इस्रायलमध्ये हमास या दहशतवादी संघटनेने युद्ध पुकारले आहे. या युद्धात आतापर्यंत हजारो इस्रायल आणि पॅलेस्टाईन नागरिकांचा मृत्यू झाला आहे. अनेकजण अद्यापही भीतीच्या छत्रछायेत असून जीव मुठीत घेऊनच युद्धग्रस्त भागात जगत आहेत. दरम्यान, अनेक भारतीयही इस्रायलमध्ये अडकले आहेत. नोकरीनिमित्त गेलेले आणि तिथंच स्थायिक झालेले अनेक नागरिकही इस्रायलला वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. कर्नाटकच्या उडुपी जिल्ह्यातील मूळ रहिवासी असलेल्या प्रमिला प्रभु (४१) याही इस्रायलच्या तेल अविव या शहरांत राहत असून त्यांनी तेथील रक्तरंजित कहाणी इंडियन एक्स्प्रेसशी शेअर केली आहे.
प्रमिला प्रभू या पेशाने परिचारिका आहेत. इस्रायलच्या तेल अविव याफो या शहरांत त्या राहतात. हे शहर युद्धाच्या कमी प्रभावाखाली आहे. तेल अवीव-याफोमधील दुकाने बंद आहेत, परिस्थितीमुळे नागरिकांनी किराणा मालाचा साठा करून ठेवलाय. तर रस्त्यावरही लोक उतरायला घाबरत आहेत, तेल अवीवमधील ही भयावह परिस्थिती प्रमिला यांनी विषद केली. तसंच, त्यांची बहीण प्रविणा हीसुद्धा जेरुसलेम येथील रुग्णालयात परिचारिका म्हणून काम करतात.
अन्न-पाण्याचा साठा
प्रमिला एका अपार्टमेंटमध्ये २५ ते ३० लोकांसह राहतात. त्यांनीही अन्न, पाणी, टॉर्चसह इतर गोष्टींचा साठा करून ठेवला आहे. तळघरातील दरवाजा त्या नेहमीच उघडा ठेवतात. जेणेकरून सायरनचा आवाज आला की त्या मोबाईल घेऊन तळघरात पळतात. सायरन वाजण्याचा थांबल्यास त्या पुन्हा घरी परतात, अशी माहिती त्यांनी दिली.
हेही वाचा >> Israel and Palestine War: हमास नाक घासत येणार? इस्रायलनं उपसलं संपूर्ण नाकेबंदीचं हत्यार; घेतला ‘हा’ मोठा निर्णय!
कोण आहेत प्रमिला प्रभु?
प्रमिला या कर्नाटकातील उडुपीमधील हेरगा गावात जन्माला आल्या. तिथंच त्या वाढल्या. तर, म्हैसूर येथे त्यांनी शिक्षण घेतलं. बंगळुरुतील मणिपाल रुग्णालयात त्यांनी सुरुवातीला काम केलं. त्यानंतर, वयाच्या ३५ व्या वर्षी त्या इस्रायलला स्थायिक झाल्या. त्यांना दोन मुलंही आहेत. ही मुलं भारतातच राहतात.
सध्याचा हल्ला कल्पनेपलीकडचा
“पॅलेस्टाईनकडून हिंसाचार आणि हल्ले इस्रायलमध्ये नवीन नाहीत पण यावेळी जे घडले ते कल्पनेच्या पलीकडे होते. सुरुवातीला, इस्रायलच्या दक्षिण भागात आयोजित केलेल्या संगीत महोत्सव दहशतवाद्यांचे लक्ष्य होते आणि तेव्हापासून हल्ल्याच्या बातम्या येऊ लागल्या. हा देश युद्धासाठी नेहमीच तयार असतो. यावेळी हमासने हल्ला केल्यानंतर सुरक्षिततेचे उपाय ताबडतोब घेण्यात आले”, अशी माहिती त्यांनी दिली.
हेही वाचा >> इस्रायल-पॅलेस्टाईन संघर्षात मिया खलिफाची उडी, कायली जेनरवर खास शब्दांत ‘फायरींग’
भारताने जन्म दिला तर इस्रायलने जीवन
भारताने मला जन्म दिला तर इस्रायलने मला जीवन दिलं आहे. इस्रायलच्या कठीण काळात मी येथेच राहीन. तसंच, इस्रायल सरकारच्या आवश्यकतेनुसार मदत करण्यासही तयार असल्याचं त्या म्हणाल्या. भारतात असलेल्या कुटुंबियांकडून त्यांना सातत्याने फोन केले जातात. त्यांच्या सुरक्षेची काळजी घेतली जाते. भारतात असलेल्या मुलांची त्यांना फार आठवण येते, परंतु या परिस्थितीत त्यांना पळून जाणं योग्य वाटत नाही. त्यामुळे परिस्थिती पूर्ववत झाल्यानंतर त्या भारतात येणार आहेत, असं त्यांनी इंडिनय एक्स्प्रेसशी बोलताना सांगितलं.