डियर बाबा,

मेजर राजीव शुक्ला कसे आहात? आम्हाला तुमची फार आठवण येते. तुम्ही काय सतत बिझी असायचे.. आम्हाला तुम्ही कधी वेळच दिला नाही. पण तुम्हाला सांगायला आवडेल की तुमची ही चिमुकली आता २१ वर्षाची झाली आहे. आई सांगते मी जन्मल्यानंतर तुम्ही तब्बल १० महिन्यांनंतर मला बघितलं होतं आणि कडेवर घेऊन घरभर फिरला होता. बाबा तुम्ही माझ्या पहिल्या वाढदिवशी पण नव्हता. जेव्हा जेव्हा मला शाळेत बक्षिसे मिळायची तेव्हा शाबासकीची थाप द्यायला सुद्धा तुम्ही नव्हता. कधी कधी वाटायचं की बाबाचं सुख माझ्या वाटेला का नाही? इतर मुली प्रमाणे माझे हट्ट पुरवायला बाबा माझ्या बरोबर का नाही? कधी कधी खूप राग यायचा, वाटायचा हा कसला यांचा जॉब?
मला आठवते ज्या दिवशी तुम्ही घरी यायचे तेव्हाच घरी दिवाळी साजरी व्हायची, तेव्हाच घरी गोड धोड व्हायचं. मला मोठं होताना तुम्ही फक्त फोटोतचं बघितलं. पण बाबा तुम्ही आल्यावर तीन चार दिवस राहायचे ते दिवस माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर दिवस असायचे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मला आठवते मी एकदा तुम्हाला म्हणाली होती, बाबा तुम्ही देशासाठी काम करता मग तुम्ही टिव्हीवर का दिसत नाही. ज्या दिवशी तुम्हाला मी टिव्हीवर बघेल त्या दिवशी मला खूप आनंद होईल. मी सर्वांना सांगेल की माझे बाबा टिव्हीवर दिसले. तेव्हा तुम्ही फक्त स्मित हास्य करत माझ्या डोक्यावर हात फिरवला होता.

हेही वाचा : Who Is Qamar Sheikh : पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाकिस्तानी बहीण बांधते दरवर्षी राखी; तीस वर्षांपासून परंपरा जपणाऱ्या कमर शेख कोण?

तुम्ही म्हणायचे नियमित बातम्या बघत जा. देशात काय सुरू आहे, याकडे प्रत्येक नागरिकाने लक्ष दिले पाहिजे. एकदिवस मी नेहमी प्रमाणे बातम्या बघत होती. अचानक टिव्हीवर एक न्यूज फ्लॅश झाली. “सीमेवर ३ जवान शहीद..” पहिल्या जवानाचा फोटो पाहिला आणि नाव वाचले.त्यानंतर दुसऱ्या जवानाचा फोटो पाहिला आणि नाव वाचले आणि तिसऱ्या जवानाचा फोटो हा तुमचा होता बाबा आणि त्याखाली लिहिले होते, “शहीद मेजर राजीव शुक्ला” आणि पायाखालची जमीनच सरकली.. टिव्हीवर बघायची इच्छा तुम्ही अशी पूर्ण कराल, याचा मी स्वप्नातही विचार केला नव्हता.

आज तुम्ही जाऊन ५ वर्षे झाली. तुम्ही सोडून गेल्यावर समजले की फक्त एका लेकीची नाही तर अख्या देशाची जबाबदारी तुमच्या खांद्यावर होती. नेहमी सलमान खान, अक्षय कुमारला हिरो मानणारी मी.. मला कधी कळलेच नाही की माझ्या घरात देशाचा रिअल हिरो होता. हो, तोच हिरो ज्याने देशासाठी छातीवर पाच गोळ्या झेलल्या.

मला अभिमान आहे की लोक मला शहीद मेजर राजीव शुक्लाची मुलगी म्हणून ओळखतात. तुमचं रक्त माझ्या शरीरात आहे. हे तेच रक्त आहे ज्यामध्ये देशासाठी बलिदान करण्याचं धाडस आहे आणि म्हणूनच बाबा, मी सुद्धा आता आर्मी जॉइन करणार आहे.
मग भेटू लवकरच… तुमच्या आवडत्या जागी जिथे तुमचा जीव गुंतला आहे.
सलाम मेजर राजीव शुक्ला उर्फ बाबा.

तुमची लेक

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Independence day 2024 a daughter wrote a emotional letter to her martyred father who is army jawan and express her feeling and gratitude chdc ndj