डॉ. किशोर अतनूरकर
पाळणा लांबविण्यासाठी ज्या साधनांचा वापर केला जातो त्यात आत गर्भनिरोधक इंजेक्शनची भर पडली आहे. मात्र त्याचा प्रसार फारसा झालेला नसल्याने ते अनेकांना परिचित नाही. हे गर्भनिरोधक इंजेक्शन हॉर्मोन्सचं असून ते अतिशय परिणामकारक आणि सुरक्षित असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
गर्भनिरोधक इंजेक्शनचा वापर ही पाळणा लांबविण्याची अतिशय सुरक्षित आणि परिणामकारक पद्धत आहे. पण या पद्धतीचा वापर करताना काही अडचणीचा सामना करावा लागतो. त्या संभाव्य अडचणी कोणत्या या समजून घेतल्यास या पद्धतीची निवड करायची की नाही याचा निर्णय जननक्षम जोडप्यांसाठी सोपा होऊ शकतो. आपल्या देशात पाळणा लांबविण्यासाठी ज्या साधनांचा वापर किंवा पद्धतीचा अवलंब केला जातो त्यात प्रामुख्याने निरोध किंवा कंडोम, तांबी किंवा कॉपर-टी, गर्भनिरोधक गोळ्या या तीन पद्धतीचा समावेश करता येईल. अन्य काही ‘साधनं’ किंवा पद्धतीचादेखील वापर केला जातो परंतु त्या पद्धती या तीन प्रकारांइतक्या प्रचलित नाहीत. त्या अन्य साधनांपैकी एक म्हणजे गर्भनिरोधक इंजेक्शन.
हे गर्भनिरोधक इंजेक्शन हॉर्मोन्सचं असतं. ही अतिशय परिणामकारक आणि सुरक्षित पद्धत आहे. दर तीन महिन्यानंतर एक इंजेक्शन घ्यावं लागतं. या इंजेक्शनमुळे स्त्री-बीज परिपक्व होऊन फुटून स्त्री-बीजांडकोशाच्या (Ovary) बाहेर पडण्याची प्रक्रिया(ovulation) तात्पुरती काही कालावधीसाठी थांबते. गर्भधारणेसाठी स्त्री-बीजच उपलब्ध नसेल तर गर्भधारणा होणार नाही. इंजेक्शन घेणं बंद केल्यानंतर ही प्रक्रिया पुन्हा सुरु होते, पुन्हा गर्भधारणा होऊ शकते. इंजेक्शनचा वापर बंद केल्यानंतर गर्भधारणा लगेच होत नाही. त्यासाठी साधारणतः चार-सहा महिन्यांपेक्षा जास्त कालावधी लागू शकतो. मासिकपाळीच्या पाचव्या ते सातव्या दिवशी हे इंजेक्शन दिल्यास ते जास्त परिणामकारक ठरतं. या इंजेक्शनचा परिणाम सुरु होण्यास चोवीस तासांचा अवधी लागतो. इंजेक्शन दर तीन महिन्याला अगदी नियमितपणे घ्यावं लागतं. वेळेवर इंजेक्शन न घेतल्यास अर्थातच या पद्धतीचा व्हावा तसा उपयोग होणार नाही. या इंजेक्शनचा अन्य फायदा म्हणजे, रोज लक्षात ठेऊन गोळी घेण्याची कटकट थांबते. मूलबाळ असो व नसो, कोणत्याही वयाची स्त्री या पद्धतीचा वापर करू शकते. स्तन्यपान देणाऱ्या स्त्रियांसाठी बाळंतपणानंतर दीड महिन्यातच या पद्धतीचा उपयोग करता येतो. आईच्या दुधावर याचा परिणाम होत नाही. संभोग सुखाचा आनंद वाढू शकतो.
गर्भनिरोधक इंजेक्शनमुळे मासिकपाळीच्या स्वरूपात बदल होऊ शकतो. ते घेतल्यानंतर सुरुवातीच्या काळात अगदी कमी किंवा खूप रक्तस्त्राव असा प्रकार क्वचित प्रसंगी होऊ शकतो. एका वर्षाच्या कालावधीनंतर मासिकपाळी पूर्णपणे बंद होऊ शकते. काही स्त्रियांना मासिकपाळीची कटकट नाही म्हणून बरं देखील वाटतं. काही स्त्रियांना मासिकपाळी बंद झाली याचा अर्थ दर महिन्याला शरीराबाहेर पडणारं रक्त आतमध्ये साचून राहिल्यामुळे त्याच्या गाठी तर होणार नाही ना अशी भीती वाटत असते. असं काही होत नाही. तो एक गैरसमज आहे. गर्भनिरोधक इंजेक्शनचा आणखी एक परिणाम म्हणजे वजन वाढणं. या इंजेक्शन्समुळे दर वर्षाला सरासरी एक ते दोन किलो वजन वाढू शकतं. ज्या स्त्रियांचं वजन खूप कमी आहे किंवा त्यांची शरीरयष्टी किरकोळ आहे अशांना ‘दुष्परिणामाचा’ लाभ होऊ शकतो.
हेही वाचा : ऑलिम्पिकमध्ये पोटातल्या बाळासह तलवारबाजी करणारी इजिप्तची नदा हाफेज
पस्तीस वर्षांपेक्षा जास्त वयाच्या स्त्रियांनी, मधुमेह, उच्चरक्तदाब असलेल्या स्त्रियांनी या इंजेक्शनचा वापर करू नये. इंजेक्शनचा वापर बंद केल्यानंतर त्यातील ७५ टक्के स्त्रियांना एका वर्षात, तर उरलेल्यातील ९० टक्के स्त्रियांना दोन वर्षांत गर्भधारणा राहते. या इंजेक्शनमुळे कर्करोग तर होणार नाही ना? असं देखील विचारलं जातं. या इंजेक्शनमुळे कर्करोग तर होत नाही, उलट गर्भाशयाचा आणि स्त्री-बीजांडकोषाचा कर्करोग न होण्यास मदत होते. इंजेक्शन घेत असल्याच्या कालावधीत, ही पद्धती निरुपयोगी ठरून गर्भधारणा राहिल्यास आणि तो गर्भ वाढविण्याचा विचार केल्यास काही हरकत नाही. आपल्याकडे अद्याप या गर्भनिरोधक इंजेक्शनला अजून फारशी मान्यता मिळालेली नाही असं वाटतं. ग्रामीण भागात कार्यरत असलेल्या सर्व डॉक्टर्सना देखील या गर्भनिरोधक इंजेक्शन्सबद्दल आवश्यक ती माहिती नसल्यामुळे देखील या इंजेक्शन्सचा म्हणावा त्या प्रमाणात वापर होत नसावा.
हेही वाचा : बांबू, शतावरीच्या पौष्टीक भाज्या
बऱ्याच स्त्रियांना नियमित दर महिन्याला पाळी आली नाही म्हणजे आपली प्रकृती बिघडली असा गैरसमज असतो. या स्त्रिया गर्भनिरोधक इंजेक्शन घेण्याचं टाळतात. काही स्त्रियांना गर्भधारणा नको असते, पण पाळणा लांबविण्याचे साधन वापरण्याच्या बाबतीत पतीकडून सहकार्य मिळत नाही अशा परिस्थितीत त्या स्त्रिया डॉक्टरकडे येऊन दर तीन महिन्याला येऊन गर्भनिरोधक इंजेक्शन घेऊन जातात. घरी मात्र ताकद वाढविण्याचं घ्यायला गेलो होतो, असं सांगतात. असा आमच्यापैकी काही डॉक्टरांचा प्रत्यक्ष अनुभव आहे. अंतरा (Antara ) या नावाचं हे इंजेक्शन प्राथमिक आरोग्य केंद्र आणि अन्य शासकीय रुग्णालयातून गरजू जोडप्यांना मोफत दिल्या जातं.
( लेखक एम. डी. (स्त्रीरोग आणि प्रसूतिशास्त्र) तसेच पीएच.डी. (समाजशास्त्र) आणि एमएस (काउन्सेलिंग आणि सायकोथेरपी) आहेत.)
atnurkarkishore@gmail.com