शिकण्याची जिद्ध असेल तर वय, परिस्थिती अशा कोणत्याच गोष्टी अडचण वाटत नाही. भारतात अशा अनेक व्यक्ती आहेत, ज्यांनी अगदी कमी वयात शिक्षणास सुरुवात केली आणि कमी वयातच आपल्या उच्च शिक्षणाचे एक स्वप्न पूर्ण केले. यातीलच एक नाव म्हणजे नयना जैस्वाल. जिने भारतातील सर्वात तरुण महिला पीएचडी धारक होण्याचा मान मिळवला आहे. केवळ शिक्षणातच नाही तर खेळातही तिने आपले वेगळे नाव कमावले. ती आंतरराष्ट्रीय स्तरावर एक टेबल टेनिस चॅम्पियन आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नैनामध्ये अगदी लहान वयापासूनच शिक्षणाविषयीची असलेली तळमळ आणि जिद्द दिसून येत होती. ज्या वयात बहुतेक मुले प्राथमिक शिक्षणाच्या सुरुवातीच्या टप्प्यात असतात. त्या वयात म्हणजे वयाच्या अवघ्या ८ व्या वर्षी तिने १० वी बोर्डाची परीक्षा उत्तीर्ण केली होती. वयाच्या १० व्या वर्षात तिने तिचे शालेय शिक्षण पूर्ण केले.

यानंतर तिने वयाच्या १३ व्या वर्षी मास कम्युनिकेशन आणि पत्रकारिता या विषयात बॅचलर पदवी मिळवली. पण इथेच न थांबता नयनाला आयुष्यात कोणी कधीच साध्य न केलेली कामगिरी करायची होती. तिने वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षी हैदराबादमधील उस्मानिया विद्यापीठातून राज्यशास्त्रात पदव्युत्तर पदवी मिळवून भारतातील सर्वात तरुण पदव्युत्तर पदवीधर म्हणून स्वत:ची उल्लेखनीय ओळख निर्माण केली.

त्यानंतर तिने वयाच्या १७ व्या वर्षी पीएचडीचा प्रवास सुरू केला. ती केवळ २२ वर्षांची असताना भारतातील सर्वात तरुण पीएचडी धारक म्हणून खिताब मिळवण्यात यशस्वी ठरली. यामुळे भारतातील सर्वात तरुण डॉक्टरेट पदवीधारक म्हणून इतिहासात तिचे नाव नोंदवले गेले. याव्यतिरिक्त तिने कायद्याची पदवी देखील घेतली आहे. शिक्षणाबरोबरच नैना ही आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस खेळाडू आहे, जी राष्ट्रीय आणि दक्षिण आशियाई चॅम्पियन आहे. तिने देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक पदकांची कमाई केली आहे. तिच्या पालकांनी तिने होमस्कूलिंग करावे असा निर्णय घेतला, जेणेकरून तिला खेळताही येईल आणि शैक्षणिकदृष्ट्या तिला आणखी काही करायचे असेल तर त्यातही संतुलन राखू शकेल.

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indias youngest female phd holder naina jaiswal she completed class 10th at age 8 then ug at 13 chdc sjr