काही महिला या आपल्या कामगिरीतून इतरांना प्रेरणा देत असतात, त्यापैकी दीपा कर्माकर ही एक आहे. भारतीय जिमनॅस्ट म्हणून दीपा कर्माकरने जगभर आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

भारतीय जिमनॅस्ट दीपा कर्माकरने नुकतीच निवृत्ती जाहीर केली आहे. ती पहिली भारतीय जिमनॅस्ट आहे, जिने २०१६ च्या ऑलिम्पिकमध्ये प्रवेश मिळवला होता. दीपाने आपल्या कामगिरीने भारताचे नाव संपूर्ण जगभरात गाजवले. आता वयाच्या ३१ व्या वर्षी निवृत्ती घेतल्यामुळे ती चर्चेत आली आहे. या निमित्ताने जाणून घेऊयात दीपा कर्माकरविषयी.

वयाच्या सहाव्या वर्षापासून जिमनॅस्टिकच्या सरावाला सुरुवात

दीपाचा जन्म ९ ऑगस्ट १९९३ साली आगरतळा, त्रिपुरा येथे झाला. वयाच्या सहाव्या वर्षापासून तिने जिमनॅस्टिकच्या सरावाला सुरुवात केली. मात्र, तिचे पाय सपाट असल्याने तिला समस्यांचा सामना करावा लागला. सपाट पायाचा खेळावर परिणाम होतो, त्यामुळे तिला कधीच जिमनॅस्ट बनता येणार नाही असे सांगितले होते. मात्र, प्रशिक्षक सोमा नंदी आणि बिश्वेश्वर नंदी यांच्या मार्गदर्शनाखाली तिने त्यावर मात केली.

२००८ मध्ये तिने कनिष्ठ विभागात पहिले राष्ट्रीय पदक जिंकले. २०१४ मध्ये दीपाने ग्लासगो येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत कांस्यपदक मिळवले आणि जिमनॅस्टिकमध्ये कांस्यपदक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला ठरली.

२०१६ च्या ऑलिम्पिकमध्ये प्रवेश करणारी दीपा कर्माकर पहिली भारतीय महिला ठरली. ०.१५ पॉइंटने तिचे पदक हुकले आणि तिला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले. प्रोड्युनोव्हा व्हॉल्ट हा जिमनॅस्टिकमधला कलात्मक अवघड प्रकार तिने सादर केला होता. आतापर्यंत हा प्रकार फक्त पाच महिलांनी सादर केला आहे.

त्यानंतर तिने २०१८ मध्ये FIG आर्टिस्टिक जिमनॅस्टिक वर्ल्ड चॅलेंज कपमध्ये सुवर्णपदक जिंकत भारतीय खेळांडूसमोर आदर्श निर्माण केला. या वर्षाच्या सुरुवातीला दीपाने ताश्कंद येथे झालेल्या आशियाई वरिष्ठ चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकून इतिहास घडवला. ही कामगिरी करणारी ती पहिली भारतीय महिला जिमनॅस्ट ठरली.

तिला तिच्या कामगिरीसाठी २०१५ मध्ये अर्जुन पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. याबरोबर, २०१६ मध्ये मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराने तिचा सन्मान करण्यात आला आहे. तिला २०१७ मध्ये पद्मश्री, चौथा-सर्वोच्च नागरी पुरस्कारदेखील मिळाला.

तुझ्या सपाट पायामुळे तू कधीच जिमनॅस्ट होऊ शकत नाहीस

वयाच्या ३१ व्या वर्षी दीपाने निवृती घेण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी तिने सोशल मीडियावर भावनिक पोस्टदेखील शेअर केली आहे, ज्यामध्ये तिने जिमनॅस्टिकमधून रिटायर व्हायची हीच योग्य वेळ असल्याचे म्हटले. “जिमनॅस्टिक माझ्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग आहे. पाच वर्षांच्या दीपाला तुझ्या सपाट पायामुळे तू कधीच जिमनॅस्ट होऊ शकत नाहीस, असे सांगितले होते. आज मला माझी कामगिरी पाहून अभिमान वाटतो. जागतिक स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करणे, पदके जिंकणे आणि रिओ ऑलिम्पिकमध्ये प्रोड्युनोव्हा व्हॉल्ट सादर करणे हे माझ्या कारकिर्दीतील सर्वात अविस्मरणीय क्षण आहेत. २५ वर्षे मला मार्गदर्शन केल्याबद्दल मी बिश्वेश्वर नंदी सर आणि सोमा मॅडम यांचे आभार मानते. मी जरी निवृत्त होत असले तरी जिमनॅस्टिकबरोबर कायम संबंध राहील. माझ्यासारख्या इतर मुलींना मार्गदर्शक, प्रशिक्षक आणि पाठिंबा देऊन मी या खेळाला पुन्हा जिवंत करू इच्छिते”, असे तिने म्हटले आहे.

दरम्यान, जिमनॅस्टिकच्या या प्रवासात दीपाला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. दुखापती आणि शस्त्रक्रिया यामुळे दीपाने आपला आत्मविश्वास कधीही ढळू दिला नाही. आज दीपा अनेक खेळाडूंसाठी प्रेरणा ठरली आहे.