अर्चना मुळे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रागिणी कित्येक वर्षापासून फोर व्हिलर गाडी चालवायची. त्यामुळे मैत्रिणींनी तिच्याच कारमधून लाँग ड्राइव्हवर जायचं ठरवलं. ठरल्याप्रमाणे रागिणीने मैत्रिणींना गाडीत घेतलं. थोडंसं पुढं गेल्यावर टायर्समधे हवा कमी असल्याचं तिच्या लक्षात आलं. तिने हवा भरण्यासाठी गाडी पेट्रोल पंपावर नेली. तिथे तिने टायर्समधे हवा भरली. हवा भरणाऱ्या कर्मचाऱ्याने चाळीस रुपये मागितले. रागिणी पैसे देणारच होती. एवढ्यात रोहिणी तिला म्हणाली, “थांब.पैसे देऊ नकोस.”

“ का?”
“अगं, पेट्रोल पंपावर टायर्समधे हवा भरणं नि:शुल्क असतं.”
“तुला कुणी सांगितलं.”
“ मला ग्राहक कायदा माहीत आहे. गुगल सर्च केलंस तर तुलाही सहज सापडेल.”
“अगं, पण असं कसं इथं थांबायचं? यांना काय सांगायचं?”
“ मी सांगते, दादा काय हो, इथं टायरमधे हवा भरणं फ्री असतं ना.”
“नाही हो. कुणाला काय फ्री नसतंय. पैसे द्यायलाच लागतंय बघा.”

एवढी वर्ष गाडी चालवत असूनही रागिणीला ही गोष्ट माहीत नव्हती. थोडासा गोंधळ बघून पंपावरचे मॅनेजर आले. त्यांनीही पैसे द्या, असंच सांगितलं. रागिणीही पटकन पैसे देऊन निघुया, असंच म्हणत होती, पण रोहिणी ऐकायला तयारच होईना. तिने मॅनेजरला गुगलवरून आलेली माहिती दाखवली. त्यात ‘पेट्रोलपंपावरील ग्राहकांचे हक्क’ या शीर्षकाखाली बरेच मुद्दे असे होते. की जे कोणत्याही ग्राहकाला सहज समजतील. त्यात लिहिलं होतं, ‘ग्राहकांनी जरी गाडीमधे पेट्रोल भरलं नाही तरी सर्वांना येथील शौचालयाचा मोफत वापर करण्याचा अधिकार आहे. नि:शुल्क स्वच्छ पिण्याचे पाणी मिळण्याचा अधिकार आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे कारमधे पेट्रोल भरलं असेल, नसेल तरीही टायर्समधे हवा भरण्याचे कोणतेही शुल्क, कितीही क्षुल्लक असले तरीही आकारणे ग्राहकावर अन्यायकारक आहे.’

आणखी वाचा-मुलींच्या शिक्षणाचा ध्यास बाळगणााऱ्या अनीस आन्टी!

मॅनेजर गोंधळला. त्याने मालकांना फोन लावला. पलिकडून बहुदा माफी मागून गाडी सोड, असं सांगितलं गेलं असावं. मॅनेजर ‘साॅरी’ म्हणाले. त्यांनी पैसे न घेता रागिणीची गाडी सोडली.
गाडीत बसल्यावर रोहिणीचं कौतुक सुरू झालं. त्याचबरोबर ग्राहक हक्क यावर चर्चा रंगली. रागिणीने रोहिणीला विचारलं,“तुला ग्राहक हक्क कसे माहिती?”
“अगं, रेडिओवर एका ग्राहक हक्क चळवळीतील कार्यकर्त्याची मुलाखत ऐकली होती. त्यानंतर ते गुगलवर सर्च केलं. आणि ती सवयच लागली. कुठंही गेलं की आधी त्यासंदर्भातील हक्क वाचायचे. आताही आपण पंपावर जाणार म्हंटल्यावर मी लगेच गुगलवर सर्च केलं आणि सहजच हक्क दिसले. म्हणून बोलले.”
“अगं पण पुढे काय? इथे आपल्याला त्यांनी लगेच सोडलं. पण प्रत्येक वेळी सोडतीलच असं नाही. एकतर हवा भरण्यासाठीची रक्कम खूपच किरकोळ आहे. शिवाय आपण हक्कासाठी भांडायचं म्हंटलं तर तेवढा वेळ नसतो. या सगळ्यात हक्कांकडे दुर्लक्ष होतं. विनाकारण पैसे जातात.”
“ खरंय, पण ग्राहक म्हणून आपण या सुविधांचा उपयोग करून घ्यायला पाहिजे. कारण हे कायदेशीर हक्क आहेत. यांचं उल्लंघन करून काही पंपवाले पैसे मिळवतात. शिवाय अरेरावीची भाषा बोलतात. आपण का सहन करायचं? प्रत्येक ग्राहक सजग झाला तर आपले हक्क आपल्याला मिळतील.”

आणखी वाचा-मानसा मानसा कधी होशील मानूस?

“ बापरे… हे अवघड आहे. पंपवाले आपलं का ऐकतील?”
“नाही ऐकू देत. आपण ग्राहक न्यायालयात जाऊ शकतो. पेट्रोलपंप मालका विरोधात केस फाईल करू शकतो.”
“ एवढं सगळं? ते कसं काय?”
“pgportal.gov.in वर आपली ऑनलाईन तक्रार नोंदवू शकतो. त्याची प्रक्रिया फार सोपी असते. अर्थात तक्रार दाखल केल्यानंतर न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ग्राहकाला हजर रहावं लागतं.”
“ अगं वकील ठरवा आणि इतक्या किरकोळ रकमेसाठी कोर्टाची पायरी चढा. कशासाठी सगळं करायचं?”
“ ग्राहक हक्क तक्रारीसाठी प्रत्येक वेळी वकील लागतातच असं काही नाही. खूप सहज आहे गं सगळं.”
“अरे वा!! मग ठिक आहे. आत्ता आपण वेळेअभावी पटकन बाहेर पडलो. नाहीतर तू काही पंपवाल्यांना सोडलं नसतंस. थँक्स, तुझ्यामुळं हा हक्क समजला. आता मी तर माझ्या गाडीमधे हवा भरताना या हक्काचा पुरेपूर उपयोग करून घेईन. शिवाय माझ्या आजूबाजूच्या लोकांनाही या हक्काबाबत जागृत करेन. आता टायरमधे हवा फुल्ल आणि पंपावरची स्टोरी गुल करूया.”

आणखी वाचा- मैत्रिणींनो, ‘टूल्स फ्रेंडली’ होऊ या!

अशाप्रकारे रोहिणीमुळे रागिणी आणि त्यांच्या मैत्रिणींना आज एक ग्राहक हक्क समजला. ज्यामुळे त्या खुष होत्या. आता त्यांची लाँग ड्राइव्हची इच्छा पूर्ण होणार होती. त्या कारच्या स्पीडने नाही, तर आनंदाच्या वेगाने सुसाट निघाल्या.

archanamulay5@gmail.com

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Inflating tires at petrol pumps is free mrj
Show comments