किरण राव दिग्दर्शित ‘लापता लेडीज’ या चित्रपटाची २०२५ च्या ऑस्करसाठी भारताकडून निवड करण्यात आली. फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाने ऑस्करमधील सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट श्रेणीसाठी ‘लापता लेडीज’ची निवड केली आहे. आजपर्यंत भारताने ऑस्करसाठी ५७ चित्रपट सादर केले आहेत. त्यापैकी फक्त आठ महिलांनी दिग्दर्शित केले आहेत. या निमित्ताने जाणून घेऊयात या महिला दिग्दर्शक कोण आहेत?

मीरा नायर

मीरा नायर ही पहिली महिला चित्रपट निर्माती आहे; जिच्या चित्रपटाने ऑस्करमध्ये हजेरी लावली होती. १९८८ साली प्रदर्शित झालेला ‘सलाम बॉम्बे’ या चित्रपटाला भारताकडून ६१ व्या ऑस्करमधील सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट श्रेणीसाठी नामांकन मिळाले होते. महत्त्वाच्या म्हणजे, हा चित्रपटाने पहिल्या पाचमध्ये स्थान निर्माण केले होते. जरी पुरस्कार मिळाला नसला तरीही या सिनेमाने भारतीय चित्रपट निर्मात्यांसाठी भविष्यात अनेक संधी निर्माण केल्या होत्या. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय चित्रपटाची क्षमता पाहायला मिळाली होती.

कल्पना लाजमी

भारताकडून १९९३ साली ६६ व्या अकादमी पुरस्कारासाठी कल्पना लाजमीच्या ‘लज्जा’ या चित्रपटाला नामांकन मिळाले होते. या चित्रपटात महत्त्वाच्या सामाजिक विषयांवर लक्ष केंद्रित केले होते. मात्र, हा सिनेमा नॉमिनेशमध्ये पोहोचू शकला नाही. या निमित्ताने भारतीय चित्रपटांना ऑस्करमध्ये ओळख मिळण्यासाठी कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागतो, हे अधोरेखित झाले.

दीपा मेहता

१९९८ मध्ये प्रदर्शित झालेला ‘अर्थ’ या चित्रपटाला १९९९ च्या ऑस्करसाठी नामांकन मिळाले होते. हा चित्रपट दीपा मेहता यांनी दिग्दर्शित केला होता. उत्तम कथानक असूनही अकादमी पुरस्करामध्ये नॉमिनेशन मिळविण्यात हा चित्रपट अयशस्वी ठरला. या चित्रपटात आमिर खान, नंदिता दास, राहुल खन्ना महत्त्वाच्या भूमिकांत दिसले होते.

अनुषा रिझवी

अनुषा रिझवी यांनी दिग्दर्शित केलेला आणि आमिर खानच्या प्रॉडक्शन हाऊसने निर्मिती केलेला ‘पीपली लाइव्ह’ या चित्रपटाला २०१० च्या ऑस्कर पुरस्कारासाठी भारताकडून नामांकन मिळाले होते. ग्रामीण भागातील गरिबी, इतर समस्या आणि प्रसारमाध्यमे ज्या मुद्द्यावर लक्ष वेधतात, त्यावर आधारित असलेल्या या चित्रपटाचे कौतुक झाले. मात्र, या चित्रपटाला नॉमिनेशनमध्ये स्थान मिळू शकले नाही.

हेही वाचा: “मला वाटलं भारत सरकार प्रिंट जाळेल”, घाबरलेल्या अनुराग कश्यपने परदेशात नेलेल्या ‘या’ बंदी घातलेल्या सिनेमाच्या DVD

गीतू मोहनदास

गीतू मोहनदास यांनी दिग्दर्शित केलेला पहिला चित्रपट ‘लायर्स डाइस’ हा २०१३ ला प्रदर्शित झाला होता. एक महिला तिच्या हरवलेल्या नवऱ्याला शोधते, याची गोष्ट या चित्रपटात दाखविण्यात आली आहे. महत्त्वाचे म्हणजे गीतू मोहनदास यांनी या चित्रपटाची कथादेखील लिहिली आहे. भारताकडून २०१४ साली ८७ व्या अकादमी पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते; मात्र हा चित्रपटदेखील नॉमिनेशनमध्ये जाऊ शकला नाही.

रीमा दास

रीमा दास यांनी दिग्दर्शित केलेला ‘विलेज रॉकस्टार्स’ हा चित्रपट २०१७ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला २०१८ च्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात या चित्रपटाने ऑस्करमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले होते. परंतु, या चित्रपटाला ऑस्करमध्ये नामांकन मिळू शकले नाही.

झोया अख्तर

२०१९ मध्ये प्रदर्शित झालेला ‘गली बॉय’ हा चित्रपट झोया अख्तरने दिग्दर्शित केला होता. या चित्रपटात आलिया भट्ट आणि रणवीर सिंग मुख्य भूमिकांत दिसले होते. मुंबईतील स्ट्रीट रॅपर्सच्या आयुष्यावर आधारित या चित्रपटाचे मोठे कौतुक झाले होते. मात्र, या चित्रपट ऑस्करमध्ये नामांकन मिळवण्यात अयशस्वी ठरला. यानिमित्ताने पुन्हा एकदा ऑस्करच्या स्पर्धेची जाणीव झाली.

दरम्यान, गेल्या काही वर्षांत भारताने सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट श्रेणीमध्ये अनेक चित्रपट सादर केले आहेत. त्यातील मदर इंडिया (१९५७), सलाम बॉम्बे (१९८८) व लगान (२००१) या तीन चित्रपटांनी नामांकनाचा दर्जा प्राप्त केला आहे.आता ‘लापता लेडीज’ची ९७ व्या ऑस्कर चित्रपट पुरस्कार सोहळ्यात पाठविण्यासाठी निवड झाल्यामुळे किरण राव या बाबतीत आठव्या महिला दिग्दर्शक ठरल्या आहेत.