वनिता पाटील

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हातमागाची साडी नीट चापूनचोपून नेसलेली, वेणी घातलेली, कपाळावर टिकली टेकवलेली अगदी शालीन भारतीय नारी दिसणारी लिसा टीव्हीच्या पडद्यावर बातम्या द्यायला आली तर सगळ्यांचं लक्ष वेधून घेणार हे उघडच आहे. टीव्ही वृत्तवाहिन्यांवरील आरडाओरडा करत जग डोक्यावर घेणाऱ्या निवेदिकांच्या तुलनेत लिसाचा वावर अगदीच सौम्य, शालीन म्हणावा असा… तिला बघून अशी असायला हवी वृत्तनिवेदिका असं अगदी तुम्हीही म्हणाल…

पण लिसा माणूस नाहीये, असं तुम्हाला कुणी सांगितलं तर…?

होय, लिसा माणूस नाही तर आर्टिफिशिअल इंटेलिजन्स म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने तयार केली गेलेली पहिली प्रादेशिक व्हर्च्युअल-वृत्तनिवेदक आहे. संगणक निर्मित न्यूज अँकर असंही हवं तर आपण तिला म्हणू शकतो. ओदिशा टीव्ही या ओदिशातील खासगी वृत्तवाहिनीने तिला सादर करून टीव्ही पत्रकारितेच्या क्षेत्रातील क्रांतीची चुणूक दाखवून दिली आहे.

लिसा उरिया, इंग्रजीसह आणखीही काही भारतीय भाषा बोलू शकते. ती फक्त लिहून दिलेल्या बातम्याच वाचते, असं नाही, तर ती इंटरॅक्टिव्हदेखील आहे. म्हणजे अनेकदा लाइव्ह कार्यक्रमात वृत्तनिवेदक बातमीदाराचे फोन कॉल घेतो आणि त्याच्याशी बोलतो. त्याला प्रश्न विचारतो, त्याच्याकडून माहिती जाणून घेऊन ती प्रेक्षकांना सांगतो. हे सगळं काम लिसादेखील करू शकते. फक्त बातमीदारच नाही, तर इंटरॅक्टिव्ह कार्यक्रमात प्रेक्षकांचे फोन कॉलही ती घेऊ शकेल, अशी तिची रचना करण्यात आली आहे.

ओडिशा टीव्हीने ट्वीटरवर सादर केलेल्या व्हिडिओत लिसाने अगदी कोणत्याही टीव्ही अँकरने करून द्यावी तशी स्वत:ची ओळख करून दिली. तंत्रज्ञान आणि पत्रकारिता या दोन्ही क्षेत्रातील उत्कृष्टतेचा हा संगम असून आता लौकरच लिसाची बातमीपत्रे सुरू होणार आहेत, असं ओदिशा टीव्हीने म्हटलं आहे.

अर्थात लिसा ही काही कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने तयार केलेली पहिली वृत्तनिवेदक नाही. याआधी इंडिया टुडे ग्रुपनेदेखील मार्च महिन्यात त्यांची सना ही कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने तयार केलेली वृत्तनिवेदक सादर केली होती. हुषार, सुंदर, चिरतरुण आणि अथक असं त्यांनी तिचं वर्णन केलं होतं. तर कुवेत न्यूजने फेदा ही त्यांची व्हर्च्युअल अँकर सादर केली होती. तर त्याही आधी म्हणजे २०१८ मध्ये चीनच्या एका वृत्तवाहिनीने एक पुरूष व्हर्च्युअल अँकर सादर केला होता.

टीव्हीवरच्या वृत्तवाहिन्यांसाठी प्रादेशिक भाषेत व्हर्च्युअल अँकर ही तंत्रज्ञानाच्या प्रगतीची कमाल ठरेल, ही गोष्ट खरीच आहे, पण असे अँकर प्रत्यक्षात येतील आणि खरोखरच काम करायला लागतील तेव्हा काय होईल याची कल्पना तरी करून बघा… आज वेगवेगळ्या वृत्तवाहिन्यांवर काम करणाऱ्या मानवी अँकर्सना कदाचित काही कामच उरणार नाही, त्याचे काय?

कधीही न थकणारे-दमणारे, सुट्ट्याबिट्ट्या सोडूनच द्या पगारही न मागणारे असे व्हर्च्युअल अँकर्स म्हणजे नव्या युगातले कर्मचारी कुणाला हवेहवेसे असतील आणि कुणाच्या पोटावर पाय आणतील ते वेगळे सांगायला नको. शिवाय असे व्हर्च्युअल कर्मचारी फक्त टीव्ही वृत्तवाहिनीवरच असतील असे नाही, तर इतरही वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये त्यांचा शिरकाव आणि वापर होणार हे उघड आहे.

मानवी बुद्धीच्या तिच्या वापराच्या शक्यता अथांग असल्या तरी त्या सगळ्या मानवी गुणदोषांसहित येतात. मानवी दोष टाळून कृत्रिम बुद्धिमत्ता विकसित करत नेण्याची महत्त्वाकांक्षा बाळगून त्या दिशेने काम सुरू आहे. त्यामुळे दिवसेंदिवस स्वत:ला विकसित करत नेणारी कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मानवी मेंदू यांची स्पर्धा नजिकच्या नसली तरी एकूण भविष्यकाळात अटळ आहे. व्हर्च्युअल अँकर्सनी त्या दिशेने एक पाऊल टाकलं आहे आणि लिसा हे त्याचं दृश्य रुप आहे, असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही.

lokwomen.online@gmail.com

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indias first regional arifical integlance tv news anchor lisa asj