दीपाली पोटे- आगवणे

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारतीय महिला क्रिकेट संघात सध्या एकापेक्षा अधिक ‘स्टार खेळाडू’ आहेत. या सर्व स्वबळावर सामना जिंकण्याची ताकद बाळगतात. सध्या सुरु असलेल्या ‘महिला आशियाई चषक क्रिकेट स्पर्धे’मध्ये सर्वच खेळाडू उत्तम प्रदर्शन करत आहेत, परंतु सर्वाधिक चर्चा एका नवख्या खेळाडूची होत आहे. ती म्हणजे ‘भारतीय संघाचा तोफखाना’ म्हणून बिरूद मिरवणारी वेगवान गोलंदाज रेणुका सिंह ठाकूर.

नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेमध्ये रेणुकाने दोन वेळा चार विकेट घेत ऐतिहासिक कामगिरी केली आहे. हा विक्रम रचणारी रेणुका ही पहिली स्त्री गोलंदाज ठरली आहे. त्यामुळे क्रिकेटप्रेमी आणि संघ या दोघांच्या तिच्याकडून असलेल्या अपेक्षांमध्ये नक्कीच वाढ झाली आहे. त्यामुळे तिची जादू या चषकामध्येही चालेल आणि संघाच्या विजयात ती महत्त्वाची भूमिका बजावेल, अशी आशा क्रिकेटरसिकांना आहे.

खूप कमी वेळात आपल्या कर्तृत्वामुळे जगप्रसिद्ध झालेल्या रेणुकाचा जन्म १ फेब्रुवारी १९९६ रोजी हिमाचल प्रदेशमधील पारसा या गावी झाला. परंतु ती केवळ तीन वर्षाची असताना वडिलांचे छत्र हरपले. तिचे वडील केहर सिंह ठाकूर यांचे १९९९ मध्ये निधन झाले. ते रोहरू येथे आरोग्य विभागात कर्मचारी होते. त्यानंतर आई सुनीता ठाकूर यांना वडिलांच्या जागी त्याच विभागात चतुर्थ श्रेणीमध्ये नोकरी प्रदान करण्यात आली. मात्र या संपूर्ण धक्क्यातून सावरण्यासाठी आई, मोठा भाऊ आणि तिला अनेक वर्षे लागली. रेणुका सांगते, की या घटनेमुळे त्यांचे कुटुंब अनेक वर्षे मागे गेले होते. आपल्या मुलीने क्रिकेटर व्हावे आणि आपल्या देशासाठी खेळावे, असे तिच्या वडिलांना नेहमी वाटत असे. त्यांचे क्रिकेटवर प्रचंड प्रेम होते. ते विनोद कांबळी यांचे खूप मोठे चाहते होते. त्यामुळेच त्यांनी आपल्या मोठ्या मुलाचे नाव विनोद ठेवले.’

रेणुकाने हे स्वप्न पूर्ण करावे म्हणून तिचे काका भूपेंद्र सिंह यांनी तिला क्रिकेट खेळण्यासाठी प्रोत्साहन दिले. तेव्हा ते शिमला येथील सरकारी महाविद्यालयात शारीरिक शिक्षणाचे शिक्षक होते. रेणुकाने रोहरूमध्ये स्थानिक पातळीवर क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर २००९ मध्ये रेणुकाने हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशनच्या धरमशाला येथील महिला निवासी अकादमीमध्ये प्रवेश घेतला आणि आपल्या व्यावसायिक क्रिकेट सरावाचा श्रीगणेशा केला. मग हिमाचल प्रदेश संघाच्या १६ आणि १९ वर्षांखालील संघांचे प्रतिनिधित्व रेणुकाने केले. २०१९-२० मध्ये झालेल्या देशांतर्गत महिला क्रिकेट लीगमध्ये तिने सर्वाधिक- २३ बळी घेऊन सर्वांचे लक्ष आपल्यावर केंद्रित केले. यानंतर तिची ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी महिला संघात निवड झाली. ती बांगलादेश, थायलंड आणि भारत-संघाविरुद्ध सामने खेळली. त्यात आपली छाप कायम ठेवत तिने चार सामन्यांत तीन विकेट घेतल्या. मार्च २०२० मध्ये पार पडलेल्या ‘बीसीसीआय वरिष्ठ महिला एकदिवसीय स्पर्धे’मध्ये तिने आपल्या प्रतिस्पर्धी संघाच्या नऊ विकेट घेतल्या.

रेणुकाची क्रिकेटमधील उत्तुंग कामगिरी बघून २०२१ मध्ये स्पोर्टस् कोट्याअंतर्गत तिला भारतीय रेल्वेत नोकरी मिळाली. ऑगस्ट २०२१ मध्ये तिने ‘टी-२०’ मध्ये पदार्पण केले. जानेवारी २०२२ मध्ये न्यूझीलंडमधील ‘महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धे’त रेणुका खेळली आणि तिने महिला एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. रेणुकाने आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करत आपल्या वडिलांची इच्छा पूर्ण केली. रेणुकाचा प्रगतीचा आलेख बघता भविष्यामध्ये ती नुकतीच निवृत्ती घेतलेली वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामीची कमतरता नक्कीच भरून काढेल, अशी आशा आहे.

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian cricket teams rising star renuka singh thakur asj