पूजा सामंत
सिद्धार्थ रॉय कपूर- एक आघाडीचे निर्माते आणि विद्या बालनचे पती. त्यांच्या बॅनरमध्ये विद्या कधी दिसणार? या प्रश्नावर बोलताना विद्यानं आपण सिद्धार्थची निर्मिती असलेल्या चित्रपटांत काम करणं टाळत असल्याचं, असं स्पष्ट केलं.
“सिद्धार्थ आणि मी विभिन्न विचारसरणीच्या व्यक्ती आहोत. आम्ही पती-पत्नी म्हणून एकमेकांना अनुरूप आहोत, पण सिद्धार्थच्या सेटवर आमच्यात ‘क्रिएटिव्ह डिफरन्सेस’ होऊ शकतात. अशा मतभेदांचं मळभ घेऊन घरी येणं हे लक्षण संसार टिकवण्याच्या दृष्टिकोनातून योग्य ठरणार नाही! त्यामुळे मला त्याच्या प्रॉडक्शनमध्ये फिल्म करायची नाही. त्याच्याबरोबर फिल्म करण्यापेक्षा त्याच्यासोबत आयुष्य घालवणं मला योग्य वाटतं.” असं ठाम मत विद्यानं मांडलं.
नुकताच विद्याची प्रमुख भूमिका असलेला अनु मेनन दिग्दर्शित ‘नियत’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या निमित्तानं झालेल्या भेटीत विद्या बोलत होती.
विद्याचा पहिला चित्रपट- ‘परिणिता’ २००५ मध्ये प्रदर्शित झाला. तिच्या कारकिर्दीला १८ वर्षं झाल्या निमित्तानं तिला या काळात कोणत्या तारकांशी स्पर्धा जाणवली का? तिची ‘रायव्हल’ कोण? असा प्रश्न विचारला गेला. विद्या म्हणाली,“यकीन मानिये, मेरी किसी से कोई कॉम्पिटिशन नहीं! माझ्या घरी मी अभिनयात यावं याला कडक विरोध होता. मला अभिनयाची कसलीही पार्श्वभूमी नव्हती. परदेशात तर नाहीच, पण आपल्या देशातही मी कुठे अभिनयाचा कोर्स केलेला नाही. झेवियर्स कॉलेजमध्ये असताना दिग्दर्शक प्रदीप सरकार यांनी मला काही जाहिरातींमध्ये संधी दिली आणि पुढे मी दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत प्रयत्न केले, पण ‘अपशकुनी कलाकार’ असा शिक्का बसून माझी तिथून बोळवण झाली. पुन्हा एकदा प्रदीप दादा (दिवंगत दिग्दर्शक प्रदीप सरकार) यांनी विधू विनोद चोप्रांच्या ‘परिणीता’साठी माझ्या नावाची शिफारस केली. अनेक दिव्यांना तोंड दिल्यानंतर सुरु झालेला माझा अभिनयाचा प्रवास मग थांबला नाही. ज्या संधी मला मिळाल्या, त्यात माझी विजिगिषु वृत्ती, धडपड, जिद्द होती. ‘डर्टी पिक्चर’ माझ्या कारकिर्दीतला एक मैलाचा दगड ठरला. हा चित्रपट करताना मला दडपण होतं अप्पांचं (वडील)! त्या चित्रपटाच्या प्रीमियरनंतर त्यांना न भेटताच मी निघाले. त्यांनी मेसेज करून माझा अभिनय त्यांना आवडल्याचं सांगितलं, तेव्हा माझे डोळे भरून आले. माझा ‘मार्ग एकला’ होता आणि आजही तसंच आहे. जे चित्रपट माझ्या नशिबात लिहिले आहेत ते मला मिळणारच! ‘इश्किया’ हा चित्रपट अनेकींनी नाकारला होता, पण मी स्वीकारला आणि तो खूप यशस्वी झाला. मैं मानती हूँ, दाने दाने पर लिखा हैं खाने वाले का नाम!”
विद्या स्वतःला ‘कॉन्ट्रोव्हर्सीज’पासून दूर कसं ठेवते, या प्रश्नावर ती म्हणाली, “मी एक बोअरिंग व्यक्ती आहे! पार्टी-इव्हेंट्सपासून मी दूर असते. चित्रपटाच्या सेटवरचं काम झालं, की घरी पळते! माझी बॉलिवूडमध्ये कुणाशीही मैत्री नाही. गॉसिपपासून कटाक्षानं मी स्वतःला दूर ठेवते. माझ्या मनातल्या भावना मी फक्त आणि फक्त पती सिद्धार्थ, माझे आई-वडील, बहीण प्रिया यांच्याकडे व्यक्त करते. माझं ‘फ्रेंड सर्कल’ आहे, पण ते विदेशात स्थायिक आहेत. त्यांच्याशी फोनवर बोलते. कुटुंबाशी गप्पा मारणं, सिद्धार्थ आणि माझ्या कुटुंबाबरोबर फिरायला जाणं हीच माझ्यासाठी ‘रिलॅक्सेशन थेरपी’ आहे आणि मला त्यातच आनंद मिळतो. त्यामुळेच कदाचित मी ‘काँट्रोव्हर्सीज’मध्ये नसते!”
‘नियत’ चित्रपटात विद्यानं ‘सीबीआय ऑफिसर मीरा राव’ ही व्यक्तिरेखा साकारली आहे. ॲमेझॉन प्राईम व्हिडिओ आणि विक्रम मल्होत्रा यांची संयुक्त निर्मिती असलेल्या या चित्रपटात राम कपूर, राहुल बोस, नीरज काबी, शहाना गोस्वामी, निकी अनेजा, दीपन्निता शर्मा, अमृता पुरी, प्राजक्ता कोळी आणि विशेष भूमिकेत शेफाली शाह आहे. हा एक ‘थ्रिलर-मर्डर मिस्ट्री’ चित्रपट आहे.