“सुरभी, कोकणातून विवेक काका आणि उज्वला वहिनी, विशालच्या लग्नाचे आमंत्रण देण्यासाठी उद्या येणार आहेत, अनायासे संक्रांत आहे, तर गुळाच्या पोळ्या करशील का?”
“आजिबात नाही. त्यांच्यासाठी तर मुळीच करणार नाही. ते पत्रिका द्यायला येतील तेव्हा तर मी घरातही थांबणार नाहीये. तुला तुझ्या काकांचा एवढा पुळका असेल तर तू त्यांना बाहेर जेवायला घेऊन जा आणि पंचपक्वान्न खाऊ घाल. मी तुला काहीही बोलणार नाहीये, पण त्यांच्यासाठी मी घरात काहीही करणार नाहीये.”
“अगं, पण घरात आलेल्या पाहुण्यांचे आदरातिथ्य आपण करायला हवं. त्यांच्या काही गोष्टी तुला आवडल्या नसतीलही, पण नाती तोडून चालतील का?”
“सौरभ, मला त्यांच्याशी कोणतंही नातं टिकवायचंच नाहीये. मी तुझ्या इतर नातेवाईकांशी अशी वागते का? सर्वांचे आदरातिथ्य करण्यात तुझ्यापेक्षा माझा पुढाकार जास्त असतो, फक्त विवेक काकांच्या बाबतीत मला काहीही करायला सांगू नकोस, तुला त्यांच्यासाठी काय करायचं ते कर, मी तुला अडवणार नाही, पण मी त्यांच्यासाठी काहीही करणार नाहीये.”
“सुरभी किती दिवस त्याच त्याच गोष्टी मनात ठेवणार आहेस? आपल्या लग्नाला १२ वर्ष झाली.आता तरी सोडून दे.”
“आयुष्यभर मी ते विसरू शकणार नाही. ते फक्त मला काही बोलले असते तर मी विसरलेही असते पण ते माझ्या आईवडिलांना बोलले. सर्वांसमोर त्यांचा अपमान केला होता.”
हेही वाचा… अविवाहित मुलींनाही घरगुती हिंसाचार कायद्याचा फायदा
सुरभीच्या मनातील काकांविषयीचा राग कमी करणं महत्वाचं होतं. त्याच गोष्टी पुन्हा पुन्हा आठवून सुरभी स्वतःलाच त्रास करून घेत होती. काका येणार म्हटल्यावर ते येण्यापूर्वी घरात राग आधी शिरायचा. वातावरण ढवळून निघायचं आणि सुरभीची धुसफुस सुरू व्हायची. कधीतरी हे आइस ब्रेकिंग होणं महत्वाचं होतं.
त्या दिवशी, रविवारची सुट्टी असल्यानं सुरभी घरातच होती. काका आणि काकू सकाळीच घरी आले. सौरभने स्वतः सर्वांसाठी चहा केला. राहुलच्या लग्नाचं आमंत्रण त्यांनी केलंच, पण ते म्हणाले,
“सौरभ, अरे तुझा संसार मार्गी लागला, तसा आता राहुलचा मार्गी लागू दे. तुला सुरभीसारखी सुशील संस्कारी पत्नी मिळाली, तू भाग्यवान आहेस, खरं तर नवीन पिढीतल्या सर्व मुलींनी सुरभीचा आदर्श डोळ्यासमोर ठेवायला हवा. आपला संसार, नाती ती जपतेच आणि हे सर्व बघून करीअरही करते. कुठंच कमी नाही. सून असावी तर सुरभीसारखी.”
काकांचे हे शब्द ऐकल्यानंतर सौरभला चांगलीच संधी मिळाली. तो म्हणाला, “काका, अहो, तुम्ही तर तिला आणि तिच्या आईवडिलांना संस्कार नाहीत, म्हणून आमच्या लग्नात बोलला होता, मग आता तिचं हे कौतुक कसं करताय?”
“तेव्हा मी काही बोललो होतो? माझ्या तर काहीच लक्षात नाही, आपल्या पद्धतीनुसार लग्न व्हावं म्हणून तेव्हा मी काही बोललोही असेन, मला तर काहीच आठवतं नाही.”
“काका, तेव्हा तुम्ही तिचा आणि तिच्या आईवडिलांचा अपमान केलात, याचं शल्य अजूनही तिच्या मनात आहे, तुम्ही येणार म्हटल्यावर हे सगळं तिला आठवतंच आणि त्याचा त्रासही होतो.”
“सौरभ, तू इतके दिवस मला काहीच का सांगितलं नाहीस, माझ्यामुळं ती दुखावली आहे, याची मला कल्पनाही नाही. काही वेळा आपण काही बोलून जातो, पण त्याचा दुसऱ्याला त्रास झाला असेल हे लक्षातही येत नाही, याबद्दल मी आताच सुरभीची माफी मागतो.”
हे सर्व सुरभी किचनमध्ये उभी राहून ऐकत होती. आपण या गोष्टीचा इतका बाऊ करायला नको होता असं काकांचं बोलणं ऐकून तिला वाटलं. तिच्या लक्षात आलं, काका स्वच्छ मनाचे होते, जे आवडलं नाही ते त्यांनी बोलून दाखवलं. मनात धरून ठेवलं नाही. पण मी मनात अढी धरून ठेवल्यामुळं मलाच मानसिक त्रास सहन करावा लागला, तोही १२ वर्षं. मलाही जे खटकलं ते मी काकांशी मोकळेपणाने बोलायला हवं होतं, पण आता चूक सुधारायची, असं तिनं ठरवलं.
संक्रांतीसाठी केलेले तिळाचे लाडू घेऊन सुरभी स्वतःच बाहेर आली आणि म्हणाली, “काका, तुम्ही मोठे आहात, माझी माफी मागायची काहीच गरज नाहीये. हा तिळगुळ घ्या आणि तुमचे आशीर्वाद मला द्या, हा गोडवा नात्यात कायम राहू देत.”
“माझे आशीर्वाद तुला अखंड आहेतच. जे झालं ते सोडून दे. तिळगुळ घे आणि गोडगोड बोल.”
सौरभने सुटकेचा निःश्वास सोडला, खऱ्या अर्थानं संक्रांतीचा सण साजरा झाला असं त्याला वाटलं.