“अनु, तुला मी कितीवेळा सांगितलं, इंस्टाग्रामवर पोस्ट टाकताना, फोटो टाकताना काळजी घेत जा, पण तू पुन्हा पुन्हा तेच करतेस.”
“ रवी, मीही तुला किती वेळ सांगितलंय, माझ्यावर असली बंधनं घालायची नाहीत. ऑफिसमधील सक्सेस पार्टीत आम्ही एन्जॉय करतो आणि सर्वचजण सोशल मिडीयावर पोस्ट टाकतात. त्यात बिघडलं कुठं?”
“ हो मान्य, तुला मी आत्तार्यंत कोणत्याच गोष्टीसाठी थांबवलं नव्हतं आणि थांबवणारही नाही, पण आता आपलं लग्न होऊन वर्ष झालंय. आणि जे फोटो तू मीडियावर टाकले आहेस. तुला नाही का वाटत का की ते बघून आई-बाबांना वाईट वाटू शकतं.”
“तुला मी लग्नाआधी या सर्व गोष्टींची कल्पना दिली होती. आयटी क्षेत्रात काम करताना तेथील कल्चरशी जुळवून घ्यावं लागतं. तिथल्या पार्टी कल्चरची तुलाही माहिती आहे. तूही करतोस. मग मला का थांबवतो आहेस? बायको म्हणजे तुझ्या हक्काची प्रॉपर्टी असल्यासारखा. अरे, मी सुशिक्षित करिअरिस्ट मुलगी आहे. मला माझे विचार आहेत आणि मला माझ्या हक्कांची पूर्ण जाणीव आहे त्यामुळं अशी बंधनं माझ्यावर लादू नकोस. मला जे योग्य वाटतं ते मी करणार.”
हेही वाचा >>>महिलांसाठीची ड्रोन पायलट योजना नेमकी काय आहे ?
“ अनु, हे बघ मीही पार्टी करतोच, परंतु दारू पिऊन किंवा धुडगूस घालत एकतर मी नाचत नाही. आणि त्याचे फोटो तर अजिबातच पोस्ट करत नाही. थोडं आपल्या घरातल्या मोठ्यांसाठी जबाबदारीनं वागायला हवं. तुझ्या आई-वडिलांना आवडतं का हे?”
“ रवी, मला माझं स्वातंत्र्य हवंय आणि माझ्या खासगी आयुष्यात कोणाचाही हस्तक्षेप मला नकोय हे मी आधीच सांगितलं होतं. यापुढं असल्या फुटकळ विषयावरून माझ्याशी वाद घालू नकोस. माझ्या जबाबदाऱ्या कशा पार पाडायच्या ते मी पाहीन. मला उशीर होतोय. माझं महत्वाचं प्रेझेन्टेशन आहे. मी निघते.”
रवीचं बोलणं मध्येच तोडून अनु ऑफिसला निघून गेली आणि तो एकटाच विचार करीत बसला. लग्न झाल्यावरही आमच्या घरी तुला पूर्ण स्वातंत्र्य मिळेल हे लग्नापूर्वी खरंच त्यानं सांगितलं होतं. आपलं नक्की काय चुकतंय हेच त्याला कळतं नव्हतं. स्वातंत्र्य तिला नक्कीच आहे, पण मग कसंही वागणं, हे स्वातंत्र्य असतं का? आई बाबांना हे बघून काय वाटतं असेल? ते मला काहीच बोलत नाहीत पण परवा आत्याने तिचे फोटो आईला दाखवल्यानंतर आई किती नाराज झाली हे मी बघितलं आहे. आयटी कंपनीत मोठ्या पदावर काम करणारी माझी सून याचा तिला नक्कीच अभिमान आहे, पण तेथील हे कल्चर तिला खरंच माहिती नाही. तिला धक्का बसणं साहजिकच आहे. घरातील कोणत्याही जबाबदाऱ्या ती अनुवर टाकत नाही. तिला सगळं वेळेवर देते, तिची मर्जी सांभाळते मग अशा व्यक्तींच्या समाधानासाठी तरी काही गोष्टीत आपण बदल करावा, हे अनुला का समजत नाही?
रवीच्या मनातील खळबळ आत्याने जाणली होती. ती त्याच्या जवळ आली, त्याच्या डोक्यावरून हात फिरवला आणि म्हणाली, “रवी, फार विचार करत बसू नकोस. हळू हळू बदल होईल.”
“आत्या, आपलं चुकतंय हे तिला का समजतं नाही?”
“रवी, काही लोक अशी का वागतात? हे शोधायचं असेल तर तुला त्यातील मानसशास्त्र समजून घ्यावं लागेल. लहानपणापासून आपण जे अनुभवत असतो. पालक आणि शिक्षक यांच्याकडून जे शिकतो ते आपल्या मनात राहिलेलं असतं आणि मोठेपणीही आपण तसंच वागतं असतो. ‘कौतुकाची थाप मिळवायची असेल तर समोरच्याला आवडेल असं वागावं,’ ही टेप काहींच्या मनात असते तर,‘कौतुक मिळवण्यासाठी, वाहवा मिळवण्यासाठी प्रदर्शन करावं,’अशी टेपही काही व्यक्तींच्या मनात असते. खूप लाईक मिळवण्यासाठी. कौतुक मिळवण्यासाठी लोक सतत आपल्या व्हाट्सॲपचे स्टेटस बदलत राहतात. सोशल मीडियावर पोस्ट टाकत राहतात. सर्वांनी आपलं कौतुक करावं, आपल्या प्रत्येक कृत्याला लाईक करावं यासाठी त्यांचं मन आसुसलेलं असतं. यामध्ये आपलं काही चुकतंय असं वाटतंच नाही,पण जबाबदारीची जाणीव आणि अनुभव यायला लागल्यावर स्वतःमध्ये बदल घडवून आणण्याची प्रक्रिया सुरू होते. तू चिडचिड करू नकोस. नाराज होऊ नकोस. अनू जेव्हा शांत असेल. आपल्या वागण्याचा परिणाम काय होतो आहे याचा विचार करण्याची तिची मानसिकता असेल तेव्हा तिला समजावून सांग. ती घाईत असताना असे विषय काढलेस तर ती तुझं ऐकून घेणार नाही. पती पत्नीच्या नात्यात या खूप छोट्या गोष्टी असतात, पण त्या सांभाळायच्या असतात तर या नात्यात समज-गैरसमज कमी होतात.”
आत्याशी बोलल्यानंतर काही गोष्टी रवीच्या लक्षात आल्या, पण आपलंही चुकलंच हे लक्षात आलं. संवाद चांगला होण्यासाठी, आपलं म्हणणं दुसऱ्यापर्यंत पोहोचण्यासाठी काही गोष्टींची वेळ सांभाळावी लागते, आपलं बोलणं ऐकून घेण्याची समोरच्याची मानसिकता आहे का? याचाही विचार करावा लागतो, चिडचिड करून मार्ग निघणार नाही. संयम ठेवणं गरजेचं हे त्याला पटलं होतं.”
(लेखिका कौटुंबिक न्यायालयात समुपदेशक आहेत.)
(smita joshi606@gmail.com)