मी लग्नाआधीच ठरवलं होतं आणि तशी नवऱ्यालाही कल्पना दिली होती की मी लग्नानंतर माझं नाव बदलणार नाही. सुरुवातीला मला वाटलं की याला सहसा कोणी विरोध करणार नाही. हल्ली मुली नाव बदलत नाहीत आणि हे आता जवळपास समाजमान्य झालंय. पण अनपेक्षितरित्या माझ्या नाव न बदलण्याच्या निर्णयाला विरोध झाला. त्यामुळे सासरच्यांना समजेल अशा शब्दांत मला माझं म्हणणं मांडावं लागलं.

नाव बदलणं म्हणजे ओळख बदलण्यासारखं आहे. यात सासरच्या आडनावाची लाज वाटण्यासारखं काही नसतं. माझा हाच मुद्दा मी वारंवार सासरच्यांना पटवून देण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना तो पटत नव्हता. लग्न होऊन आमच्याकडे आली आहेस, त्यामुळे आता इथलंच नाव लावायचं, असा अट्टाहास सुरू झाला. सासरचं नाव लावण्याला माझा विरोध नव्हता तर नाव बदलल्यामुळे माझी ओळख बदलणार होती, त्यामुळे माझा विरोध होता. करिअरच्या दहा वर्षांच्या काळात मी ज्या नावाने ओळखले जात होते, ज्या नावाने माझी ओळख तयार झाली होती ती ओळख मी का बदलावी? असा माझा प्रश्न होता. मी माझ्या मतावर ठाम आहे असं सासूंना समजल्यावर त्यांचा पारा चढला.

हेही वाचा >> Marriage Certificate : विवाह प्रमाणपत्र नसल्यास विवाहित महिलांना काय अडचणी येऊ शकतात?

त्या म्हणाल्या, “नाव बदलायचंच नव्हतं तर लग्न का केलंस?” मी म्हटलं, “लग्नानंतर नाव बदलायचंच असतं असं कुठे लिहून ठेवलंय?” तर त्या म्हणाल्या की, “आजवर हेच चालत आलंय. आम्हीही तेच केलं ना.” मी त्यांना म्हणाले, “त्यावळेची गोष्ट वेगळी होती. आताची स्थिती वेगळी आहे. तुम्ही पूर्णवेळ गृहिणी होतात. मी शिक्षण घेऊन, नोकरी करून माझं नाव कमावलं आहे. आणि माझं म्हणणं इतकंच आहे की व्यावसायिक आयुष्यात मी माझं नाव बदलणार नाही. म्हणजेच, कायदेशीर नाव बदलणार नाही. बाकी इतर ठिकाणी मी सासरचंच नाव लावते की. त्यात प्रोब्लेम काय?” त्यावर त्या म्हणाल्या, “मग तू आमची सून आहेस हे कसं कळणार?” त्यांच्या या प्रश्नावर काय उत्तर द्यावं हे मला कळतंच नव्हतं.

हेही वाचा >> लग्नानंतर महिलांनी नाव बदलावं का? कायदा नेमकं काय सांगतो? वकिलांनी सांगितली नेमकी तरतूद!

मग मी त्यांना म्हणाले, “तुम्हाला तुमच्या माहेरच्या नावाने कोणी हाक मारली तर तुम्हाला कसं वाटतं?” त्या म्हणाल्या, “छान वाटतं. माहेरचं नाव प्रत्येक मुलीसाठी आठवणीचं गाठोडंच असतं. त्या नावाने कोणी हाक मारली तरी मन भूतकाळात रमतं.” मग मी म्हणाले, “अगदी बरोबर. तुम्हाला तुमचं माहेरचं नाव प्रिय आहे. पण म्हणून तुमचं सासरच्या नावावरचं प्रेम कमी होतं का? नाही ना. माझंही अगदी तसंच आहे. तुम्हाला माझं नाव घेता येत नाही तुम्ही लग्नानंतर माझं नाव तुमच्या सोयीने ठेवलं. मी त्याला विरोध केला का? नाही ना. तुमचा मान राखावा म्हणून मी माझं नाव बदललं. त्या बदललेल्या नावाने तुम्ही फार क्वचित हाक मारत असलात तरी तेव्हा मी याला विरोध केला होता का? नाही ना. म्हणजेच मला सासरच्या नावाचा तिटकारा, राग किंवा कमीपणा नाही. पण माहेरच्या नावामुळे माझी एक ओळख तयार झाली आहे. समाजात मला त्या नावाने ओळखलं जातं. त्यामुळे मला माझं नाव बदलायचं नाही. इतकंच आहे.” माझ्या या स्पष्टीकरणावर त्यांचं समाधान झाल्याने त्यांनी माझ्या निर्णयाला त्यांचा विरोध असला तरीही पाठिंबा दिला.

-अनामिका