डॉ. मेधा ओक
महिलांमधील थायरॉइडच्या समस्या, त्याचे प्रकार, त्याची लक्षणे तसेच हायपोथायरॉइडीझम या विषयीची माहिती आपण पहिल्या लेखामध्ये पाहिली. या लेखात आपण हायपरथायरॉइडीझम विषयी जाणून घेऊ यात.
हायपरथायरॉइडीझम या आजारात T3, T4 हे हार्मोन्स खूप अधिक प्रमाणात तयार होतात व रक्तात मिसळतात आणि गरजेपेक्षा अधिक झाल्याने रुग्णाला त्रास होतो. थायरॉइडला सूज आल्यास त्याला थायरॉइडायटिस (Thyroiditis) असे म्हणतात. विषाणू संसर्गाने ग्रंथी अधिक काम करते, तसेच गर्भारपणात ग्रंथी अधिक काम करते त्यामुळे विषाणू संसर्ग झाल्यास किंवा गर्भारपणात T3, T4 मधे बदल दिसतात. तसेच आहारातून, औषधातून अधिक प्रमाणात आयोडीन सेवन केल्यास हायपर थायराॅइड स्थिती निर्माण होते.
इथे हा आजार तात्पुरता असतो व पूर्ण बराही होतो. पण जर पिट्युटरीमध्ये वा थायरॉइडमध्ये टाॅक्सिक गाॅयटर किंवा कॅन्सर असल्यास मोठी समस्या होते निर्माण होते. त्यासाठीचा इलाज निराळ्या पद्धतीने होतो. ग्रावज् डिसीजमुळे (Grave’s Disease) म्हणजे अॅण्टिबाॅडीज तयार झाल्यामुळे थायराॅइड ग्रंथी खूप हार्मोन्स रक्तात सोडते.
हायपर थायरॉइडचा त्रास हा २० ते ५० या वयोगटात जास्त संभवतो. स्त्रियांमध्ये हा आजार अधिक प्रमाणात दिसतो. काही प्रमाणात अनुवंशिकताही त्यास कारणीभूत ठरते.
लक्षणे
हायपरथायरॉइडची लक्षणे खालील प्रमाणे दिसतात. –
प्रमाणाबाहेर वजन कमी होणे (उदाहरणार्थ – (आहार व व्यायाम न करून सुद्धा पाच ते दहा किलो वजन दोन महिन्यात कमी होेते)
गाॅयटर : गळ्याशी गाठ दिसणे,
धडधड वाढणे, कापरे भरणे, हात थरथरणे
प्रचंड भीती वाटणे (Anxiety), चंचलपणा, अस्थिरता. पाळी बरोबर न येणे
अतिजुलाब होणे, अशक्तपणा जाणवणे,
डोळे मोठे दिसू लागणे, खूप घाम येणे
रक्तदाब आणि मधुमेह अनियंत्रित होणे
५० वर्षावरील ८ टक्के पुरुषांना हृदयविकाराचा त्रास होऊ शकतो. २० ते ४० टक्के लोकांना डोळ्याचा त्रास होतो.
कोणत्या चाचण्या कराव्यात?
इथेही T3, T4, TSH हीच चाचणी सर्वात महत्त्वाची. Graves मधे TSAb thyroid stimulating autoantibody ही टेस्ट करतात. गाॅयटर असल्यास सोनोग्राफी उपयुक्त ठरते तसेच गरज असल्यास बायोप्सी करतात. आजाराची व्याप्ती किती ते जाणून घेण्यासाठी CT/MRI फायदेशीर ठरते.
उपचारानंतर ही TSH सामान्य होण्यास बराच अवधी लागतो. वजन वाढणे, धडधड, थरथर कमी होणे व जुलाब कमी होणे ही लक्षणे यशस्वी उपचाराचे संकेत देतात. रुग्णाला आराम वाटतो तीन ते चार आठवड्यात बरे वाटते. दीड ते दोन वर्ष सतत औषधोपचार केल्यास थायरॉईड सामान्य/पू्र्ववत होते. क्वचित सर्जरीने ट्युमर काढून टाकावा लागतो किंवा आर ए आय (RAI) या उपचाराची गरज भासते. RAI काही ठरावीक हाॅस्पिटलमधे देतात.
अॅण्टिथायरॉइड गोळ्या : मेथिमेझाँल, कारबीमेझाँल, PTU, व बीटा ब्लॉकर्स ही औषधे वापरली जातात. रुग्णाला बरे वाटू लागले व T3, T4, TSH ची पातळी सामान्य झाली की डोस तसे बदलत जातात. दीड-दोन वर्षांनी औषध कधी कधी थांबवले जाते. एकदम औषध बंद केल्यास परत त्रास होऊ शकतो त्याला रिलॅप्स (Relapse) असे म्हणतात. क्वचित एखाद्या रुग्णाला तीन ते चार वर्षांनी, पूर्ण बरे झाल्यावर सुद्धा परत त्रास उद्भवतो.
कोणती काळजी घ्याल?
हायपरथायरॉइडमध्ये आयोडीन नसलेले मीठ वापरायला सांगतात. पौष्टिक अन्न खाण्यास सांगितले जाते. समुद्री मासे किंवा अंड्याचा पिवळा बलक, चॉकलेट, सोया, कॉफी, कँफेनयुक्त पदार्थ वर्ज्य करावेत. धूम्रपान आणि दारू पासून लांब राहणे केव्हाही इष्ट ठरते.