Husband Wife Relations Disturbed Reasons: अलीकडेच पत्नीची प्रकृती ठीक नसताना तिला घरातील कामे करण्यास भाग पाडणे ही क्रूरता ठरू शकते, असे मत दिल्ली उच्च न्यायालयाने व्यक्त केले आहे. एका घटस्फोटाच्या याचिकेदरम्यान चालू असणाऱ्या सुनावणीत न्यायाधीशांनी घटस्फोटाला मंजुरी देताना पती व पत्नी दोघांनी केलेल्या आरोपांमधील चुकीच्या बाजू स्पष्ट केल्या आहेत. प्राप्त माहितीनुसार याचिकाकर्ता पतीने, असा आरोप केला होता की त्याची पत्नी सुरुवातीपासूनच त्याचा व त्याच्या कुटुंबीयांचा अनादर करत होती ज्यामुळे त्यांचे वैवाहिक आयुष्य फार सुकर नव्हते. ती ना घरच्या खर्चाला हातभार लावायची ना घरी कामात मदत करायची.
काम करावं पण इच्छा नसल्यास..
न्यायमूर्ती सुरेश कुमार कैत आणि न्यायमूर्ती नीना बन्सल कृष्णा यांचा समावेश असलेल्या दिल्ली उच्च न्यायालयाच्या दोन न्यायाधीशांच्या खंडपीठाने पतीला घटस्फोट मंजूर करताना सांगितले की, “आमच्या मते, जेव्हा पत्नी घरातील कामे स्वतःच्या इच्छेने करते तेव्हा ती मनापासून आणि प्रेमाने तिच्या कुटुंबासाठी करते, पण जर तिची तब्येत किंवा इतर परिस्थिती तिला काम करण्यासाठी अनुकूल नसेल तर तिला जबरदस्तीने घरची कामे करण्यास सांगणे ही नक्कीच क्रूरता ठरू शकते.”
पण पती चुकीचा नाही कारण…
मात्र निकालात, खंडपीठाने असेही नमूद केले की पतीने कोणतीही चूक केली नाही, कारण त्याने आपल्या पत्नीला घरातील कामे करण्यास भाग पाडले नाही आणि घरगुती कामासाठी घरात मदतनीस सुद्धा नेमली होती. खटल्याचा निकाल देताना, न्यायालयाने असेही सांगितले की या प्रकरणातील अनेक पुरावे असेच सूचित करतात की इथे सदर पत्नी चुकीची होती कारण तिने या प्रकरणात विनाकारण आपल्या पतीवर विवाहबाह्य संबंधांचे आरोप लावले होते तसेच त्याच्या कुटुंबावर सुद्धा आरोप करून चुकीच्या तक्रारी दाखल केल्या होत्या.
हे ही वाचा<< सानिया मिर्झा घटस्फोट घेतेय ऐकलं.. मला का नाही जमलं?
“जोडीदाराच्या चारित्र्यावर चुकीचे आरोप करणे हे नात्यात सर्वोच्च क्रूरतेचे प्रमाण आहे, ज्यामुळे विवाहाचा पाया हादरून जातो. सध्याच्या प्रकरणात, प्रतिवादीने विवाहबाह्य संबंधाचे आरोप लावून, याचिकाकर्ता पतीबाबत प्रचंड क्रूरता दाखवली आहे. याचिकाकर्त्याची कामाच्या ठिकाणी व नातेवाईकांमध्ये प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न पत्नीने केला आहे. त्यामुळे या नात्यात प्रेम, आदर किंवा विश्वास दिसून येत नाही,”असे म्हणत न्यायाधीशांच्या खंडपीठाने घटस्फोटाला मंजुरी दिली होती.