माझे मेन्टॉर अर्थात माझे बाबा, अरुण पाटणकर. त्यांनी दिलेल्या पुस्तकी ज्ञानाइतकेच किंबहुना त्याहून अधिक मोलाचे ठरणारे पाच ‘लाइफ मंत्र’ माझ्या यशस्वी आयुष्याचा मजबूत पाया ठरले आहेत.
माझ्या प्रशासकीय अधिकारी या करिअरचे खरे शिल्पकार माझे वडील! तेच माझे खरेखुरे मेन्टॉर! अर्थात त्यांनी मला जे शिकवलं ते अनुभवांच्या पुस्तकांतून! त्यामुळे लिखित पुस्तकांच्या विश्वाबाहेरचं व्यापक विश्वच मी त्यांच्यामुळे अनुभवलं!
अरुण पाटणकर माझे वडील. ते पदोन्नती होत प्रशासकीय अधिकारी झाले. थेट आयएएस ऑफिसरच्या समान पातळीवर. अशा पदोन्नतीने आयएएस ऑफिसर झालेल्या अधिकाऱ्याला तेवढी मान्यता मिळत नाही हे सत्य आपण अमान्य करू शकत नाही. कदाचित त्यामुळेच आपल्या मुलांनी थेट आयएएस ऑफिसर व्हावं ही त्यांच्या मनातली तीव्र इच्छा होती. ही गोष्ट ऐंशीच्या दशकातली! त्यांचे एक मित्र तेव्हा म्हणाले होते की, अरुण आणि विजया यांनी मुलीसाठी आयएएस ऑफिसर नवरा शोधण्याऐवजी तिलाच आयएएस ऑफिसर होण्याचं स्वप्न दाखवलं हे विशेष!
माझ्या बाबांनी आम्हा दोघा भावंडांना फक्त स्वप्नच नाही दाखवलं, तर ते पूर्ण करण्यासाठी काही ‘लाइफ मंत्र’सुद्धा दिले. तेव्हा मला त्यांच्या शिकवणुकीचं तेवढं महत्त्व नाही वाटलं! पण तीस वर्षांच्या प्रशासकीय सेवेत मात्र या शिकवणुकीचा मला पावलोपावली प्रत्यय येतो. मी ते क्रमशःच सांगते.
लाइफ मंत्र १ – त्यांनी पहिला धडा कधी शिकवला ठाऊक आहे? वयाच्या अवघ्या तिसऱ्या वर्षी! मी माझ्या चिमुकल्या हातांनी घातलेल्या सतरंजीवर सुरकुत्या पडल्या होत्या. तेव्हा ते म्हणाले होते, what is worth doing is worth doing well! अर्थात जे काम करायचं ते चांगलंच करायचं. त्या बालवयात कदाचित मला त्याचा अर्थ कळला नसेल. पण पुढे आयएएसचा अभ्यास करताना अथवा माझ्या गेल्या तीस वर्षांतल्या प्रशासकीय सेवेत मी या लाइफ मंत्रांचा उपयोग केला आहे आणि आजही करत आहे. आज माझ्याकडे असलेला पर्यावरण विभाग असो किंवा अलीकडे माझ्यावर सोपवलेला राजशिष्टाचार विभाग असो. जे काम करायचं ते उत्तमच. ही त्यांची शिकवण मला या विभागांत काम करताना खूप उपयोगी पडते.
मध्यंतरी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा व त्यानंतर झालेला मंत्र्यांचा शपथविधी सोहळा! आपण टीव्हीवर हे सोहळे काही क्षणांसाठी पाहतो. पण त्यांचं अचूक नियोजन किती महत्त्वाचं असतं! मुख्यमंत्र्यांनी अलीकडेच मुंबईतल्या राजनैतिक अधिकाऱ्यांना मेजवानी दिली. याही सोहळ्याचं आयोजन माझ्या टीमच्या सहकार्यानं उत्तम झालं. त्यामध्ये अपार परिश्रम होतेच. पण नुसते परिश्रम नव्हे तर फोकस परिश्रम. त्यासाठी पेपरवर योजनाबद्ध नियोजन लिहून, पायरीपायरीने त्याची अंमलबजावणी करणं हे महत्त्वाचं! त्या मागे अर्थातच जे काम आपण हाती घेतोय ते उत्तमच झालं पाहिजे, ही बाबांची शिकवण होती.
लाइफ मंत्र २ – Let best not be the enemy of good. अर्थात उत्तम आणि अचूक कामाच्या अट्टहासापायी काहीच कृती न करणं हेही अयोग्य, असं बाबा म्हणत. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे माझा सध्याचा पर्यावरण विभाग! अतिशय गुंतागुंतीचा आणि क्लिष्ट विषय! या विभागांतील काम इतर विभागांशीसुद्धा संलग्न आहे. त्यामुळे एखाद्या मोठ्या योजनेची अंमलबजावणी अपेक्षेइतकी उत्तम नाही झाली, तरी किमान चांगलं काम तरी आपण करायला हवं याचं भान बाबांच्या शिकवणुकीतूनच मिळालं. त्यामुळे पर्यावरणपूरक वाहनांची योजना असो की “माझी वसुंधरा” योजना! आमच्या सर्वांच्या अत्यंत अभिनव संकल्पना या विभागातर्फे सहकाऱ्यांच्या मदतीने राबवल्या जातात.
“माझी वसुंधरा” या योजनेत आम्ही सर्वांनी निसर्गाच्या पंचतत्त्वांचा विचार केला. म्हणजे काय? तर पृथ्वीतत्त्वानुसार जमिनीवर हिरवाई पसरवूया, वृक्षारोपणाचा विस्तार करूया, वायुतत्त्वानुसार हवेच्या प्रदूषणाला आळा घालूया, अग्नितत्त्वानुसार सौरऊर्जेचा वापर करूया, जलतत्त्वानुसार जलसंधारण योजना राबवूया व नद्यांचं प्रदूषण कमी करूया आणि आकाशतत्त्वानुसार या सर्वच योजनांचा प्रचार आणि प्रसार करूया असं नियोजन आम्ही सर्वांनी मिळून केलं. पर्यावरणपूरक अशा या कल्पक योजना आम्ही २०२० पासून राबवत आहोत याचं मला खूप समाधान वाटतं. बाबांच्या या लाइफ मंत्रांमुळे पर्यावरण कृती या सुरुवातीला अत्यंत अवघड वाटणाऱ्या विषयांवर छोट्या छोट्या प्रयत्नाने आम्हाला दमदार सुरुवात करता येऊ शकली.
लाइफ मंत्र ३ – डेल कार्नेजीचं एक वचन बाबांचं खूप आवडतं होतं. when life gives you lemons make lemonade! प्रत्येक वेळी आपल्या मनासारखं घडेलच असं नाही. परिस्थिती अनुकूलच असेल असंही नाही. पण प्रतिकूल परिस्थितीतसुद्धा शांतचित्तानं पुढे कसं जायचं हा विचार महत्त्वाचा! प्रशासकीय सेवेत कदाचित मनासारखं पोस्टिंग नाही मिळणार प्रत्येक वेळी! पण जो विभाग मिळालाय त्यात विधायक व लोकोपयोगी काम कसं करता येईल हा विचार प्रत्येकाने करायला हवा असं ते नेहमी म्हणत.
लाइफ मंत्र ४ – त्यांचं आणखी एक वचन Walk tall slouch tall! आता शब्दशः अर्थ घेतला तर उंच असाल तर ताठपणे चाला. पोक काढून चालू नका असा होतो. पण बाबांच्या शब्दकोशांतला अर्थ मात्र वेगळाच होता. ते नेहमी म्हणत, विपरीत परिस्थितीत लोक टीका करतातच. पण त्याने नाउमेद न होता, आपल्या कर्तृत्वावर विश्वास ठेवून ताठ मानेनं चालत राहायचं. माझ्या प्रशासकीय सेवाकाळात असे प्रसंग अनेकदा येतात. त्यावेळी मला बाबांचा हा लाइफ मंत्र आठवतोच आणि मी स्वतःला सावरते.
लाइफ मंत्र ५ – माझ्या वडिलांचा आकर्षक व्यक्तिमत्त्व जोपासण्यावर खूप भर होता. म्हणूनच ते नेहमी म्हणत, dress Natty! अर्थात वेशभूषा नेहमी उत्तम हवी! मला ते खूप पटतं. प्रशासकीय अधिकारी म्हणून एखाद्या परदेशी पाहुण्यांना मी भेटते तेव्हा मी नेटकं व व्यवस्थित असणं गरजेचं असतं .कारण मी माझ्या महाराष्ट्राचंच नव्हे, तर माझ्या देशाचंही प्रतिनिधित्व करत असते. मी अजागळपणे, मलिन कपड्यांत त्यांना सामोरी गेले तर देशाची ही प्रतिमा मलिन होईलच ना! ठीक आहे. भपकेबाज कपडे नको घालायला! पण व्यवस्थित साडी परिधान करून तर मला जायलाच हवं! अर्थात त्यालाही अपवाद आहे.
काही वर्षांपूर्वी मुंबई महानगरपालिकेत मी रुजू झाले त्या पहिल्याच वर्षी मलेरियाने कहर केला होता. मी योजना सुरू केली “Fight The Bite!” ती एवढी यशस्वी झाली की आमच्या संपूर्ण टीमने युद्धपातळीवर काम करून एका वर्षात मलेरियाची साथ आटोक्यात आणली. आज तर त्याचं नामोनिशाण उरलं नाही. त्यावेळी आरोग्य विभागातर्फे आम्ही वस्त्यावस्त्यांमध्ये कॅम्प घेत असू. तेव्हा मात्र साधी वेशभूषाच अपेक्षित असे. तेवढं भान ठेवावंच लागतं सार्वजनिक जीवनात!
तर माझ्या प्रशासकीय सेवेत बाबांनी ज्या लाइफ मंत्रांची मला शिकवण दिली ती पुस्तकी ज्ञानाइतकीच किंबहुना त्याहून अधिक मोलाची वाटते मला! कारण त्या आधारावर मी आजवरची वाटचाल यशस्वीपणे करत आहे!