सायकल प्रशिक्षणाच्या माध्यमातून महिलांचा हरवलेला आत्मविश्वास मिळवून देताना सामाजिक बांधिलकी जपायची हा एकमेव हेतू. यात पन्नाशी उलटलेल्या महिलांचा सहभागही खूप काही सांगणारा…

वयाची चाळीशी ओलांडली की आयुष्यात काही गोष्टी करायच्या राहून गेल्याचा सल मनात बोचत राहतो. एकीकडे वय वाढतंय याची जाणीव शरीर करून देत असतं, आणि मन मात्र पुन्हा मन उनाड दिवस शोधत असतं. पुन्हा एकदा ते मंतरलेले दिवस जगायची उर्मी आतून येत राहते. मग अशा भावनांच्या हिंदोळ्यातही राहुन गेलेली बकेट लिस्ट पूर्ण करण्याचा चंग बांधला जातो. संधी मिळताच ही स्वप्न प्रत्यक्षात येतात… ही स्वप्नही तशी साधी… डोळ्यात आनंद आणि ओठावर हसु फुलवणारी… नाशिक मधील अशा पन्नाशी, कुणी सत्तरी पार केलेल्या ध्येयवेड्या तरूणींनी सायकल शिकण्याची जिद्द बाळगली. नाशिक सायकल असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी या जिद्दीला खतपाणी घातलं आणि आज या महिला सायकलवरूनच रोजच्या कामांना जात आहेत.

महिला दिन म्हटल की व्याख्यान, परिसंवाद, पुरस्कार सोहळे, मनोरंजनात्मक खेळ असं बरंच काही. पण ही मळवाट ओलांडत मागील तीन वर्षांपासून मार्चच्या पहिल्या आठवड्यात नाशिक सायकल असोसिएशन महिलांना सायकल चालवण्याचे प्रशिक्षण देते. खरं तर आजच्या काळात सायकल चालवणं म्हटल्यावर अनेकाच्या भुवया उंचावतात. त्यातही प्रशिक्षण म्हटलं तर हा प्रश्न निकालात निघाला. मात्र पर्यावरण, आरोग्य यांचा विचार केला तर सायकल चालवणं कसं महत्त्वाचं आहे हे सर्वांना पटतही आहे. सायकल प्रशिक्षणाच्या माध्यमातून महिलांचा हरवलेला आत्मविश्वास मिळवून देताना सामाजिक बांधिलकी जपायची हा एकमेव हेतू. नुकत्याच या प्रशिक्षणात ५१ वर्षीय वैशाली मुळाणे यांनी सहभाग घेतला. त्या सांगतात, ‘‘लहानपणापासून मला सायकल शिकायची होती. एकत्रित कुटुंबात वाढल्यामुळे घरातील सायकल माझ्या वाटेला आलीच नाही. नंतर शाळेसाठी पाच-पाच किलोमीटर अंतर पायपीट होती. त्या वेळी सायकल खुणावायची. पण मुलींचं शिक्षण महत्त्वाचं नसल्यानं शिक्षणासाठी सायकल ही चैनीची गोष्ट घराला परवडणारी नव्हती. पुढे लग्न झाल्यानंतर कौटुंबिक जबाबदाऱ्यांमध्ये सायकल चालवणं राहून गेलं. सायकलऐवजी दुचाकी दामटली गेली. पण रस्त्यावरून जात असताना एखादा सायकलवाला दिसला की तुला सायकल यायला हवी असं मी स्वत:ला समजवायचे. मागील काही महिन्यांपूर्वी मुलीच्या बाळंतपणासाठी अमेरिकेत गेले होते. तेव्हा जावयाची सायकल कोपऱ्यात पडून होती. त्यांना सांगितलं, ‘मला सायकल शिकवा’ तर ते तयार होईनात. मुलीला सांगितलं तर ती म्हणाली, ‘तू सायकल शिकताना पडलीस तर तुला सांभाळू की मुलाला?’ त्यामुळे सायकल शिकणं राहून गेलं. पण नाशिकला आल्यावर या प्रशिक्षणा विषयी कळलं आणि यात पहिल्या दिवसापासून सहभागी झाले. नवऱ्याला सांगितलं, प्रशिक्षणात कमी वेळ सायकल हातात येते मला सायकल द्या. तर त्यांनी सांगितलं, ‘तू व्यवस्थित सायकल चालवते हे पाहू दे तुला लगेच सायकल घेऊन देतो.’ दोन ते तीन दिवसांत मी सायकल चालवायला शिकले. तोल साधता आला. त्याचा व्हिडिओ नवऱ्याला टाकला. आता सायकल द्या ही धमकी वजा मागणी केली. आश्चर्य महिला दिनाला माझी सायकल माझ्या दारात होती. आता सायकलवर रोज सराव सुरू असून संघटनेच्या वतीने आषाढीसाठी पंढरपूरला सायकलवारी निघते. त्या सायकलवारीत मी जाण्यासाठी सराव सुरू केला आहे.’’ मुळाणे आत्मविश्वासानं सांगतात.

दुसऱ्या म्हणजे मंदाताई येवले वय ७४… यांचा प्रवासच उलटा. जिल्हा परिषदेत कामावर जाण्यासाठी दुचाकी शिकल्या. सेवानिवृत्तीच्या वेळी चार चाकी भेट मिळाली. दुचाकी, चारचाकी चालवत असताना सायकल त्यांना खुणावत होती. सकाळी हास्य क्लबला जाताना सायकल असोसिएशनचे लोक सायकलवर जाताना दिसायचे. त्यांना थांबवून ‘मला सायकल शिकवाल का? मला सायकल येईल का?’ असं त्या सतत विचारायच्या. मग प्रशिक्षणाची माहिती मिळाली. प्रशिक्षण वर्गाला पहिल्या दिवशी सकाळी पावणेसहाला त्या आपल्या चारचाकी मैदानावर हजर होत्या. कुठली सायकल चालवता येईल याचा अंदाज घेत त्यांनी एक जुन्या पद्धतीची सायकल हातात घेतली. संघटनेच्या महिलांनी, पुरूषांनी त्यांना सायकल चालवायची कशी याची माहिती दिली. त्यानुसार त्या पुढील दोन ते तीन दिवसांत सायकल चालवायला लागल्या. आता घराच्या जवळपास त्यांना सायकल चालवायची आहे. कुटुंबातील सदस्य काय म्हणतात विचारले तर त्या सांगतात की नात म्हणते, ‘‘आजी खूप भारी’’. नवरा म्हणतो, ‘‘हात पाय सांभाळून काय चालवायचे ते चालव.’’ घरच्यांचा सल्ला शिरसावंद्य मानत घर ते हास्य क्लबला सायकलवर जाणार असल्याचं त्या सांगतात.