संपदा सोवनी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘ती’ काळी आहे. पण नुसती काळी नव्हे! रूढ समजानुसार अगदी ‘काऽऽऽली कलुटी’च म्हणावं लागेल तिला. ‘ही आफ्रिकेतून आलीय की काय?’ वगैरे ‘विनोद’ ज्या रंगाच्या बाबतीत केले जातात ना, तश्शीच दिसते ती. पण या ‘आफ्रिका’ विनोदाला चांगलीच चपराक लगावणारी कामगिरी नोंदवल्यामुळे सध्या तिचं नाव चर्चेत आलंय. ‘ती’ आहे तमिळनाडूची २४ वर्षांची मॉडेल सॅन रेचेल गांधी. सध्या ती ओळखली जातेय ‘मिस आफ्रिका गोल्डन वर्ल्ड २०२३’ या स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्त्व करून ‘फर्स्ट रनर अप’चं स्थान मिळवल्याबद्दल.

सॅन रेचेलचा जन्म पाँडिचेरीचा. खरंतर दक्षिण भारतात त्वचेचा रंग काळा असणं सामान्यच म्हणायला हवं, पण तरी सॅन रेचेलला लहानपणापासून त्वचेच्या रंगावरून बरेच टोमणे ऐकावे लागले. भारतीयांना गौरवर्णाचं अतिरेकी प्रेम आहेच. तिची त्वचा गडद काळी असल्यानं लहानपणी मुलं तिला आपल्यात सामावून घ्यायची नाहीत, तिला हिणवलं जायचं. गोरं होण्यासाठी तिनं अगदी कंटाळा येईपर्यंत सौंदर्यप्रसाधनं वापरून पाहिली. ती एका मुलाखतीत सांगते, ‘एका क्षणी मला असं जाणवलं, की त्वचेच्या रंगापेक्षा माणसाचं वागणं, त्यांच्या इतरांशी वागतानाचा ॲटिट्युड, हे अधिक महत्त्वाचं आहे. यातून आत्मविश्वास मिळाला. सगळ्या चित्रपटांमध्ये गोऱ्याच नायिका दाखवलेल्या असायच्या, तेव्हा मला वाटायचं, की काळी मुलगी कधी सुंदर असूच शकत नाही का? पण समाज आपल्या मनावर हेच बिंबवतो. मॉडेलिंग सुरू केलं, तेव्हा माझ्या रंगामुळे मला खूप असुरक्षित वाटे, पण हळूहळू तसं वाटेनासं झालं. काळ्या रंगाकडे फक्त गोऱ्या रंगासारखाच एक रंग म्हणून बघायला हवं. सौंदर्याची पातळी ठरवण्यासाठीचा तो मापदंड नसावा.’

आणखी वाचा-रेडिओ जॉकी ते मिझोरामच्या सगळ्यात तरुण महिला आमदाराचा मान; जाणून घ्या बेरिल व्हॅनीहसांगी यांचा प्रेरणादायी प्रवास

‘मिस आफ्रिका गोल्डन वर्ल्ड’ ही जागतिक स्तरावरची खास कृष्णवर्णीय मुलींसाठीची सौंदर्यस्पर्धा आहे. कृष्णवर्णीय संस्कृतीचा प्रचार आणि आफ्रिकेतील पर्यटन व्यवसायाला चालना देणं हा या स्पर्धेचा उद्देश आहे. नुकतीच या स्पर्धेची अंतिम फेरी दक्षिण आफ्रिकेतील गुटेंग (Gauteng) इथं झाली. त्यात ‘मिस सेनेगल’ ही स्पर्धा जिंकली, भारताची सॅन रेचेल ‘फर्स्ट रनर अप’- म्हणजेच दुसऱ्या क्रमांकावर आली, तर ‘मिस गिनी’ ‘सेकंड रनर अप’ ठरली. सॅन रेचेल या विजयानंतर सांगते, “ऐश्वर्या राय जेव्हा ‘मिस वर्ल्ड’ झाली, तेव्हा मी नववीत शिकत होते. त्या वेळी सर्वजण ऐश्वर्याला तिच्या नावानं नव्हे, तर ‘मिस वर्ल्ड’ म्हणूनच संबोधत होते. त्यानंतरच मी फॅशन मॉडेल होण्याचा निर्णय पक्का केला होता! कधी तरी आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर देशाचं प्रतिनिधित्त्व करायला मिळावं अशी माझी इच्छा होती, ते या स्पर्धेच्या निमित्तानं करायला मिळालं. २०१६ मध्ये मी मॉडेलिंग सुरू केलं. माझं हे स्वप्न आज ८ वर्षांनी पूर्ण होतंय.”

सॅन रेचेल मॉडेलिंग प्रशिक्षक, अर्थात ‘रनवे कोच’सुद्धा आहे. यापूर्वी तिनं ‘मिस पाँडिचेरी २०२२’चा किताब जिंकला आहे. आपल्यापैकी अनेकजणी चांगलं इंग्लिश बोलता येत नाही म्हणून इंग्लिश बोलायचंच टाळतात. असं वाटणाऱ्यांनी सॅन रेचेलचे सुरूवातीचे इंटरव्ह्यू नक्की पाहावेत. इंग्लिश अस्खलित बोलता येत नसतानाही ती किती आत्मविश्वासानं स्वत:चं मत मांडू शकते, याचा प्रत्यय त्यात येतो. शिवाय ती तमिळ उत्तम बोलते. कृष्णवर्णीय स्त्रीचं सौंदर्य ती मॉडेलिंगमधून उत्तम प्रकारे सादर करतेच, पण ‘इन्स्टंट गोरं होण्यासाठीच्या उपायांचा काही फायदा होत नाही. त्यापेक्षा स्वत:ला आहे तसं स्वीकारा. खरा बदल स्वत:च्या स्वीकारानंतरच जाणवेल!’ असं ती सार्वजनिक व्यासपीठावर ठामपणे सांगते.

lokwomen.online@gmail.com

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indias san rachel second in the world beauty pageant miss africa golden world 2023 mrj