जुन्या काळात स्त्रियांनी घर सांभाळावे आणि पुरुषांनी घराबाहेरील कामे करून कुटुंब चालवावे असा समज होता. मात्र, आत्ताच्या या नवं युगात महिला आणि पुरुष अगदी खांद्याला खांदा लावून एकमेकांच्या जोडीने काम करताना आपण पाहत आहोत. इतकेच नाही तर गेल्या वर्षांमध्ये स्त्रियांनीदेखील त्या कुणापेक्षा कमी नाही हे सिद्ध करून दाखवले आहे. मग क्षेत्र कुठलेही असूदे. मागच्या अनेक वर्षांत असंख्य महिलांनी स्वतःचे बिझनेस म्हणजेच उद्योगधंदे सुरू केले आहेत, तर काही महिला या उद्योजिका [entrepreneurs] म्हणून नावाजल्या आहेत. या उद्योजिकांमधील सर्वात यशस्वी आणि प्रसिद्ध असे एक व्यक्तिमत्त्व म्हणजे, कनिका टेकरीवाल. स्वतःची तब्बल १० विमाने असणारी कनिक टेकरीवाल म्हणजे कोण आणि तिचा प्रवास काय, ते जाणून घेऊ.
कनिका टेकरीवाल कोण आहे?
कनिका टेकरीवाल ही जेट सेट गो [CEO of JetSetGo] या कंपनीची संस्थापक आणि सीईओ [CEO] आहे. भारतातील सर्वात श्रीमंत स्त्रियांमधील एक नाव म्हणजे कनिका टेकरीवाल. तिचे नेटवर्थ हे जवळपास ४२० कोटी इतके आहे. वयाच्या २२ व्या वर्षी कर्करोगावर मात करून त्यांनी विमान आधारित एखादा स्टार्टअप सुरू करण्याचे ठरवले होते. मात्र, आता या स्टार्टअपने इतके यश प्राप्त केले आहे की, कनिकाकडे स्वतःच्या मालकीची १० विमाने आहेत, असे डीएनएच्या [DNA] एका माहितीवरून समजते.
आतापर्यंत या कंपनीने एकूण एक लाख प्रवाशांना त्यांच्या इच्छितस्थळी सुखरूप पोहोचवले आहे. आत्तापर्यंत सहा हजार विमानांनी यशस्वी उड्डाणे केली आहेत. या आकड्यांनी तसेच त्यांच्या कामाने हवाई क्षेत्रात त्यांनी स्वतःचा ठसा उमटवला आहे. स्वतःचे एक स्थान निर्माण केले असून, ही कामगिरी अतिशय कौतुकास्पद आहे.
कनिका टेकरीवालचा प्रवास
एका मारवाडी कुटुंबात १९९० साली कनिका टेकरीवालचा जन्म झाला. २०१२ रोजी तिने स्वतःचा जेट सेट गो हा स्टार्टअप सुरू करून स्वतःचा उद्योजिका म्हणून प्रवास सुरू केला. कनिकाने तिचे शालेय शिक्षण ‘लॉरेन्स स्कूल, लव्हडेल’ येथून आणि भोपाळमधील जवाहरलाल नेहरू सिनियर माध्यमिक विद्यालयातून पूर्ण केले आहे. तसेच पदवीचे शिक्षण ‘कोव्हेंट्री’ या विद्यापीठातून पूर्ण केले.
कनिका टेकरीवालचे नाव हुरुन या श्रीमंतांच्या यादीमधील सर्वात तरुण श्रीमंत महिलांपैकी एक आहे. वयाच्या विसाव्या वर्षी कनिकाला कर्करोग झाला असल्याचे समोर आले. मात्र, २२ व्या वर्षी त्यावर मात करून कनिकाने तिचे ध्येय पूर्ण केले. तिचे लग्न हैदराबादच्या एका व्यावसायिकाशी झाले आहे.
कोणत्याही उत्तम कामगिरीसाठी पुरस्कार हा मिळतोच. त्याप्रमाणे, कनिकालादेखील तिच्या व्यावसायिक कौशल्यांचे अनेक पुरस्कार देण्यात आले आहेत. त्यामध्ये एवढ्या उत्तम कामगिरीसाठी भारत सरकारचा राष्ट्रीय उद्योजकता पुरस्कार आणि वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचा यंग ग्लोबल लिडर्स अशा मोठमोठ्या पुरस्कारांचादेखील समावेश आहे.