तन्मयी तुळशीदास बेहेरे

‘विभक्त झालेल्या पत्नीच्या घरातील वीजपुरवठा खंडित करणाऱ्या पतीला न्यायालयानं खडसावलं…’ काही दिवसांपूर्वी ठळक मथळ्यातील ही बातमी वाचनात आली होती. तेव्हा वाटलं, की विद्युत पुरवठा हा जीवनाचा अत्यावश्यक भाग आहे, हे न्यायालयानं हे सांगायची वेळ का आली? तर घटना अशी घडली होती, की ७ वर्षांचा संसार मोडून एक दाम्पत्य वेगळं राहत होतं. पती रेल्वेत अधिकारी. पत्नी त्यांच्या ५ वर्षांच्या मुलाला घेऊन रेल्वे क्वार्टर्समध्ये राहात होती आणि पती दुसरीकडे राहात होता. कोर्टात घटस्फोटाची केस दाखल झाली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पत्नी कमावत नव्हती त्यामुळे पोटगी आणि मुलाचा खर्च पतीनं द्यावा म्हणून लढत होती. एक दिवस अचानक घरातली वीज गेली आणि परत विद्युतपुरवठा सुरळीत झाला नाही. चौकशीअंती कळलं, की पतीनं रीतसर रेल्वेशी पत्रव्यवहार करून क्वार्टर्समधल्या घराचा वीजपुरवठा खंडित करण्यासाठी अर्ज केला होता. पत्नीनं कंटाळून कौटुंबिक हिंसाचारप्रकरणी अर्ज केल्यावर न्यायालयानं ‘वीजपुरवठा ही अत्यावश्यक गोष्ट असून तो खंडित करू नये,’ असं सांगितलं.

हेही वाचा… आहारवेद : रुचकर मिरची

पती-पत्नी विभक्त झाल्यानंतर प्रेम संपत असेलही, पण पतीला तिच्याविषयी आणि स्वतःच्या मुलाविषयी साधी सहानुभूतीही वाटू नये? हे सर्व वाचून आश्चर्य याचं वाटलं, की आपल्या पाच वर्षांच्या लहान मुलाला घेऊन आपली पत्नी अंधाऱ्या घरात कशी राहील, याचा विचार पतीच्या मनात कसा आला नाही? लहान मुलाला भीती वाटली तर? या विचारानं जराही त्याचं मन बदललं नाही? तसं असेल तर तो बाप म्हणून सोडाच, पण माणुसकीपासूनसुद्धा दूर जातोय असं म्हणावं का?…

स्वतःच्या पायावर उभ्या नसलेल्या पत्नीची आणि मुलाच्या पालनपोषणाची जबाबदारी घेण्याची नैतिकता पतीमधे नसेल, तर कोर्टाची पायरी चढून कोर्टानं निकाल देईपर्यंत पत्नीनं काय करायचं, हा प्रश्नच आहे. वीज कापण्यासारखा दैनंदिन आयुष्य अत्यंत अडचणीचं बनवणारा छळ कशासाठी? स्त्रिया रोजच्या आयुष्यात होणाऱ्या अशा अत्याचारांना तोंड देणार, नकारात्मकतेविरुद्ध उभं राहण्यासाठी आपला वेळ आणि ऊर्जा खर्ची घालणार की एकटीनं स्वतःच्या हिमतीवर मुलाला वाढवून त्याला चांगलं भविष्य देण्यासाठी प्रयत्न करणार?

हेही वाचा… मैत्रिणींनो, ‘टूल्स फ्रेंडली’ होऊ या!

हल्लीच्या काळात घटस्फोट ही गोष्ट जगावेगळी नसली तरी घटस्फोटितेसाठी समाजाचा दृष्टिकोन मात्र वर्षानुवर्ष तसाच राहिला आहे. पत्नीला पोटगी मिळू नये म्हणून तिच्यावर चारित्र्यहीनतेचा आरोप करणारेही पुरूष कमी नाहीत. शिवाय ‘पत्नीनं जुळवून घ्यायला काय झालं? पती हुकूम गाजवणारच. पत्नीनंच समजून घायला हवं. विशेषतः पदरी मूल असताना.’ अशा टोमण्यांना स्त्री सामोरी जातच असते. वेगळी राहायची हिम्मत दाखवणाऱ्या स्त्रीला पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये सन्मान तर नाहीच, उलट ती म्हणजे कुचेष्टेचा विषयच.

शिवाय मुद्दा हाही आहे, की अशा एकटं जगण्याची धडपड करणाऱ्या स्त्रीच्या पाठीशी नातेवाईक, समाज, संस्था उभ्या राहणारच नाहीत का? आता या कहाणीत रेल्वेनंसुद्धा वीजपुरवठा खंडित करण्याच्या अर्जाला मान्यता देऊन एकप्रकारे पुरुषप्रधान संस्कृतीला हातभार लावला आहे, असंच दिसतंय.

हेही वाचा… चॉइस तर आपलाच : तुमची मुलं आळशी झालीत ?

अजून मणिपूरला महिलांची विवस्त्र धिंड काढल्याच्या घटनेची चीड मनात ताजी आहे. हिंस्रपणाची परिसीमा मणिपूरमध्ये घडली असली तरी भारतातल्या स्त्रिया कमीअधिक प्रमाणात अत्याचाराला आणि भेदभावाला सामोऱ्या जातच आहेत. आता ओदिशामध्ये ‘महिला प्रवासी बसमध्ये पहिल्यांदा प्रवेश करत असेल, तर तिला अडवू नये’ असा आदेश महिला आयोगाला द्यावा लागला. का? तर म्हणे तिथे असा समज आहे, की स्त्रिया प्रथम बसमध्ये चढल्या तर अपशकुन होतो! आपण माणुसकीपासून दूर दूर जाऊ लागलो आहोत की काय, असा प्रश्न पडावा अशाच घटना हल्ली घडू लागल्या आहेत. ‘अरे मानसा मानसा कधी होशील मानूस?’ बहिणाबाईंनी विचारलेला प्रश्न रोज पडावा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. तुमचं काय मत?…

tanmayibehere@gmail.com

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Husband wife relation divorce and gender discrimination dvr
Show comments