अनेक भारतीय जगभरात आपल्या प्रतिभेच्या जोरावर चमकत आहेत. सध्या अशाच एका नावाची जोरदार चर्चा आहे. हे नाव म्हणजे संप्रिती भट्टाचार्य. भारतीय वंशाची संप्रिती तिच्या अनोख्या शोधामुळे चर्चेत आहे. ती नेव्हीअर नावाच्या कंपनीची सीईओ आहे. ही कंपनी इलेक्ट्रिक बोटी बनवते. संप्रिती इलेक्ट्रिक हायड्रोफॉइल बोट नेव्हीयर ३० च्या मदतीने सागरी उद्योगात क्रांती घडवत आहे. कोलकात्यात जन्मलेल्या संप्रितीने परदेशात जाऊन स्वतःची कंपनी सुरू केली आहे. आज आपण तिच्या प्रवासाबद्दल जाणून घेणार आहोत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारत-पाकिस्तानमध्ये मैत्री सांधण्याचे आव्हान पेलतील का गीतिका श्रीवास्तव?

संप्रितीचा जन्म पश्चिम बंगालची राजधानी कोलकात्यात झाला. ती अभ्यासात खूप हुशार नव्हती. शिकत असताना ती भौतिकशास्त्रात नापास झाली होती. त्यावेळी ‘तू गृहिणी हो’ अशा शब्दात तिला शिक्षणांनी सुनावलं होतं. पण शिक्षकाच्या बोलण्याने ती खचली नाही आणि इंजिनिअरींग करण्यासाठी तिने जाधवपूर युनिव्हर्सिटीत प्रवेश घेतला. शिक्षण पूर्ण झाल्यावर तिने इंटर्नशिपसाठी तब्बल ५४० कंपन्यांमध्ये अर्ज केले होते. मात्र त्यापैकी ५३९ कंपन्यांनी तिला इंटर्नशिप नाकारली. अमेरिकेतील फर्मिलॅब नावाची एकमेव फिजिक्स लेबोरेटरी होती, ज्यांनी तिला इंटर्नशिप ऑफर केली. ५३९ नकार पचवून संप्रिती फर्मिलॅबमध्ये इंटर्नशिप करण्यासाठी अमेरिकेला गेली. त्याठिकाणी रिसर्च असिस्टंट म्हणून तिने काम केलं. ज्या विषयात संप्रिती नापास झाली होती, तोच भौतिकशास्त्र हा विषय तिला प्रचंड आवडायचा. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने याबद्दल माहिती दिली आहे.

फर्मिलॅबनंतर NASA मध्ये इंटर्नशिप

फर्मिलॅबमध्ये इंटर्नशिप पूर्ण केल्यावर तिने NASA मध्ये दुसरी इंटर्नशिप केली. तिथे तिने रोबोटिक्स आणि स्पेस एक्सप्लोरेशनवर काम केले. ‘नास डेली’ला दिलेल्या एका व्हिडीओ मुलाखतीत तिने तिचा प्रवास सांगितला होता. स्टीव्ह जॉब्सचा उल्लेख करत ती म्हणाली होती, “स्टीव्ह जॉब्सने म्हटल्याप्रमाणे, ‘जग तुमच्या आणि माझ्यापेक्षा हुशार नसलेल्या लोकांनी बनले आहे.’ मग आपण काहीतरी धाडसी का करू नये? असं काहीतरी जे तुम्हाला करायला आवडतं आणि ते करण्याची तुमची तयारी आहे?”

हेही वाचा… रेल्वे बोर्डाला मिळाली पहिली महिला अध्यक्षा, कोण आहेत जया वर्मा-सिन्हा? बालासोर दुर्घटनेनंतर आल्या होत्या चर्चेत!

फक्त २०० डॉलर्स घेऊन गाठलेलं अमेरिका

आजपासून १३ वर्षांपूर्वी २०१० मध्ये खिशात फक्त २०० डॉलर्स आणि आयुष्यात कठीण गोष्टी करण्याची मानसिकता घेऊन संप्रिती अमेरिकेला शिफ्ट झाली होती. तिने ओहायो स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये मास्टर्ससाठी प्रवेश घेतला आणि नंतर पीएचडी पूर्ण करण्यासाठी एमआयटीमध्ये प्रवेश घेतला. शिकत असताना तिने हायड्रोस्वॉर्म नावाचे पाण्याखाली चालणारे ड्रोन विकसित केले. हे ड्रोन समुद्राच्या तळाचा नकाशा बनवण्यासाठी व खाणी शोधण्यासाठी तिने बनवले होते. त्यानंतर संप्रितीने अनेक स्पर्धांमध्ये भाग घेतला. याच दरम्यान भेट कंपनीचा को-फाउंडर रीओ बेर्ड याच्याशी झाली.

संप्रितीने तीन वर्षांपूर्वी स्थापन केली स्वतःची कंपनी

२०२० मध्ये संप्रितीने रिओबरोबर मिळून ‘नेव्हियर’ नावाची स्वतःची कंपनी सुरू केली. हायड्रोफॉइल, इलेक्ट्रिफिकेशन, अॅडव्हान्स कंपोझिट आणि एक इंटेलिजंट सॉफ्टवेअर सिस्टिम एकत्रित करणारे नवीन वॉटरक्राफ्ट तयार करणे, हे तिच्या कंपनीचे उद्दिष्ट आहे. नेव्हियर 30 ही बोट पाण्यावर सरकण्यासाठी डिझाइन केली आहे. या बोटीची रचना विमानासारखी असून ती ग्लायडिंग मोशनला मदत करते. याला बोटीला तीन पंख आहेत जे पाण्याखाली असतात. ते बोटीला वेगाने वरच्या दिशेने वळवतात. यामुळे बोटीला समुद्रातील लाटांवर वेगाने नेव्हिगेट करण्यास मदत होते.

लोकांची पाण्यावरून प्रवास करण्याची पद्धत बदलायची आहे – संप्रिती

बोटिंग अधिक सुलभ व्हावी, परवडणारी व्हावी आणि टिकाऊ असावी हे संप्रितीचे उद्दिष्ट आहे. संप्रितीला लोकांची पाण्यावरून प्रवास करण्याची पद्धत बदलायची आहे. तसेच सागरी वाहतुकीचे पर्यावरणावर होणारे दुष्पपरिणाम तिला कमी करायचे आहेत. तिची ही कल्पना सत्यात उतरवण्यासाठी ती जोमाने काम करत आहे. तिला विविध गुंतवणूकदार, मीडिया आउटलेट्स आणि एन्फ्लुएन्सर्सकडून पाठिंबा मिळत आहे. तिला पाठिंबा देणाऱ्यांपैकीच एक नास डेली आहे. “संप्रितीने एक उडणारी बोट बनवली. तिची बोट आम्ही पाहिलेली आतापर्यंतची सर्वात चांगली गोष्ट आहे. संप्रिती भट्टाचार्य ही १३ वर्षांच्या कठोर परिश्रमाची अविश्वसनीय यशोगाथा आहे,” असं नास डेलीने एका व्हिडीओत म्हटलं आहे.

फर्मिलॅबने संधी दिली नसती तर…

नास डेलीने संप्रितीची मुलाखत घेतली. त्यात तिला विचारण्यात आलं की जर फर्मिलॅब्सने संधी दिली नसती तर तू काय केलं असतं? यावर मी आणखी ५०० कंपन्यांना इंटर्नशिपसाठी मेल केले असते, असं ती म्हणाली. “तुम्ही काय करू शकता किंवा करू शकत नाही हे कोणालाही सांगू नका. फक्त तिथे जा आणि ते काम करा,” असा सल्ला संप्रिती तरुणाईला देते.

आयुष्यात एक-दोन अपयश आल्यावर खचून जाणारे अनेकजण तुम्ही पाहिले असतील. पण तब्बल ५३९ कंपन्यांनी इंटर्नशिप नाकारलेल्या या भारतीय तरुणीने एका संधीचं सोनं करून मिळवलेलं यश खूप प्रेरणादायी आहे. एकेकाळी शिक्षकाने ज्या तरुणीला ‘गृहिणी हो’ असा टोमणा मारला होता, तीच तरुणी आज सागरी उद्योगात क्रांती करू पाहत आहे.

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian girl sampriti bhattacharyya who failed in physics but built a flying boat founded navier company her struggle story hrc
First published on: 02-09-2023 at 15:47 IST