नात्यातही टिटिएमएम म्हणजे तुझं तू आणि माझं मी… असतं का? म्हणजे तुझं काय चाललंय याच्याशी मला काही देणं घेणं नाही की, माझं काय चाललंय याची फिकीर तुला नाही, पण नात्यात हे फार काळ चालतं का?
“केदार, तू एकटाच आलास? केतकी का आली नाही?”
“वहिनी, मी आलोय ना? राजचा वाढदिवस आहे, मला इथे वेळेवर पोहोचायचं होतं, मी ऑफिसमधून डायरेक्ट तुमच्याकडं आलोय.”
“अरे,पण ती ऑफिसमधून परस्पर येणार होती का? ती निघाली की नाही, ते तिला विचारलंस का?”
“वहिनी, तू विचार ना, मला तिचं काहीच माहिती नसतं.”
“अरे, बायको आहे ना तुझी? तुला कसं माहिती नाही?’
“वहिनी, मागच्या एक वर्षांपासून आम्ही एकमेकांना काही विचारत नाही, आमचं ‘टिटिएमएम’ सुरू आहे.”
“केदार, हा ‘टिटिएमएम’ काय प्रकार आहे?”
“अगं, म्हणजे ‘तुझं तू माझं मी’. ती काय करते, कुठं जाते, कधी जेवते, कधी झोपते, हे मी तिला विचारत नाही आणि ती मला विचारत नाही.”
हेही वाचा : Women in Space: अंतराळात महिला मासिक पाळीचे व्यवस्थापन कसे करतात?
“असलं कसलं रे तुमचं नातं? नवरा बायकोच्या नात्यात कधी असं ‘टिटिएमएम’ असतं का? तुमच्या दोघांचे लव्ह मॅरेज आहे, लग्नाच्या अगोदर जवळ जवळ पाच वर्षं तुम्ही एकमेकांना ओळखत होतात. तेव्हा प्रत्येक क्षण एकमेकांशी शेअर करायचात, एकमेकांना भेटल्याशिवाय एक दिवसही जायचा नाही.’ आम्ही एकमेकांशिवाय राहू शकत नाही, आम्ही एकमेकांसाठीच बनलेले आहोत,’ असं दोघांनी एकमेकांच्या आईवडिलांना सांगून त्यांच्या मनाविरुद्ध हट्टानं तुम्ही लग्न केलंत, मगं ते प्रेम कुठं आटलं?”
“वहिनी, लग्न झाल्यानंतर केतकीमधली प्रेयसी हरवून गेली आणि ती टिपिकल बायको झाली. तू हे करू नकोस, तू ते करू नकोस, तू इकडं जाऊ नकोस आणि तिकडं जाऊ नकोस. हे काय? असली बंधनं मला नाही आवडतं. मी माझ्या जगण्याचा रिमोट तिच्या हातात कशाला देऊ? आमची भांडणं होऊ लागली. घटस्फोट घेऊ या’इथपर्यंत मजल गेली, पण आपणच हट्टानं केलेलं लग्न मोडलं तर आई वडील, नातेवाईक काय म्हणतील? याचा विचार करून शेवटी आम्ही तडजोड केली आणि एकत्र राहायचं ठरवलं. एकाच घरात राहिलो तरी एकमेकांच्या कोणत्याही बाबतीत लक्ष घालायचं नाही, असं ठरवलं. घरातील अर्धा खर्च मी करतो, अर्धा खर्च ती करते. घरात स्वयंपाकासाठी बाई येते, घरातील स्वच्छता करायलाही बाई येते. उरलेली तिची कामं ती करते, माझी मी करतो. आता आमच्यात वाद होत नाहीत. तिचं आयुष्य ती जगते, माझं आयुष्य मी जगतो.”
हेही वाचा : Olympics 2024: महिला प्रशिक्षकांचा टक्का कमी का?
“केदार हे काय? नवरा-बायकोच्या नात्यात थोडी भांडणं, थोडे रुसवे फुगवे, मतमतांतरे नक्की असतात, पण ती तात्पुरती असावीत रे, वर्षांनुवर्षं तुम्ही एकमेकांशी बोलत नाही म्हणजे काय? नुसतं एका भिंतीत एकत्र राहणं म्हणजे संसार असतो का? प्रेमात तुम्ही एकमेकांना माफ करता, पण लग्नानंतर हे का घडतं नाही? आता आमच्या छोट्या राजचं उदाहरण घे. एखादं खेळणं हवं असेल तर तो इतका हट्ट करतो, ते मिळेपर्यंत त्याला दुसरं काहीही सुचतं नाही आणि ते खेळणं घरी आणल्यानंतर दोन-चार दिवसांतच ते कुठंतरी पडलेलं असतं. ज्या खेळण्यासाठी त्यानं हट्ट केलेला असतो, त्या खेळण्याकडं तो नंतर ढुंकूनही बघत नाही. तुमच्या नात्याचं असंच झालंय. अजूनही तुम्ही बालिशपणे वागता. नात्यातील प्रगल्भता अजूनही तुम्हांला समजलेली नाही. लग्न झाल्यानंतर प्रियकराचा नवरा आणि प्रेयसीची बायको होणारच आहे, याची मानसिक तयारी का झालेली नसते? लग्न झाल्यानंतर एकमेकांवर हक्क दाखवणं, अपेक्षा ठेवणं यातही प्रेम असतंच. सगळंच आपल्याला हवं तसं मिळत नाही, पण जे मिळालं आहे, त्याचाही आनंद घेता यायला हवा आणि जे मनासारखं होत नाही त्याकडं दुर्लक्ष करण्याची, ते स्वीकारण्याची तयारी व्हायला हवी. नुसतं समाजाला दाखवण्यासाठी एकत्र राहू नका. एकमेकांवर तुम्ही प्रेम केलेले दिवस आठवा. प्रेम एवढं तकलादू असतं का रे? आयुष्यात कितीही वादळं आली तरी एकमेकांना साथ देणं, सोबत करणं, एकमेकांप्रति प्रेम, जिव्हाळा टिकवून ठेवणं हे खरं प्रेम. एकमेकांना माफ करायला शिका आणि लग्न-संसार याचा खरा अर्थ समजून घ्या.”
हेही वाचा : सुरक्षा महत्त्वाची! महिलांच्या सुरक्षेसाठी ‘हे’ Apps प्रत्येकीकडे हवेतच
वहिनीचं बोलणं केदार मनापासून ऐकत होता. एकत्र राहूनही एकटेपणाचं आयुष्य जगण्याचा त्याला त्रास होत होता, असाच त्रास केतकीलाही होत असणारं, तिनं बोलण्याचा प्रयत्न केला तरी आपण आपल्या अहंकारामुळं तिच्याशी बोललो नाही, याचं त्यालाही वाईट वाटलं, पण आता नक्की सुधारणा करायची असं त्यानं ठरवलं आणि केतकी ऑफिसमधून निघाली की नाही हे जाणून घेण्यासाठी त्यानं तिला फोन लावला…
(लेखिका कौटुंबिक न्यायालयात समुपदेशक आहेत.)
(smita joshi606@gmail.com)