आपण घरच्या घरी रानभाज्या कशा लावता येतील या विषयी माहिती घेत होतो. घोळ, रताळे, आंबुशी आणि भुईआवळा या भाज्यांबद्दल आपण माहिती घेतली. आता जाणून घेऊया अंबाडीबद्दल. गावात शेताच्या बांधावर, परसदारी सहज आढळून येणारी अंबाडी ही अत्यंत पौष्टिक अशी भाजी आहे. हिची लागवड बियांपासून करता येते. अंबाडीमध्ये दोन प्रकार असतात. दोनही प्रकारच्या भाजीचा पाला चवीला उत्तम असतो. जास्वंदीच्या कुळातली ही भाजी ‘क’ जीवनसत्त्वाने युक्त असते. साध्याशा कुंडीत छान वाढते. अंबाडी ही चवीला किंचित आंबट असते. तांदूळ कण्या आणि डाळ घालून वर चरचरीत अशी लसणाची फोडणी दिलेली अंबाडीची भाजी खाणं हे सुख आहे. शिवाय घरची ताजी भाजी असेल तर क्या कहना!

आजकाल फेसबुकवर अनेक बागकामासंबंधी ग्रुप आहेत. त्यावर देशी वाणांच्या बियांची देवाण घेवाण केली जाते. त्यावरून आपण हव्या त्या भाजीचं बी मिळवू शकतो. एकदा बी आणलं की मग मात्र आपणच आपलं बी दरवर्षाच्या लागवडीसाठी जमा करून ठेवू शकतो. हलक्याशा अंबाडीच्या बिया पावसाळ्याच्या सुरुवातीला पेरायच्या. साधारण सहा-सात दिवसांत इवली पानं वर येऊ लागतात. रोपांची पुरेशी वाढ झाली की पानं आपण भाजीसाठी वापरू शकतो.

हेही वाचा – Women Voters of Maharashtra : लोकसभेप्रमाणे विधानसभा निवडणूकही महिला केंद्रीत होणार? सरकारच्या ‘या’ योजना नेमकं काय सांगतात?

दुसरी भाजी म्हणजे लाल माठ आणि हिरवा माठ यांचीही लागवड बियांपासून करता येते. पण माठाचं पीक हे वेड पीक आहे. एकदा माठ लावला की प्रत्येक कुंडीत माठ उगवलेला दिसेल. माठाची ताजी कोवळी पानं खुडून घेतली की मस्त भाजी होते. अंबाडी काय, माठ काय यांची जेवढी पानं तोडाल तितकी रोपांची वाढ जोमाने होते. बरेच वेळा अळूची पानं कमी पडली की मी माठ, अंबाडी किंवा घोळ त्यात भर म्हणून वापरते. घोळ आणि अंबाडीचा पाला वापरला की अळूच्या भाजीत चिंच घालावी लागत नाही.

मायाळू ही अशीच एक माझी आवडती भाजी. रुंद हिरव्या हृदयाकार पानांची गच्च हिरवी मायाळूची वेल पाहणं म्हणजे नेत्र सुखचं. मायाळूला लहानशी पांढरी फुलंं येतात. फुलांचे ते इवलाले घोस तर सुंदर दिसतातच, पण त्यापासून तयार होणाऱ्या काळ्या मण्यांसारख्या बियाही तितक्याच सुरेख दिसतात. या बियांपासून सहजी रोपांची लागवड करता येते. मायाळूची पानं चवीला थोडी गुळचट असतात. पीठ पेरून किंवा ताकातली भाजी केली तर छान होते. पानांची भजीसुद्धा छान होतात.

करोना काळात मी गुळवेल लावली होती. काढा करण्यासाठी तिची पानं उपयोगी पडतं. गुळवेल ही एक औषधी वेल आहे. विना तक्रार वाढणारी गुळवेल आपण अनेक प्रकारे वापरू शकतो. पानांची भाजी करता येते. काढाही करता येतो. गुळवेलीची जून वाळलेली फांदी औषधात वापरतात. तापावर गुळवेल फार उपयोगी असते.

पावसाळ्यात बहुतेक सगळ्या कुंड्यांमध्ये हटकून वाढताना दिसते ती भाजी म्हणजे केना. गर्द हिरवी पानं असलेली केनाची बुटकी रोपं सहजी ओळखता येतात. याची भाजी आणि भजी दोन्ही उत्तम लागतात. पावसाळ्याच्या चारही महिने वापरता येईल इतपत आपल्या कुंडीतून केना आपल्याला मिळू शकतो.

हेही वाचा – सुजाता सौनिक ठरल्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव! कसा होता त्यांचा प्रवास पाहा….

कुर्डू हीसुद्धा अशीच एक तण म्हणून वाढणारी, पण चवीला उत्तम असलेली भाजी. गोलसर छोट्या पानांची कुर्डू चवीला थोडी उग्र लागते, पण तरीही हिची भाजी आवर्जून खाल्ली जाते, कारण हिला स्वतःची अशी एक वेगळी चव असते. केनाला जशी बारकी जांभळी नाजूक फुलं येतात तशीच सप्टेंबरच्या सुमारास कुर्डूलाही फुलांच्या मंडलाची आवर्तनं असलेले तुरे येतात. यावेळी यांची पानं जरी जून झाली असली तरी सड्याचं ( सडा-कातळप्रदेश ज्यावर रानफुलं उगवतात) सौंदर्य वाढलेलं असतं.

कास पठारावर किंवा मग कोकणात कित्येक सड्यावर या औषधी वनस्पती सहज पाहता येतात. दर महिन्यागणिक यांची संख्या आणि सौंदर्य वाढतच असतं. एखाद्या पावसाळी ट्रीपवरून परतताना यातील एखाददुसरं रोपं आणलं तर घरच्या घरी दर पावसाळ्यात या रानभाज्यांची चव चाखता येतेच, पण त्यांचा जीवनक्रम पूर्ण होताना त्यांचं सौंदर्यही निरखता येतं.

mythreye.kjkelkar@gmail.com