IFA Officer Apala Mishra Success Story : कोणत्याही परीक्षेत यश मिळविण्यासाठी तुम्ही मानसिकदृष्ट्या खंबीर असणे खूप गरजेचे असते. मानसिकदृष्ट्या जर तुम्ही खंबीर असाल, तर कोणतेही ध्येय सहज साध्य करू शकता. अशीच एक कहाणी आहे डॉक्टर बनलेल्या आयएएस अधिकारी अपाला मिश्रा यांची. मानसिकदृष्ट्या खंबीर होत त्यांनी यूपीएससीची तयारी सुरू केली आणि ऑल इंडिया रँक ९ मिळवून आयएएस अधिकारी बनण्याचे स्वप्न पूर्ण केले. आज आपण आयएएस अधिकारी अपाला मिश्रा यांचा प्रवास नेमका कसा होता ते जाणून घेऊ..

आयएएस अधिकारी अपाला मिश्रा यांना पहिल्या दोन प्रयत्नांत यश मिळाले नाही. त्या यात प्रीलिमही पास करू शकल्या नाहीत. त्यानंतर मित्रांनी त्यांचे आयएएस अधिकारी होण्याचे स्वप्न ऐकून, त्यांची चेष्टा-मस्करी करण्यास सुरुवात केली. पण, त्यांनी या गोष्टी अजिबात मनाला न लावून घेतल्या नाहीत. त्या अभ्यास करीत राहिल्या. त्यानंतर त्यांनी जेव्हा तिसऱ्यांदा सिव्हिल सर्व्हिसेसची परीक्षा दिली, त्यावेळी अपाला मिश्रा यूपीएससी परीक्षा केवळ उत्तीर्णच झाल्या नाही, तर त्यांनी नवा इतिहासदेखील रचला.

मुलाखतीत सर्वाधिक गुण मिळविण्याचा विक्रम मोडीत

२०२० मध्ये अपाला यांनी यूपीएससीच्या मुलाखतीत २१५ गुणांसह सर्वाधिक गुण मिळविण्याचा विक्रम मोडला. यापूर्वी मुलाखतीत २१२ गुण मिळविण्याचा विक्रम होता. अपाला या २०१८ पासून यूपीएससीची तयारी करीत होत्या.

आयएएस अधिकारी अपाला मिश्रा या उत्तर प्रदेशातील गाझियाबादच्या रहिवासी आहेत. त्यांचे वडील भूदल अधिकारी आणि आई प्राध्यापिका आहे. त्यांना घरात सुरुवातीपासूनच अभ्यासाचे आणि शिस्तीचे वातावरण मिळाले. त्यामुळे लहानपणापासूनच त्या अभ्यासाबद्दल खूप गंभीर होत्या. त्यांनी इंटरमिजिएटनंतर बॅचलर ऑफ डेंटल सर्जरी (बीडीएस)ची पदवी मिळवली. परंतु, २०१८ मध्ये शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी नागरी सेवेत रुजू होण्याचा निर्णय घेतला. डॉक्टर होऊन आयएएस होण्यासाठी त्यांनी खूप कष्ट केले.

कोणाचेही योग्य मार्गदर्शन नाही

यूपीएससीमध्ये ९ वी रँक मिळाल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना अपाला यांनी इथपर्यंत पोहोचण्यासाठी योग्य मार्गदर्शन न मिळाल्याने खंत व्यक्त केली. त्या म्हणाल्या की, या परीक्षेसाठी इतका अभ्यास करावा लागतो की, अभ्यास कुठून सुरू करावा हेच लोकांना समजत नाही. आपण स्वतःला कमी लेखतो आणि निराश होतो. पण, कुठल्याही गोष्टीत लगेच चांगले परिणाम मिळत नाहीत; परंतु त्यासाठी आपल्याला धीर धरावा लागतो.

त्यानंतर पुढे त्यांनी एक किस्सा सांगितला, ज्या विषयात त्या स्वत:ला हुशार समजायच्या, त्याच गणित विषयाच्या परीक्षेत एकदा त्यांना खूप वाईट मार्क्स मिळाले होते. गुण कमी मिळाल्याने त्या खूप निराश झाल्या. ज्यावर त्या पुढे सांगतात की, या परीक्षांसाठी स्वत:ला समजून घेणे आणि स्वीकारणे अत्यंत आवश्यक आहे. तुमची कुणाशीही तुलना करण्याची गरज नाही. तुम्ही तुमच्यात काय उणिवा आहेत, त्या वेळीच स्वीकारायल्या हव्यात.

असा सुरू झाला आयएएस अधिकारी होण्याचा प्रवास

डॉक्टरकीकडून सिव्हिल सर्व्हिसेसकडे वळल्यावर, अपाला सांगतात की, त्यांना त्यांच्या आयुष्यातील काही गोष्टी पाहून किंवा अनुभवल्यानंतर आयएएस अधिकारी होण्याची प्रेरणा मिळाली. यावेळी त्यांनी आपल्या देशाच्या आरोग्य सेवा व्यवस्थेकडे बारकाईने पाहिले आणि त्यांना जाणवले की, त्याकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे. या कल्पनेने मला समाजात अधिक प्रभाव पाडण्यासाठी नागरी सेवांमध्ये करिअर करण्याची प्रेरणा दिली.

तयार केलेली रणनीती

अपाला सांगतात की, जेव्हा त्या त्यांच्या दंतवैद्यकीय अभ्यासक्रमाच्या शेवटच्या वर्षात होत्या तेव्हा त्यांनी नागरी सेवांमध्ये जाण्याची तयारी सुरू केली. अपाला यांनी यूपीएससी परीक्षेसाठी पर्यायी विषय म्हणून एंथ्रोपोलॉजी हा विषय निवडला होता. जेव्हा त्यांनी अभ्यास करण्याची तयारी सुरू केली, तेव्हा त्यांनी त्यांच्या अभ्यासावर १०० टक्के लक्ष केंद्रित करण्याचा संकल्प केला. वेळापत्रक बनवले. त्या रोज सात ते आठ तास अभ्यास करायच्या.

तयारीसाठी त्यांनी प्रथम कोचिंग क्लासेस लावले. या कोचिंग सेंटर्सची त्यांना मदतही झाली असती; परंतु शेवटी त्यांनी स्वतःचा अभ्यास स्वत:च केला पाहिजे, असे ठरवले. अपाला मिश्रा या प्रीलिम्स सेक्शनमध्येच खूप मागे पडत होत्या. आधीच्या दोन प्रयत्नांतही त्यांना प्रीलिम्समध्येच यश मिळवता आले नव्हते.

अभ्यासाबाबत अपाला मिश्रा सांगतात की, बेसिक पुस्तकांची शक्य तितक्या वेळा उजळणी केली पाहिजे. कारण- प्रत्येक वेळी तुम्ही पुन्हा तुम्ही ती पुस्तक वाचाल तेव्हा तुम्हाला वाचलेले काही विषय आठवणारही नाहीत. त्यामुळे तुम्ही ती पुस्तके सातत्याने वाचणे अत्यंत आवश्यक आहे.

तयारीदरम्यान विद्यार्थ्यांनी अतिआत्मविश्वास असलेल्या लोकांचा कमी सल्ला घ्यावा. याउलट स्वतःसाठी वेळ काढा. जे चांगले वाटेल, तेच करा.