संपदा सोवनी
बहुतेक स्त्रियांना विविध प्रकारची कला-कौशल्य अवगत असतात. खूप जणी सुगरण असतात… केवळ इतकंच नव्हे, तर बाजारात उपलब्ध असलेल्या विविध विक्रीयोग्य वस्तू आणि सेवांचा अभ्याससुद्धा खूप स्त्रिया आपलाआपण करत असतात. आपणही एखादा लहानमोठा बिझनेस सुरू करावासा असं खूप जणींना वाटत असतं. पण तो पुढे यशस्वी होईल का, ही चिंता त्यांना सतावत असते.मात्र आता या चिंतेस दूर सारून स्त्रियांनी आत्मविश्वासानं ‘स्टार्ट-अप’च्या क्षेत्रात उतरावं, अशीच अनुकूल परिस्थिती दिसते आहे.
‘एसीटी’ आणि ‘मॅकिन्सी’ यांनी नुकताच एक सर्वेक्षण अहवाल सादर केला आहे. त्यानुसार भारतात कॉर्पोरेट क्षेत्रात स्त्रियांचा सहभाग जरी १९ टक्के असला, तरी भारतीय स्टार्ट-अपमध्ये मध्ये मात्र ३५ टक्के स्त्रिया आहेत. एवढ्यावरच हा अहवाल संपलेला नाही. खरी आनंदाची गोष्ट अशी, की देशातील १८ टक्के स्टार्ट-अप्समध्ये संस्थापक किंवा प्रमुख कार्यकारी अधिकारी (सीईओ) या भूमिका स्त्रिया निभावत आहेत. कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये अशा मोठ्या पदांवर स्त्रिया असण्याचं प्रमाण केवळ ५ टक्के आहे. हा निष्कर्ष काढण्यासाठी २०० हून अधिक स्टार्ट-अप कंपन्या विचारात घेतल्या होत्या. यात झोमॅटो, मिशो, अर्बन कंपनी, अशा मोठ्या कंपन्यांचाही त्यात समावेश होता. विशेष म्हणजे येत्या ७ वर्षांत, म्हणजे २०३० पर्यंत देशात स्टार्ट-अपमध्ये स्त्रियांचा टक्का चांगलाच वाढेल, असा अंदाज हा अहवाल वर्तवतो.
आणखी वाचा-नेते युद्ध करतात, बळी स्त्रियांचा जातो!
अहवालात वर्तवलेल्या अंदाजानुसार २०३० पर्यंत आपल्याकडच्या स्टार्ट-अपमध्ये ५० टक्के वाटा स्त्रियांचा होणार आहे. या प्रक्रियेत स्त्रियांसाठी २०३० पर्यंत २० लाख नवीन नोकऱ्या उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे. आता २०२२ मध्ये स्टार्ट-अप क्षेत्रात ८.६ लाख लोक काम करत होते आणि त्यातल्या ३ लाख स्त्रिया होत्या. स्टार्ट-अपमधल्या एकूण नोकऱ्या २०३० पर्यंत ४०.८ लाख होतील, अशी अपेक्षा आहे. त्यातल्या २० लाख- म्हणजे जवळपास निम्म्या नोकऱ्या स्त्रियांसाठी उपलब्ध होण्याची वर्तवली गेलेली शक्यता निश्चितच उद्यमी मनाच्या स्त्रियांच्या आशा उंचावणारीच!
कॉर्पोरेट कंपन्यांपेक्षा स्टार्ट-अपमध्ये कर्मचाऱ्यांना निर्णय घेण्याची मुभा अधिक प्रमाणात मिळते. परिणामस्वरूप कामं लवकर मार्गी लागण्याची शक्यता वाढते आणि चांगलं काम करणारी व्यक्ती लवकर प्रगतीची शिडी चढून जाते. याच प्रकारे स्टार्ट-अप्समध्ये कर्मचाऱ्याचं वय किंवा त्याला असलेला आधीचा अनुभव, यापेक्षा त्याच्या आताच्या कर्तबगारीला झुकतं माप दिलं जातं.
आणखी वाचा-ग्राहकराणी : दिवाळीची ऑनलाइन खरेदी करताना सावधान
या कारणांमुळे स्टार्ट-अप्सची प्रगती चांगली होईल आणि यापुढेही कर्मचाऱ्यांना या क्षेत्रात चांगल्या संधी मिळू शकतील, असं मानलं जातं. हा अहवाल काहीसा मर्यादित स्वरूपाचा असला, तरी तो स्त्रियांच्या दृष्टीनं स्टार्ट-अप मधल्या भविष्याचं एक स्वप्न उभं करतो. तेव्हा ‘चतुरां’नो, तुमच्या डोक्यात जर एखादी उत्तम व्यवसाययोग्य कल्पना असेल, तर पुरेशा अभ्यासासह या क्षेत्रात उतरण्यासाठी तयारी करायला काहीच हरकत नसावी. तुम्हाला सहाय्यभूत ठरणाऱ्या अनेक योजना तुम्ही शोधू शकाल. अगदी तुम्हाला कर्मचारी म्हणून स्टार्ट-अप क्षेत्रात यायचं असेल, तरी उत्तम शिकून, उत्तम तयारी करून येण्याची हीच वेळ आहे, असं आशादायक चित्र या निमित्तानं आपल्यासमोर आहे!
lokwomen.online@gmail.com