– स्वप्निल घंगाळे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
प्रिय अनुष्का, अभिनंदन! अर्थात जसे तुला इतर लोक फोन करुन अभिनंदन करताहेत त्यातलेच आम्ही सुद्धा आहोत असं समज. तसं म्हणायला गेलं तर आज प्रत्यक्षात ‘तू’ काहीच केलं नाहीस, पण अप्रत्यक्षपणे ‘तू’ बरंच काही केलं आहेस. म्हणतात ना… विद्यार्थ्यांनी चांगली कामगिरी केली की शिक्षक स्वत: फार खूश होतात, तसाच हा प्रकार आहे. तसं पहायला गेलं तर… जेव्हा ‘तो’ शून्यावर बाद होतो; तेव्हा तुझा दोष नसतानाही ‘तू’ त्याची वाटेकरी ठरतेस. तसाच प्रकार यश मिळाल्यावर व्हायला हवा. वाईट क्षणांना सर्वचजण दोष द्यायला पुढे सरसावतात… मात्र चांगलं झालं की फक्त ‘त्या’चं कौतुक होतं अन् ‘तू’झं काय?
नक्की वाचा >> Ind vs Pak: थरार विजय मिळवून दिल्यानंतर विराटचा अनुष्काला कॉल; म्हणाला, “तिने एकच गोष्ट सांगितली की, इथे लोक मला…”
सामना संपल्यानंतर तू जी पोस्ट लिहिली ना ती बरंच काही सांगून जाणारी, तुमच्या दोघांचा कपल म्हणून स्ट्रगल सांगणारी होती. ‘रीडिंग बिटवीन द लाइन्स’ म्हणजेच लिहिलंयस त्यापेक्षा अधिक वाचता येणाऱ्याला ती पोस्ट बरीच अधिक कळलेली असणार. तुमच्या मुलीभोवती तूच जोरजोरात ओरडून नाचत होतीस याची आम्ही कल्पना करु शकतो. कारण थोड्याफार फरकाने सगळ्या घरांमध्ये टीव्ही समोर बसलेल्यांची हीच अवस्था होती. तो खेळत होता आणि आम्ही आमची नखं कुरतडत बसलो होतो. ‘नेल बाईटींग’ काय असतं याचा प्रत्यय काल पुन्हा आला.
नक्की वाचा >> Ind vs Pak: शेवटच्या दोन ओव्हर पाहण्यासाठी उड्डाण पाच मिनिटांनी लांबवलं? विमान मुंबई एअरपोर्टच्या रनवेवर धावत असतानाच…
यापूर्वी त्याच्या अपयशासाठी तुला अनेकदा दोषी ठरवण्यात आलं. आम्हीच काय गावसकरांसारख्या मोठ्या खेळाडूनेही तो फॉर्ममध्ये नव्हता तेव्हा हॉटेलच्या गच्चीवर ‘तू’ त्याचा चांगला सराव करुन घेतला अशी टोमणावजा प्रतिक्रिया लाइव्ह कॉमेन्ट्रीमध्ये दिली होती. त्यावरुन बराच वादही झाला होता. आणि तेच सुनील गावसकर काल सामना जिंकला तेव्हा लहान मुलांसारखे उड्या मारून आनंद व्यक्त करताना आम्ही सर्वांनी पाहिले. त्यांच्या उड्या संपतच नव्हत्या अगं.
The celebration by Sunil Gavaskar is gold. https://t.co/5RkFtEJ1nx
— Johns. (@CricCrazyJohns) October 23, 2022
सामना संपल्यानंतर तो तुझ्याशी बोलल्याचं त्यानेच जाहीर केलं. “मी माझ्या पत्नीशी बोललो ती फार फार आनंदात होती. ती सांगत होती तिला अनेकजण फोन करताहेत. शुभेच्छा देताहेत. तिला कळत नाहीए की नेमकं काय करावं. काय म्हणावं. मी तर काहीच केलं नाहीय असं तिचं म्हणणं आहे. ती फक्त सर्वांच्या शुभेच्छा स्वीकारतेय आणि मी तिला सांगितलं की मैदानाबाहेर काय सुरु आहे, मला कल्पना नाही मी फक्त मैदानात खेळत होतो,” अगं यात प्रोफेश्नल आणि इमोशनल दोन्ही किती छान बॅलन्स केलंय त्यानं! अगदी तो सरळ षटकार लगावला ना १९ व्या ओव्हरच्या पाचव्या चेंडूवर तेवढंच परफेक्ट बोललाय तो!
नक्की वाचा >> Ind vs Pak: बोल्ड झाल्यानंतरही विराट तीन धावा का पळाला अन् सामना संपताना नाबाद कसा राहिला? टर्निंग पॉइण्ट ठरले ‘ते’ दोन चेंडू
तुझं अभिनंदन करण्याचं आणखीन एक कारण म्हणजे चांगल्या क्षणी सारं जग आज त्याच्यासोबत आहे. त्याला ‘किंग’ म्हणत आहे. पण वाईट काळात तूच त्याच्यासोबत होतीस. त्याने एका मुलाखतीमध्ये म्हटलं होतं की सगळे बाजूला असूनही मला एकटं एकटं वाटायचं. सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून ज्याच्याकडे पैसा आहे, प्रसिद्धी आहे, तुझ्यासारखी प्रसिद्ध व्यक्ती ज्याची पत्नी आहे. या साऱ्या सधन यशस्वितेच्या व्याख्येत बसणाऱ्या त्याला असं काही का वाटावं हा प्रश्न मानसिक ताण या प्रकारावर विश्वास नसणाऱ्यांना कळणार नाही. ही नक्कीच त्याच्या मानसिक तणावातील सर्वात वाईट फेज असावी. कारण बॅड पॅचमध्येही त्याच्या टीकाकारांपेक्षा त्याचे समर्थक पाठीशी अधिक खंबीरपणे उभे होते तरीही त्याला आपल्यासोबत कोणीच नाही असं वाटण्याच्या काळात सर्वात जवळची व्यक्ती म्हणून ‘तू’च तर त्याला सोबत केलीस. हीच मोलाची पार्टनरशिप त्याला या साऱ्यातून बाहेर काढण्यासाठी फार महत्त्वाची ठरली.
प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते असं म्हणतात. पण खरं तर पुरुषाच्या आयुष्यातील वेगवगेळ्या टप्प्यावर वेगवेगळ्या स्त्रिया या भूमिकेत असतात आणि त्याचं ‘कलेटीव्ह एफर्ट’ म्हणून ‘तो’ पुरुष ‘यशस्वी’ गणला जातो. सध्या त्याच्या या बॅड पॅचमध्ये ‘तू’ त्याच्यासाठी आशेचा किरण ठरलीस किंवा त्याच्यासोबत उभी राहिलीस, तू फक्त लढ मी आहे पाठीशी म्हणणं हे किती महत्त्वाचं होतं हे आपापल्या लेव्हलला अशा परिस्थितीतून गेलेल्या जोडप्यांपैकी कोणीही सांगू शकेल. तुम्ही किती यशस्वी आहात याने मूळ भावना आनंद, दु:ख, तणाव यासारख्या गोष्टी बदलत नाहीत. कालची तुझी पोस्ट तेच सांगणारी वाटली. या विजयासाठी तुझंही म्हणूनच खूप खूप अभिनंदन.
तुला एक गोष्ट कळली का या साऱ्या लेखात एकदाही त्याचं नाव मी घेतलेलं नाही. मात्र ‘तो’ कोण आहे हे साऱ्यांना ठाऊक आहे. त्याचं नाव घेण्याची गरज नाही अशी ‘विराट’ कामगिरी ‘तो’ गेली अनेक वर्ष करतोय. आणि तू अशी पाठिशी उभी राहिलीस तर पुढील अनेक वर्षे करत राहील.
नक्की वाचा >> विश्लेषण: ‘डेड बॉल’वरुन पाकिस्तानची रडारडी; पण ‘डेड बॉल’ म्हणजे नेमकं काय? तो कधी घोषित करतात?
पुन्हा एकदा तुझं अभिनंदन कारण आम्ही क्रिकेट चाहते तुझा काही दोष नसताना त्याच्या वाईट कामगिरीसाठी तुझ्यावर रागावतो तितक्याच पटकन चांगल्या कामगिरीसाठी ‘तू’झं कौतुक करत नाही. म्हणूनच हा लेखप्रपंच.
अशीच त्याच्या पाठीवर हात ठेवून लढ म्हणत राहा बाकी ‘तो’ म्हणाला त्याप्रमाणे त्याचं काम मैदानात आहे बाहेर काय चाललंय त्याला फरक पडत नाही. पण त्याच्या मनात काय चाललंय हे हेरणाऱ्या फार कमी व्यक्तींपैकी ‘तू’ असल्याने त्याच्यासोबत राहा इतकच त्याचा एक चाहता म्हणून सांगू शकतो किंवा विनंती करु शकतो. पुन्हा एकदा अभिनंदन, आभार अन् खूप खूप थँक ‘यू’!
swapnil.ghangale@loksatta.com