-लता दाभोळकर
समोर घाट रस्ता… इतकं धुकं की समोरचा रस्ता, वाहनं काहीच दिसत नाहीए… २० वर्षं ती ट्रक चालवतेय, पण या दिवसांत असं दृष्य तिनं कधीही पाहिलं नव्हतं. तिच्या शेजारी बसलेली व्यक्ती जरा धास्तावलीय, आता आपलं काय होईल, या धुक्यातून ही ट्रक ड्रायव्हर बाई आपल्याला सुखरूप नेईल का, ही चिंता त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसतेय… पण ती ट्रक ड्रायव्हर मात्र निश्चिंत आहे, कारण तिला आपल्या ड्रायव्हिंगवर पक्का विश्वास आहे… ती अस्खलित इंग्रजीत सांगतेय, ‘‘डोंट वरी, आय एम ए परफेक्ट ड्रायव्हर.’’ अशा कठीण परिस्थितीतही न डगमगता छातीठोकपणे शेजारच्या व्यक्तीला आश्वस्थ करणारी ही आहे भारतातली पहिली महिला ट्रक ड्रायव्हर योगिता रघुवंशी…
आताशा बायका विमानं चालवू लागल्या आहेत, तरी बायकांना कसा ड्रायव्हिंग सेन्स नाही, गाडी चालवताना त्या कशा गडबड करतात, याबाबतचे विनोद पुरुषांच्या घोळक्यात वा व्हॉट्सॲप ग्रुपवर फिरतात आणि बायकांचं ड्रायव्हिंग हा यथेच्छटिंगलीचा विषय ठरतो. पण योगिता रघुवंशींसारख्या महिला पुरुषांच्या या मानसिकतेला मोठीच चपराक देतात. एकुणात आपल्याकडे ट्रक ड्रायव्हरकडे पाहण्याचा दृष्टीकोन फारसा सकारात्मक नाहीच, आणि त्यातही एखादी महिला ट्रक चालवते म्हटलं की पुरुषांकडून हमखास टिंगलटवाळी आणि एक-दोन कुत्सित विनोद हे ठरलेलेच. पण योगिता रघुवंशी यांची कहाणी ऐकली की या जिगरबाजबाईचं कौतुक करावं तितकं थोडंच.
आणखी वाचा- लग्नाच्या चार दिवसांआधी घरातून पळून गेलेल्या तीन सख्ख्या बहिणींची गोष्ट, ‘या’ कारणाने उचललं पाऊल
योगिता रघुवंशी या महाराष्ट्रातल्या नंदुरबार जिल्ह्यातल्या. वाणिज्य शाखेतली पदवी मिळाल्यानंतर त्यांचं लग्न झालं. लग्नानंतर दोन मुलं झाली. पण अचानक पतीच्या अपघाती निधनानंतर त्यांच्यापुढे कुटुंबाची जबाबदारी येऊन पडली. पण या घटनेने हादरून न जाता त्या मुलांसाठी आत्मविश्वासाने उभ्या राहिल्या… आणि आज थोडा थोडका नाही तर तब्बल २० वर्षांचा ट्रक चालवण्याचा तगडा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. या अनुभवाची पाेतडी भरली आहे ती खाचखळग्यांच्या वाटांनी आणि त्यांच्या जिगरबाज कहाण्यांनी.
ट्रक ड्रायव्हर म्हणजे अशिक्षित, हे आपल्या मनातलं आणखी एक पक्कं समीकरण. पण योगिता याला अपवाद आहेत. त्या शिकलेल्या आहेत. वाणिज्य शाखेतून पदवी प्राप्त केली आणि विशीत त्यांचं लग्न झालं. नवरा वकील होता आणि त्यांचा ट्रान्सपोर्टचा बिझनेसही होता. त्यामुळे नोकरीसाठी घराबाहेर पडण्याची कधी गरजच पडली नाही. घर आणि दोन मुलं सांभाळणं एवढीच जबाबदारी त्यांच्यावर होती. पण पतीच्या निधनानंतर कुटुंबाचा चरितार्थ चालवण्यासाठी चांगले पैसे मिळावेत या व्यावहारिक निर्णयातून त्यांनी ट्रक चालवायचं ठरवलं. नवऱ्याचा ट्रान्सपोर्टचा बिझनेस असल्याने त्यांच्याकडे ट्रक ड्रायव्हर कामाला होते, पण या बिझनेमधूनही फारशी कमाई होत नव्हती, हे त्यांना जाणवलं. मग योगिता यांनी स्वत:च ट्रक चालवण्याचं प्रशिक्षण घेतलं आणि त्यांनी ट्रकचं स्टिअरिंग हाती घेतलं.
पतीच्या निधनानंतर मुलांचा सांभाळ करायचा तर चांगले पैसे गाठीशी हवेत, कारण त्यांच्या एकटीच्या खांद्यावर कुटुंबाची जबाबदारी होती. मग त्यांच्या लक्षात आलं की, आपल्याला उत्तम आणि त्वरित पैसे मिळविण्याचा मार्ग हा ‘ट्रकमार्गे’ जातो आणि कोणताही मागचा-पुढचा विचार न करता त्यांनी त्याचं रितसर प्रशिक्षण घेतलं. ते स्टिअरिंग त्यांनी आजतागायत सोडलेलं नाही. ट्रक चालवण्याचा खडतर मार्ग त्यांनी आपल्या जिगरबाज स्वभावामुळे सुकरही केला.
ट्रक ड्रायव्हर म्हणजे टायर बदलणं, इंजिन दुरूस्त करणं हेही आलंच, पण ही सगळी कामं त्या समर्थपणे करतात. त्यात कोणतीही कसूर नाही. ट्रक चालवताना अनेक राज्यं त्यांनी पालथी घातली आहेत. त्या एकट्याच माल नेण्या-आणण्यासाठीचा व्यवहार करतात. मेघालयातील घाटरस्ते असोत, की चेरापुंजी… त्या समर्थपणे या रस्त्यांवरून ट्रक चालवतात. महिला ट्रक डायव्हरही पुरुष ट्रक ड्रायव्हरप्रमाणेच सक्षमपणे ट्रक चालवू शकतात हे त्यांना सिद्ध करायचं होतं आणि त्यांनी ते केलं. ट्रक ड्रायव्हर म्हणून त्यांची पहिली ट्रिप होती भोपाळ ते अहमदाबाद. पण त्यांचा स्वत:वर गाढ विश्वास होता. त्यांना रस्तेही माहीत नव्हते. लोकांना विचारत विचारत हा ही ट्रीप पूर्ण केली. त्यांनी या कामाला एक चॅलेंज म्हणून स्वीकारलं नाही, यूँ ही चलाचल राही… हाच मार्ग स्वीकारला. ‘माझ्या कुटुंबासाठी मी हे करतेय’ हेच कारण त्यांना बळ देणारं ठरलं. लोक काय म्हणतील, म्हणतायात याकडे लक्ष दिलं नाही, मला जे आवडतंय ते मी करतेय ही भावना मनाशी पक्की होती. या कामानं त्यांना खूप आत्मविश्वास दिला. त्यांची स्वच्छ राहणी, उत्तम इंग्रजी बोलणं आणि बोलण्यातून जाणवणारा सुशिक्षितपणा… अशा त्यांच्या व्यक्तिमत्त्वातून आपल्या मनातील ट्रक डायव्हरची ठरावीक छबी पुसली जाते.
ट्रक ड्रायव्हर म्हणून अनेक महिला या क्षेत्रात येत नाहीत याचं मुख्य कारण त्या सांगातात की, ‘‘आपल्याकडे महिलांसाठी शौचालयं नाहीत. माझ्यासाठीही ही एक मोठी समस्या होती, पण मी त्यातूनही मार्ग काढत गेले. नैसर्गिक विधींसाठी जाताना मी डोक्याला मुंडासं बांधावं तसं कापड गुंडाळते, कारण मी बाई आहे हे काणालाही कळू नये. अगदी समोरच्याला मी पुरुष वाटावे असेच कपडे परिधान करते. या क्षेत्रात पुरुष ट्रक डायव्हरांनी खूप मदत केली. मला त्यांची कधीही भीती वाटली नाही. मला भीती वाटायची ती रस्त्यावरून जाणाऱ्या अनोळखी माणसांची.’’ या वीस वर्षांमध्ये त्यांच्यावर अनेकदा हल्ले झाले. एकदा तर त्यांच्या जीवावरच बेतलं होतं, परंतु त्यांच्या धाडसी स्वभावामुळे त्यांनी तोही प्रसंग निभावून नेला. त्या सांगतात, ‘‘मी घरातून बाहेर पडताना नेहमी मुलांकडे सही केलेले चेक द्यायचे आणि त्यांना सांगायचे की, मला काही झालं असं कळलं तर लगेच माझ्या खात्यातून पैसे काढून घ्या आणि नंतर लेाकांना सांगा की आईला काहीतरी झालंय. कारण मला जरी काही झालं तरी माझ्या मुलांजवळ गुजराण करायला काहीतरी पैसे हवेत.’’
ट्रक ड्रायव्हर म्हणून काम करताना आपलं ट्रक चालवणं हे अनेक बायकांसाठी प्रेरणादायी ठरेल असा विचारही कधी केला नसल्याचं त्या सांगतात, पण आज हा विचार जेव्हा मनात येतो तेव्हा त्यांना खूप आनंद होतो. त्या ठामपणे सांगतात, ‘‘कठीण परिस्थितीत तुम्ही हातावर हात ठेवून शांत बसलात तर तुमचं काही खरं नाही. तुम्ही ठरवलेल्या वाटेवर मार्गक्रमण करीत राहिलात तर रस्त्यावरचे अडथळे, खाचखळगे तुमचा रस्ता अडवूच शकत नाहीत.’’ आणि हे त्यांनी स्वत: सिद्ध केलं आहेतच!
lokwomen.online@gmail.com