लॉन बॉल या खेळाबद्दल भारतीयांना फारच कमी माहिती आहे. परंतु राष्ट्रकुल स्पर्धा २०२२ मध्ये भारतीय महिला लॉन बॉल संघाने ९२ वर्षाचा इतिहास मोडीत काढत लवली चौबे, रूपा राणी टिर्की, पिंकी आणि नयनमोनी सैकिया या चौघींनी शानदार कामगिरी करून इतिहास घडवला. या चार रणरागिणींनी अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा १७-१० असा पराभव करून सुवर्णपदक जिंकले. तेव्हा पासून या खेळाचा आणि या चार खेळाडूंच्या नावाचा डंका देशभर वाजू लागला आहे.

या चारही खेळाडूंचे नाव आज सर्वत्र प्रसिद्ध झालेले असले तरी या खेळाडू फार जुन्या आहेत. त्यामधील या खेळाची कर्णधार लवली चौबे हिच्या बद्दल जाणून घेऊ. लवली चौबे ही मूळ रांचीची. लवलीने तिच्या खेळाची सुरुवात ही लांब उडी या क्रीडा प्रकाराने केली होती. परंतु दुखापतीमुळे तिला या खेळांमधून माघार घ्यावी लागली. त्यानंतर सरकारी नोकरी स्वीकारुन ती झारखंड पोलीस विभागात कॉन्स्टेबल म्हणून रुजू झाली. तेव्हा तिला लॉन बॉल या खेळाबद्दल माहिती मिळाली. त्यावेळी लॉन बॉल हा फारसा प्रसिद्ध नसलेला खेळ खेळण्याचा निर्धार लवलीने केला.

या खेळामध्ये जास्त शारीरिक तंदुरुस्तीची गरज नसल्याने तिला दुखापतीनंतरही हा खेळ सहज खेळणे शक्य होते. २००८ मध्ये लवलीने पहिल्यांदा या लॉन बॉलच्या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये भाग घेऊन सुवर्णपदक पटकावले. त्यामुळे तिचा आत्मविश्वास वाढला. २०१४ मध्ये लवलीने राष्ट्रकुल स्पर्धेसाठी पात्रता मिळवली. तर २०१८ मध्ये पाचव्या स्थानावर येत आता सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे.

या खेळातील दुसऱ्या रणरागिणीचे नाव आहे पिंकी. मूळची दिल्लीची असलेली पिंकी दिल्लीमधील एका सरकारी शाळेमध्ये शारीरिक शिक्षण या विषयातील शिक्षिका आहे. २०१०साली दिल्लीमध्ये पार पडलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेपूर्वी लॉन बॉल स्पर्धेच्या सरावाचे ठिकाण त्यांच्या शाळेत तयार करण्यात आले होते. त्यावेळी पिंकीच्या मनामध्ये या खेळाविषयी आवड निर्माण झाली. त्यानंतर या खेळाबद्दल पूर्ण अभ्यास करून ती २०१४ आणि २०१८च्या राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये सहभागी झाली. राष्ट्रीय स्तरावर अनेक पदके मिळवण्यात पिंकी यशस्वी झाली. पिंकीने २०१७ मध्ये झालेल्या आशियाई स्पर्धेमध्ये लॉन बॉल्सच्या तिहेरी प्रकारांमध्ये भारतासाठी सुवर्णपदक जिंकले होते.

नयनमोनी सैकिया ही या संघातील सर्वात तरुण खेळाडू आहे. आसाममधील गोलाघाट येथे राहणारी नयनमोनी शेतकरी कुटुंबामधील आहे. २००८ साली तिने लॉन बॉल हा खेळ खेळण्यास सुरुवात केली. ईशान्य भागामध्ये खेळ हा प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य घटकच आहे. २०११ साली नयनमोनीने या खेळाच्या एकेरी आणि तिहेरी प्रकारांमध्ये आपल्या खेळाचे उत्कृष्ट प्रदर्शन करत सुवर्णपदक मिळवले. त्याच साली तिने आसाम वनविभागामध्ये काम करण्यास सुरुवात केली. २०१२ मध्ये मुलींच्या एकेरी आशियाई स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा आपले कर्तृत्व दाखवत सुवर्णपदक प्राप्त करत आपल्या मेहनतीचे फळ मिळवले. पुढे आपल्या कर्तृत्वाने तिने अनेक पदके मिळवली व आज भारताला ऐतिहासिक विजय मिळवून देण्यात ती सफल झाली.

या संघामधील चौथी खेळाडू आहे झारखंडची रूपा राणी टिर्की. रूपा राणी याआधी राष्ट्रीय स्तरावर कबड्डी हा खेळ खेळत होती काही कालावधीनंतर तिने लॉन बॉल हा खेळ खेळण्यास सुरुवात केली. तिने जेव्हा या खेळास सुरुवात केली तेव्हा या खेळाला काही भविष्य नाही; दुसऱ्या खेळाकडे लक्ष द्यावे, असे तिच्या घरच्यांना वाटत होतं पण हा दबाव झुगारून देत आधीच तिने लॉन बॉल याच खेळात भविष्य घडवण्याचा निर्णय घेतला होता. २००७ साली गुवाहाटीमध्ये ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक १० दिवसाची शिबीरं घेण्यास आले होते तेव्हा त्या शिबिरात रुपा राणीची निवड झाली. लॉन  बॉलचे प्रशिक्षण घेण्यास तिने सुरुवात केली. २००९ मध्ये ती ऑस्ट्रेलियात ज्युनियर वर्ल्ड कपसुद्धा खेळली. त्याच वर्षी चीनमध्ये झालेल्या आशियाई स्पर्धेमध्ये सुवर्णपदक प्राप्त करत राष्ट्रकुल स्पर्धेत आपले चौथे आणि २०१८ च्या राष्ट्रकुल स्पर्धेत आपले पाचवे स्थान निश्चित केले. या वर्षी २०२२ च्या राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये सुवर्णपदक पटकावले.

भारताच्या महिला लॉन बॉल संघाने कोणत्याही सोयी-सुविधा नसताना आपल्या मेहनतीने हे सुवर्णपदक भारताला मिळवून दिले आहे. त्यांच्या या घवघवीत यशाकडे बघून अनेक युवा खेळाडू या खेळाकडे नक्कीच आकर्षित होतील.

Story img Loader