कोणतेही यश साध्य करण्यासाठी मेहनत आणि सातत्य गरजेचे असते. अनेकदा काही जण परिस्थितीसमोर हतबल होऊन प्रयत्न करणे थांबवतात आणि आपल्या स्वप्नांचा पाठलाग सोडतात. पण, आज आम्ही तुम्हाला अशा एका महिलेबद्दल सांगणार आहोत की, ज्यांना लहानपणीच मानसिक आणि शारीरिक अत्याचार सहन करावा लागला. मात्र, परिस्थितीला न घाबरता, त्यांनी तिच्याशी दोन हात केले आणि आज त्या भारतातील प्रसिद्ध उद्योजक आहेत. कल्पना सरोज असे त्यांचे नाव आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कल्पना प्रसिद्ध चित्रपट प्रॉडक्शन कंपनी ‘कमानी ट्युब्स’च्या संचालिका आहेत. त्यांची ‘कमानी ट्युब्स’ ही कंपनी आज वार्षिक कोट्यवधी रुपयांची उलाढाल करते. मात्र, इथपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना अनेक खडतर मार्गांनी प्रवास करावा लागला आहे. आपल्या आयुष्यात त्यांनी अनेक चढ-उतार पाहिले आहेत.

हेही वाचा- घटस्फोटानंतर दोन मुलांचा साभाळ करत ४५ व्या वर्षी गॅरेजमधून सुरू केली कंपनी, कोण आहेत मीरा कुलकर्णी?

कल्पना यांचा जन्म १९६२ मध्ये महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यातील एका गावात झाला. कल्पना यांचे वडील महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत होते. रेपतखेड गावात ते पोलीस शिपाई पदावर कार्यरत होते. वयाच्या अवघ्या १२ व्या वर्षी कल्पना सरोज यांचे लग्न झाले. लहानपणीच लग्न झाल्यामुळे कल्पना यांचे शिक्षण अर्धवटच राहिले. लग्नानंतर त्या सासरच्यांबरोबर मुंबईतील एका झोपडपट्टीत राहायच्या. सासरी कल्पना यांचा शारीरिक व मानसिक छळ होत होता. सासरचे लोक अनेकदा त्यांना बेदम मारहाणही करायचे. अखेर वडिलांनी त्यांना या दलदलीतून बाहेर काढले आणि वडिलांबरोबर कल्पना पुन्हा माहेरी आल्या.

परंतु, कल्पनाच्या वडिलांनी घेतलेल्या या निर्णयाला गावातील नागरिकांचा विरोध होता. संपूर्ण गावाने कल्पना यांच्या कुटुंबीयांवर बहिष्कार टाकला. या सगळ्या प्रकारामुळे कल्पना खूप खचल्या होत्या. मानसिक तणावाला कंटाळून त्यांनी आत्महत्या करण्याचाही प्रयत्न केला होता. मात्र, त्यातून त्या कशाबशा वाचल्या; परंतु या घटनेचा त्यांच्या मनावर खोल परिणाम झाला होता.

हेही वाचा- देशातील पहिल्या महिला माहूत पार्वती बरुआ यांना पद्मश्री पुरस्कार; पुरुषप्रधान क्षेत्रात स्वत:ची ओळख निर्माण करणाऱ्या “हत्तींच्या राणी”ची गोष्ट

कल्पना जेव्हा १६ वर्षांच्या झाल्या, तेव्हा कुटुंबाचे पोट भरण्यासाठी त्यांनी नोकरी करण्याचा निर्णय घेतला. त्यांना मुंबईतील एका सरकारी कापड मिलमध्ये नोकरी मिळाली. तिथे त्या शिलाईचे काम करायच्या. सुरुवातीला त्यांना दोन रुपये प्रतिमहिना पगार मिळायचा. हळूहळू त्यात वाढ होऊन, त्यांचा पगार ५० रुपये प्रतिमहिन्यापर्यंत गेला. त्यानंतर त्यांनी एका होजियरीच्या दुकानात काम करण्यास सुरुवात केली. तिथे काही वर्षे काम केल्यानंतर १९९० साली त्यांच्या डोक्यात स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याची कल्पना आली.

हेही वाचा- पंजाबच्या ‘ड्रोन दीदी’, ग्रामीण भागातील महिलांना मिळालं उत्पन्नाचं नवं साधन! जाणून घ्या ‘या’ योजनेविषयी

कल्पना यांनी के. एस. फिल्म प्रॉडक्शन नावाचे प्रॉडक्शन हाऊस सुरू केले. या प्रॉडक्शन हाऊसअंतर्गत अनेक तेलुगू, इंग्रजी व हिंदी चित्रपट प्रदर्शित करण्यात आले आहेत. त्यानंतर कल्पना यांनी रिअल इस्टेट व्यवसायातही पाऊल ठेवले. हा व्यवसाय वाढविण्यासाठी त्यांनी रात्रंदिवस मेहनत केली. आजच्या काळात कल्पना सरोज यांच्या कंपनीची उलाढाल १०० कोटींहून अधिक आहे. कल्पना यांची एकूण संपत्ती ९१७ कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. २०१३ मध्ये त्यांना व्यापार आणि उद्योग क्षेत्रातील योगदानासाठी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Inspirational story kalpana saroj who was married at 12 earned rs 2 how she became successful business women dpj