटी आहे निशा. ‘दादा आहेस ना तू? मग छोटूशी असं वागायचं का?’ हे बरेचदा धाकट्याच्या जन्मापासूनच नकळत मोठ्या मुलांच्या बाबतीत सुरू होतं.”

हेही वाचा >>>वाद पती-पत्नीचे… भोग मुलांचे!

“अगं पण आता कोण लहान आहे? यांचा छोटूसुद्धा ग्रॅज्युएट होईल आता! बरं, या भेदभावाबद्दल कुणाला काही म्हणताही येत नाही, कारण गोष्टी तशा छोट्या असतात. आई-बाबांना कधीही उलटून बोलत नाही मी, मग चिडचिड रुचिरवरच निघते.”
“रुचिरला पण आवडत नाहीत का या गोष्टी?”
“आधी तर अपमान झालेला त्याच्या लक्षातही येत नव्हता. दोन मुलांसाठी आईबाबांचे न्याय वेगवेगळे आहेत हे त्याला पटायचं नाही. त्यामुळे आमची भांडणं व्हायची. मी प्रसंगा-प्रसंगातून दाखवून दिलं, तेव्हा त्याला कळायला लागलं.” निशा म्हणाली.
“त्यामुळे त्याची चिडचिड वाढली… म्हणजे तू भांडकुदळ नसलीस, तरी तू आल्यापासून घरात भांडणं सुरू झाली असंच झालं ना?” काकू म्हणाली.
“असं नाही. आधीही वाद व्हायचेच की त्यांच्यात. काकू, मला कुणी काही म्हटलेलं मी सहन करू शकते, पण रुचिरचा डोळ्यांसमोर अपमान झाला की रडायलाच येतं मला.” निशाचे डोळे भरून आले.

“तुला वाईट वाटणं स्वाभाविक आहे निशा. तुला हे आज खटकत असलं, तरी त्या घरासाठी ते अनेक वर्षांचं वातावरण आहे. दादाकडे जबाबदारी आणि छोटूचे लाड हा त्यांच्या सवयीचा भाग आहे. जाणूनबुजून अन्याय वगैरे नसणार त्यात. त्यामुळेच रुचिरला अपमान वाटला नसणार. तू तुमच्या प्रौढ, समजत्या वयात, बाहेरून त्या घरात गेलीस. त्यामुळे आणि रुचिरवरच्या प्रेमामुळे तुला दोघांशी वागण्यातला फरक तीव्रतेनं जाणवला.”
“पण आता मुलं मोठी झालीत, त्यांच्याशी सन्मानानं वागायला हवं, हे आई-बाबांना समजायला नको का? तेच मी रुचिरला म्हणते, तेव्हा आमचे वाद होतात.”
“तुझ्या लक्षात येतंय का निशा? आई-बाबा रुचिरशी सन्मानानं वागत नाहीत, तेव्हा ‘तुला आत्मसन्मानच नाही’, असं म्हणून तूही त्याचा अपमानच करते आहेस. त्याच्या आई-वडिलांनी रुचिरशी वागण्याच्या अपेक्षा तू तुमच्या दोघांच्या बाँडिंगच्या मध्ये आणतेयस.”
“असं होतंय का? पण म्हणजे मी बोलायचंच नाही? असंच चालू द्यायचं?” निशा गोंधळून वैतागली.
“तसं नाही, पण काल घरात आलेल्या मुलीनं टीका करून घरातलं वातावरण बिघडवलं, हे कुणालाच आवडू शकत नाही. त्यांच्या इतक्या दिवसांच्या सवयी लगेच बदलतील अशी अपेक्षा कितपत बरोबर आहे? एकमेकांवर प्रेम करण्याची त्या घराची पद्धत समजलीय का तुला?”
“हो. न बोलता ते एकमेकांची काळजी घेत असतात. माझी पण घेतात.” निशा म्हणाली.

हेही वाचा >>>नातेसंबंध: बॉयफ्रेंड ‘ममाज बॉय’ आहे का?

“मग तेही लक्षात घे राणी! खटकलेल्या छोट्या छोट्या गोष्टी जाणूनबुजून नाही, सवयीनं होतायत हे समजून सोडून दिल्यावर डोकं निम्मं शांत होईल. जेव्हा एखादा मुद्दा लक्षात आणून देण्याएवढा महत्त्वाचा वाटेल, तेव्हा योग्य वेळी, सहजपणे, नीट शब्दांत, त्यांना न दुखावता तुला सांगता यायला हवं. तुझ्या बोलण्यानं त्यांना अपमान वाटला, तर गोष्टी बदलणं दूर, उलट तुझ्याबद्दल मनात अढी बसेल.” काकू म्हणाली.
“हो गं काकू! मी बोलले नाही, तरी माझ्या मूड जाण्याचा त्यांना त्रास होत असणार.”
“तुझ्या स्वभावातलं चांगलं समजून घ्यायला त्यांनाही थोडा वेळ मिळायला हवा ना राणी? माझ्या अनुभवानं सांगते, सबुरीनं घेतलं की बदलतं हळूहळू.” काकूच्या वाक्यानं निशा चमकलीच एकदम.

“तर आता तूच ठरव… खळखळतं हसणाऱ्या बायकोसोबत रुचिर खूश राहील, की ‘तुला अन्याय झालेलासुद्धा कळत नाही’ म्हणून बारीकसारीक गोष्टींवरून ‘जज करणाऱ्या’, चिडचिड्या बायकोसोबत आनंदात राहील? तुमच्या नात्याला काय हवंय? समंजस बॉंडिंग की नाराजी?” काकू हसत म्हणाली तशी काकूचा हात प्रेमानं हातात घेत निशाही समजून हसली.

(लेखिका रिलेशनल कौन्सिलर आहेत)
neelima.kirane1@gmail.com

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How to solve husband family problems and how to behave with his family amy