Indian Lesbian Couple Marriage: नोव्हेंबर महिन्याच्या शेवटाला सोशल मीडियावर केरळ मधील एका लेसबियन जोडप्याच्या लग्नाचे फोटो प्रचंड व्हायरल झाले होते. फातिमा नूरा आणि अदीला नसरीन या दोन तरुणींनी लग्नगाठ बांधून अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. १२ वी पासून जडलेले प्रेम, समाजाने नाकारणं, घरच्यांनी अक्षरशः शत्रूप्रमाणे कट रचून अडकवणं या सगळ्या संकटांना पार करून आता या दोन तरुणी एकत्र राहात आहेत. केरळ उच्च न्यायालयाने यांच्या लग्नाला कायदेशीर परवानगी दिलेली नसली तरी त्यांच्या एकत्र राहण्यावर कोणतेही बंधन नाही हे स्पष्ट केले आहे. अलीकडेच ऑफिशियल पीपल ऑफ इंडिया या इन्स्टाग्राम अकाउंटने या दोन तरुणींनी सांगितलेला धक्कादायक अनुभव शेअर केला आहे. समाजाच्या विरुद्ध जाऊन केलेल्या धाडसी लग्नासाठी नेमकं त्यांना कोणत्या अग्निदिव्यातून जावं लागलं हे पाहुयात…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

फातिमा नूरा आणि अदीला नसरीन या केरळच्या एर्नाकुलम जिल्ह्यातील रहिवासी आहेत. १२वीत असताना त्यांचं प्रेम जुळलं, तेव्हा त्या दोघीही सौदी अरेबियात शिकत होत्या. हे नातं त्यांच्या कुटुंबियांना पटण्यासारखं नव्हतं. एकदा फातिमाच्या आईने त्या दोघींचे चॅट पाहिल्याने त्यांचं नातं सगळ्यांसमोर आलं. यावेळी धक्का बसलेल्या आईने फातिमाला सुनावलं. तू कुटुंबाची लाज घालवतेयस असंही ऐकवलं. तरीही फातिमा न ऐकल्याने तिच्या आईने वडिलांना हा प्रकार सांगितला. ज्यावरून वडिलांनी फातिमाला मारहाण करून घरात कोंडून ठेवण्याचा प्रयत्न केला.

हा प्रकार जेव्हा आदिलाला लक्षात आला तेव्हा त्या दोघींनी निदान पदवीचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत थांबायचं ठरवलं. डिग्री मिळताच घरातून पळून जाण्याचा त्यांचा विचार पक्का झाला. ठरल्याप्रमाणे त्यांनी घरून पळ काढत कलकत्ता येथील एका संस्थेत आश्रय मिळवला. परिस्थिती निवळणार असं वाटत असताना अचानक आदिलाच्या आईने या दोघींना संपर्क केला. त्यांना विश्वासात घेऊन आम्ही तुमचं नातं मान्य करायला तयार आहोत पण परत या असं सांगितलं. आईवर विश्वास ठेवून या दोघी परत आल्या खऱ्या पण त्या दोघींच्या कुटुंबीयांनी वेगळाच कट रचला होता.

फातिमा आणि अदिला या घरी परत येताच त्या दोघींनाही आदिलाच्या घरी खूप मारहाण करण्यात आली. यानंतर फातिमाची आई अक्षरशः काही लोकांना घेऊन तिथे आली व स्वतःच्याच लेकीचं अपहरण करून घेऊन गेली. फातिमाच्या कुटुंबियांना तिला थेरपीसाठी नेण्याचा प्रताप सुद्धा केला. त्या दोघींना एकमेकींपासून लांब ठेवून त्यांचं प्रेम कमी होईल असं कदाचित त्यांच्या घरच्यांना वाटलं पण याचा परिणाम नेमका उलटा झाला. फातिमावर अत्याचार होत असताना आदिलाने कोर्टात हेबियस कॉर्पस याचिका दाखल केली. या याचिकेनुसार ‘न्यायालयाने संबंधित व्यक्तीला न्यायालयासमोर हजर केले जावे’ यासाठी आदेश देण्याची विनंती केली जाते. सुदैवाने केरळ उच्च न्यायालयाने कायदेशीर रित्या या दोघींना एकत्र राहण्यास परवानगी देत ३१ मे ला या खटल्यावर निकाल ऐकवला.

सध्या चेन्नईमध्ये हे गोड जोडपं आपल्या स्वतःच्या दमाने व प्रेमाने आयुष्य एकत्र घालवत आहे. एका मुलाखतीत या जोडप्याने सांगितले की, दोघींनी अद्याप लग्न केलेले नाही पण एक प्रेमाचं प्रतीक म्हणून लग्नाच्या वेशात त्यांनी हे फोटोशूट केलं होतं जे सोशल मीडियावरही प्रचंड गाजलं…

हे ही वाचा<< नवरा नको गं आई, मला नवरा नको!

हा झाला आदिला व फातिमाचा किस्सा, त्यांना न्याय मिळाला. मात्र अनेकजण अजूनही त्यांच्यावर प्रश्नांचा भडीमार करत आहेत. मुलं कशी होणार हा त्यातील एक मुख्य प्रश्न.. लग्नाचा हेतू हा बाळ होणं इतकाच असतो का? आपल्या मुलीचं प्रेम मान्य नसणं हा एक मुद्दा पण त्यासाठी तिला मारहाण करून कुठली माया आई वडील दाखवतात? संस्कृती रक्षणाच्या नावाखाली मानवाधिकाराचा आपल्याला विसर पडत चालला आहे का?

तुम्हाला फातिमा आदिलाच्या कथेविषयी काय वाटतं हे कमेंट करून नक्की कळवा!

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian lesbian girls beaten by parents mother blackmails father tortures for eight days shares shocking story svs