“टोमॅटो १४० रुपये किलो झालेत. अजिबात खायचे नाहीत आता,” बाजारातून आल्या आल्या मोहनने आदेश सोडला.
“तुझंच बघ, ऊठसूट तुलाच लागतात टोमॅटो. आम्हाला नाही. सँडवीच काय, चटणी काय, काहीच नाही तर नुसते खातोस टोमॅटो.” अमृताने त्यालाच सुनावलं.
“अगं पण कालवणात आणि वरणात तर हवेतच ना गं टोमॅटो?” मोहनला कल्पनाच सहन होत नव्हती टोमॅटोशिवाय जेवणाची.
“ कशाला हवेत. काल छान आमसूलं घालून केलेलं कालवण. ओरपून ओरपून जेवलासच ना?” अमृताने त्यालाच गप्प केलं.
आणखी वाचा: ‘काळी, जाडी मुलगी’ ते ‘फॅशन दीवा’ या बिरुदापर्यंत पोहोचलेली रेखा!
“ अगं पण आमसुलाचं कालवण वेगळं, चिंच टाकून वेगळं नी टोमॅटो टाकून वेगळं. वरणाची सुद्धा चव बदलते ना त्याने. टोमॅटो तो टोमॅटो.”
“ आम्ही सुगरणी आहोत. कोंड्याचा मांडा करायचा आम्हाला माहीत असतो. नाही काही दिवस टोमॅटो मिळाले तर इतर गोष्टी टाकून तेवढंच चविष्ट जेवण आम्हाला करता येतं. तुझंच बघ. तुझं टोमॅटोप्रेम फारच उतू जातं. कुठले पदार्थ करायचे राहिलेत आता आपले? सलाड, सूप, चटणी, टोमॅटोचा रस्सा, सांबार, टोमॅटोभात, सॅडवीच, पावभाजी हे तर माहीत आहेतच, पण तुझं वेगळंच टोमॅटो शोरमा काय नि टोमॅटो लझानिया काय तेही प्रयोग केलेस तू. एक मात्र खरं हं. तुझ्यामुळे टोमॅटोचे असंख्य प्रकार खाल्ले आम्ही.”
“ मग तेच सांगतोय ना मी. स्वस्त आणि मस्त. चव वाढवणारे टोमॅटो. कधीही, केव्हाही खा. शिजवून खा. कच्चे खा.”
“ खरंच, फारच पंचाइत झालीय तुझी खरंच. तरी मी सांगत होते. आठवडी बाजारात १० रुपये किलोने मिळत होते टोमॅटो तेव्हा आणून छान प्युरी करून ठेवूया म्हणून. पण नको. तुला ताजे ताजेच खायचे असतात ना टोमॅटो.” अमृताने सूर लावलाच.
आणखी वाचा: आहारवेद : वजन आटोक्यात ठेवणारा मका
“ अगं, गोलगरगरीत लालबुंद टोमॅटो नुसते बघितले तरी मला लगेच मोह होतो कच्चेच खायचा. प्युरी बिरी कसली करायची त्याची. दोघांच्या चवीची तुलना तरी करता येते का? तुला ना कसली टेस्टच नाही.” इति मोहन.
“हो का? मग आण की टोमॅटो. झाले तर झाले महाग. चव महत्त्वाची ना. होऊ द्या खर्च. काय भावोजी, खरंय ना मी काय म्हणतेय ते?” तेवढ्यात घरी आलेल्या मोहनच्या मित्राला, समीरला अमृताने आपल्या गप्पांमध्ये ओढलं.
“ अहो वहिनी, मी नगरचा. आमच्याकडे काही प्रमाणात टोमॅटो पिकवला जातो. आमचे वाडवडील शेतकरीच. त्यामुळे या सगळ्यातून त्यांनाही जावच लागतं. ”
आणखी वाचा: पुरूषांनी घर आणि ऑफिसचा ताळमेळ बसवून दाखवावाच!
“ हो ना भावोजी, मलाही त्या शेतकऱ्यांचच वाईट वाटतं. दहा-वीस रुपये किलोने विकावे लागतात तेव्हा काय मिळत असेल त्यांना? पेरलेले पैसे तरी परत मिळत असतील का? याचा विचार येतो नि खरंच घेऊ नयेत टोमॅटो असंच वाटतं, पण मध्यमवर्गीय स्वभाव आपल्यात मुरलेला. कुठे काही स्वस्त मिळालं की सोडवत नाही.” अमृताच्या स्वरात खंत होतीच.
“ हो ना. दहा वीस रुपये किलो असोत किंवा थेट १२०-१४० रुपये किलो टोमॅटो. पिकवणाऱ्यांना काय मिळतं त्यात. मध्यंतरी तर शेतकऱ्यांनी तोडण्याचा नि प्रवासाचा खर्च परवडत नाही म्हणून सगळे टोमॅटो शेतातच फेकून दिल्याची बातमी वाचली होती.” मोहन म्हणाला.
“अरे मोहन, सगळ्याच शेतकऱ्यांची हीच स्थिती आहे. नगर, जुन्नर, नाशिक, सांगली, सातार येथे काही टप्प्यात टोमॅटो पिकवला जातो. पण दुर्दैवाने आपल्याकडे ‘गटशेती’ हा प्रकारच नाही. त्यामुळे एकत्र येऊन भाव ठरवणं आणि मागणी प्रमाणे पीक पिकवणं होत नाही. हे त्यांचं दुर्दैव. अगदी ५, ८, १० रुपये इतकी कमाई होते अनेकदा त्यांची दर किलो मागे. पंजाब हरयाणा येथेही काही प्रमाणात पिकवला जातो, पण भावच नसल्याने आपल्याकडेच नाही तर अगदी भारतभर १५० ते २०० रुपये किलोने विकला जातोय टोमॅटो. आजच बातमी वाचली. उत्तराखंडमध्ये २५० रुपये किलो मिळायला लागलाय टोमॅटो. आता बोला.”
“ अरे बापरे म्हणजे अजून वाढतील की काय टोमॅटोच्या किमती. सगळ्या सुगरणींना सांगितलं पाहिजे, आम्हाला कळवा टोमॅटोशिवाय कशा करायच्या भाज्या आणि डाळी. मी आपला टोमॅटोशिवायच करतो आज भेळ. चल समीर. हाजीर तो वजीर. तू आला आहेस तर खा मस्त माझ्या हातची चटपटीत भेळ… टोमॅटोशिवायची!
lokwomen.loksatta@gmail.com कळवा या पत्त्यावर. टोमॅटो लागतातच असे पदार्थ कसे कराल टोमॅटो शिवाय? आम्हाला कळवा असे काही चटपटीत पदार्थ.