-सिद्धी शिंदे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Husband Wife Fight: आमच्या शेजारी राहणाऱ्या परब कुटुंबात नेहमीच उत्साह असतो. अर्थात या संपूर्ण ऊर्जेचा स्रोत परब काकीच आहेत. स्वभावाने प्रचंड बोलक्या आणि प्रत्येकाच्या मदतीला धावणाऱ्या परब काकी आमच्या चाळीची शान आहेत. नेहमी अडल्या नडलेल्या मदत करणे हा त्यांचा छंद. परब काकींची सून श्रेया, अलीकडेच लग्न करून आली होती. चाळीत राहत असली तरी श्रेयाचा थाट अगदी साऊथ बॉम्बेच्या स्टाईलिश मॅडमसारखा होता. विशेष म्हणजे परब काकी तिला खूप पाठिंबा द्यायच्या. अगदी श्रेयाच्या कपड्यांपासून ते आवडी- निवडीपर्यंत सगळं काही काकी खूप आवडीने जपतात. श्रेया लग्न करून येणार म्हणून परबांच्या चाळीतील महालाचं फूल मॉडर्न रिडेकोरेशन सुद्धा केलेलं होतं. एकूण काय तर नव्या सुनबाईचे लाड करण्यात परब काकी जराही मागे राहत नव्हत्या.

श्रेया आणि अंकुश म्हणजे परबांचा सुपुत्र यांनी लव्ह मॅरेज केलं होतं. अशा लग्नाचा फायदा काय तर, नवरा बायको एकमेकांना चांगले ओळखत असतात. त्यामुळे लग्न झाल्यावर एकमेकांसमोर फारसा संकोच बाळगून राहावं लागत नाही. समोरच्याचं नाही पटलं तर थेट उलट उत्तर देता येतं (त्याने वाद वाढतो ते वेगळं), समोरच्याला आपलं पटवून कसं द्यायचं हे ही जोडीदारांना माहीत असतं. श्रेया आणि अंकुश पण टिपिकल लव्ह मॅरेज केलेल्या जोडप्याच्या गटात एकदम परफेक्ट बसत होते.

काही दिवसांपूर्वी परब काकींच्या घरून जोरजोरात भांडणाचा आवाज आला. श्रेया आणि अंकुशचं कशावरून तरी खूप वाजलं होतं. विषय काहीतरी अंकुशच्या कामाचा होता आणि त्यात श्रेयाचं मत वेगळंच काहीतरी होतं. ती त्याला हक्काने ओरडून समजावत होती की तिने सांगितलेलं कसं योग्य आहे आणि अंकुशचं कसं चुकतय, आणि अर्थात अंकुशही तिला उलट समजावत होता. मुद्दा समजावण्याचा असला तरी सूर भांडणाचा होता त्यामुळे चाळीतल्या बायका चांगले कान देऊन ऐकत होत्या. एका क्षणाला वाद खूपच वाढला आणि अंकुश तिला म्हणाला “ए बाई तू तुझं मत तुझ्याकडे ठेव, तसं पण सगळे म्हणतात बायकोचा बैल झालोय. मला नाही ऐकायचं तुझं काही, ‘माझ्या’ गोष्टीत तोंड घालू नकोस.” बस्स एवढं ऐकलं आणि श्रेया रागाने पूर्ण लाल झाली. होता नव्हता तो सगळा राग व शक्ती एकवटून त्याला सुनवायला श्रेया हात पुढे करून बोलायला जाणार इतक्यात परब काकींचा आवाज आला, ” श्रेया आत चल, त्याच्या गोष्टीत बोलू नको”

चाळीतल्या बायकांसह मला पण एक मिनिट विश्वासच बसेना, एरवी सुनेचा शब्द खाली पडू न देणाऱ्या काकी अचानक तिला शांत बसायला सांगतात. असं कसं? बायकांची कुजबुज सुरु झाली. “बरोबर आता लेकाला बोललेलं काय परबीण ऐकून घेईल” “सून जरा अतीच करते, बाई माणसाने कशाला बोलायचं मध्ये मध्ये. आमची अजून बिशाद नाही नवऱ्याला उलट उत्तर द्यायची.” हे सगळं ऐकतेय तोवर परब काकी श्रेयाला घेऊन आमच्या घरी आल्या. म्हणाल्या, “घरात वातावरण तापलंय म्हणून श्रेया आणि मी जरा इथेच बसतो, बाकी चाळीत झाला त्याच्यापेक्षा अजून तमाशा नको.” श्रेया येऊन बसली. तिला काकींनीच आमच्या माठातलं पाणी आणून दिलं. श्रेयाच्या डोळ्यातून पाणी थांबत नव्हतं. आधी वाटलं तिला अंकुशचा राग आला असेल, तो आला होताच पण तिने तेवढ्यात काकींना आमच्या मनातला प्रश्न विचारला, आई तुम्हीही मला शांत बसायला का सांगितलं? आणि मग जरा श्वास घेऊन काकी बोलू लागल्या. ” बाई गं नवऱ्याच्या कामात आपण मध्ये पडू नये” श्रेया आणि मी दोघीही जवळपास एकाच जनरेशनच्या असल्याने काकूंकडे लगेच रागाने बघू लागलो.

२१ व्या शतकात काय गुलामी करायची का? आमच्या मताला किंमत नाही का? हे प्रश्न आमच्या चेहऱ्यावर होते. ते ओळखून काकी म्हणाल्या, ” मला सांग तु उद्या डॉक्टरकडे गेलीस तर तो तुला फुकट तपासेल का? तू वाण्याकडे गेलीस तर तो फुकट त्याचं सामान देईल का? नाही ना? जशी वस्तूला किंमत असते तशी मताला पण असायला हवी ना?आणि जर तुमच्या मताला किंमत हवी असेल तर ते फुकट वाटून कसं चालेल? आपण बायका आपल्या माणसाच्या काळजीने आधीच सूचना द्यायला जातो. पण बाय यानेच समोरचा माणूस आपलं ऐकणं बंद करतो. त्याला वाटतं ही काय बोलतच असते. जेव्हा तू समोरच्याने प्रश्न न विचारताच उत्तर देशील ना तेव्हा तो तुला ‘विचारायची’ तसदी घेणंच बंद करतो. त्याला वाटतं आपल्याला हवं ते उत्तर मिळणारच आहे. आणि जर तू दिलेलं उत्तर त्याला ‘हवं’ तसं नसेल तर तो “मी तुला विचारलाय का” असं बोलायला मोकळा, हो की नाही?

हे ही वाचा<< मी दीपिका नाही पण… ट्रेन मध्ये दिसलेली ‘ती’, जगातील सर्वात सुंदर महिला!

तुझी काळजी मला समजते, कदाचित तुझ्या नवऱ्यालाही समजत असेल पण कदाचित आता तो तुझ्याकडून उत्तराची अपेक्षाच करत नसेल, किंवा त्याला स्वतःलाच त्याचा प्रश्नच कळत नसेल. त्याला प्रश्न समजू दे, मग कदाचित तोच त्यावर उत्तरही शोधेल नाहीतर तुझ्याकडे येईल आणि स्पष्ट शब्दात प्रश्न विचारेल तेव्हा तू तुझं उत्तर द्यायला हवं आणि ते ही त्याला पटेलच अशी अपेक्षा न ठेवता. तुम्ही आजकाल ते कन्सेंट का काय म्हणता ना ते फक्त शारीरिक गोष्टींनाच नाही मनाला पण लागू होतं ना. एखाद्याच्या मेंदूमध्ये तुमचे विचार रुजवण्याआधी जर त्याच्या मेंदूची, मनाची परवानगी घेतली नाही तर तो फक्त अत्याचारच होतो, आणि अत्याचार कुणाला आवडणार आहे?

हे ही वाचा<< गौतमी पाटील ‘१०० टक्के’ चुकलेली नाही!

काही गोष्टी ज्याच्या त्याच्या त्याला सोडवू द्याव्या. झाकली मूठ सव्वा लाखाची म्हणतात, तुझं मत समोरच्याने ऐकावं असं वाटत असेल तर आधी त्याला तुझं ऐकण्याची इच्छा होणं गरजेचं आहे. त्याला तुझ्या मताची गरज वाटायला हवी तरच तो मनावर घेईल, तोपर्यंत भांडून तू तुझा मान का घालवतेस? इतरांनी तुझ्या मताला किंमत देण्याआधी तू स्वतःला महत्त्व देऊन तर पाहा. यात काहीच स्वार्थ नाही!

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Husband wife fights man tells women to shut up her reaction mother in law advice how to keep self respect in relation svs
Show comments