वीणा साहुमुडे मूळची छत्तीसगडची. छत्तीसगडमधल्या बालोद जिल्ह्यातील जमरूवा हे तिचं मूळ गावं. हे गाव अत्यंत मागास. अगदी शिक्षणाच्या पुरेशा सुविधाही गावात नाहीत. आज जरी सगळीकडे वीणाच्या यशा़चं कौतुक होत असलं तरीही तिच्यासाठी हा प्रवास मुळीच सोपा नव्हता.  खरं तर पाच मुली आणि एक मुलगा असलेल्या तिच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताचीच. थोडीशी जमीन आणि एक छोटंसं दुकान यावर त्यांची गुजराण चालते. लहानपणापासून अभ्यासाची आवड असणाऱ्या वीणानं लष्करात जायचं स्वप्नं पाहिलं. अथक कष्टांनी तिनं ते पूर्णही केलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तिचे आईवडील शेतकरी… लहानपणापासून तिनं त्यांना मातीत राबताना पाहिलंलं. त्यात पाच बहिणींमधली ती एक. रोजचा खर्च भागवण्यासाठीची जीवघेणी धडपडही तिनं अनुभवली आहे. आयुष्यातील आतापर्यंतच्या प्रत्येक टप्प्यावर असंख्य गोष्टींमध्ये तडजोड करूनही तिच्या डोळ्यांतली स्वप्नं तिनं विझू दिली नाहीत. त्यामुळेच आज फक्त तिच्या घरच्यांनाच नाही तर संपूर्ण गावाला, राज्याला अभिमान वाटेल अशी कामगिरी तिनं केली आहे. तिचं नाव आहे वीणा साहुमुडे. वीणाची लष्करामध्ये लेफ्टनंट पदावर नियुक्ती झाली आहे. सध्या ती अंबालामध्ये लष्करी हॉस्पिटलमध्ये लेफ्टनंट नर्सिंग ऑफिसर पदावर आहे. देशासाठी लढणारे जवान आणि त्यांचे कुटुंबीय यांच्यासाठी वीणा आता कार्यरत असेल.

हेही वाचा >>> लाटांवर स्वार होऊन विक्रम करणारी श्यामला गोली

वीणा मूळची छत्तीसगडची. छत्तीसगडमधल्या बालोद जिल्ह्यातील जमरूवा हे तिचं मूळ गावं. हे गाव अत्यंत मागास. अगदी शिक्षणाच्या पुरेशा सुविधाही गावात नाहीत. आज जरी सगळीकडे वीणाच्या यशाचं कौतुक होत असलं तरीही तिच्यासाठी हा प्रवास मुळीच सोपा नव्हता.  खरं तर पाच मुली आणि एक मुलगा असलेल्या तिच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताचीच. थोडीशी जमीन आणि एक छोटंसं दुकान यावर त्यांची गुजराण चालते. लहानपणापासून अभ्यासाची आवड असणाऱ्या वीणानं लष्करात जायचं स्वप्नं पाहिलं. अथक कष्टांनी तिनं ते पूर्णही केलं. काहीही झालं तरी शिक्षण सोडायचं नाही यासाठी तिचे आईवडील आग्रही होते. त्यांच्या मुलींनीही त्यांना साथ दिली. शालेय शिक्षण पूर्ण करण्यासाठी वीणा तब्बल १२ किलोमीटर अंतर सायकलवर पार करून दुसऱ्या गावात जायची. तिनं २०२२ मध्ये नर्सिंगचा कोर्स पूर्ण केला. त्यानंतर २०२४ मध्ये MNS (Military Nursing Services- लष्करी नर्सिंग सेवा)ची परीक्षा दिली. जिद्द, कष्ट, अभ्यासाच्या जोरावर वीणा ही परीक्षा पास झाली. १४०० उमेदवारांमधून ४५५ जागांसाठी उमेदवार निवडले गेले. त्यात वीणा एक होती. तीन महिन्यांच्या प्रशिक्षणानंतर वीणा अंबालामध्ये सेवेत रुजू झाली आहे.

तीन महिन्यांनंतर वीणा तिच्या मूळ गावी आली तेव्हा तिचं जोरदार स्वागत करण्यात आलं. तिच्या आईवडिलांना तर तिच्या यशाचं कौतुक आहेच. तिच्या गावालाही तिच्या या कामगिरीचा प्रचंड अभिमान वाटतो, त्यामुळे ती गावात परत आल्यावर तिच्यासाठी फुलांच्या पायघड्या घालण्यात आल्या आणि फुलांचा वर्षाव करून तिचं स्वागत करण्यात आलं. इतकंच नाही तर छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णू देव साय यांनीही तिच्याशी फोनवरून बोलून तिचं अभिनंदन केलं. ‘वीणानं छत्तीसगडची मान उंचावली आहे आणि राज्यातल्या फक्त मुलींनाच नाही तर संपूर्ण युवा वर्गाला प्रेरणा दिली आहे. संपूर्ण राज्याला तिचा अभिमान वाटतो,’ अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी तिचं कौतुक केलं.

हेही वाचा >>> वयाच्या अटीमुळे लग्नास अपात्र जोडपे लिव्ह-इन करता पात्र!

आपल्या यशाचं श्रेय वीणा तिच्या आईवडिलांना आणि तिच्या शिक्षकांना देते. कितीही वाईट परिस्थिती असली तरी आईवडील तिच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले. तिचं शिक्षण पूर्ण करण्यासाठी प्रोत्साहन देत राहिले असं तिनं नंतर दिलेल्या मुलाखतींमध्ये सांगितलं आहे. वीणाच्या वडिलांना शिक्षणाची खूप आवड आहे. त्यांना उच्चशिक्षण घ्यायचे होते, पण परिस्थिती आणि जबाबादाऱ्यांमुळे ते पुढे शिकू शकले नाहीत. पण मुलींनी मात्र शिक्षण पूर्ण केलंच पाहिजे यासाठी ते आग्रही होते. आपल्या मुलींनी शिक्षण घेऊन त्यांच्या पायावर उभं राहावं हे त्यांचं स्वप्नं आहे. वीणाप्रमाणेच तिच्या बहिणीही त्यांच्या करियरसाठी अथक मेहनत करत आहेत. तिच्या बहणी पोलीस, वन रक्षक आणि अन्य भरती परीक्षांची तयारी करत आहेत. मुलींच्या शिक्षणाला अजिबात महत्त्व न देणारे लोक त्यांच्या आजूबाजूला आहेत. पण ‘मुलगी शिकली, प्रगती झाली‘ यावर वीणाच्या आईवडिलांचा ठाम विश्वास आहे.

मेहनत हीच यशाची गुरुकिल्ली आहे असं वीणा सांगते. गावांमध्ये राहणाऱ्या तरुणांना मोठी स्वप्नं बघणं अवघड असतं असं तिला वाटतं. कारण त्यांच्या आसपास तशी परिस्थितीच नसते. साधनं उपलब्ध नसतात, सोयीसुविधा नसतात तर कधी घरच्यांचा पाठिंबा नसतो. त्यामुळेच छोट्या गावांमधून आजही १२ वी झालं की मुलीचं लग्न लावून देण्याची मानसिकता आहे. पण वीणाच्या आईवडिलांनी तिच्यासाठी वेगळी स्वप्नं पाहिली. तिनंही त्यांना साथ दिली. नर्सिंग झाल्यानंतर छोटी नोकरी करण्याऐवजी काहीतरी मोठं करून आईवडील आणि गावाची मान उंचावण्याचं स्वप्नं तिनंही पाहिलं आणि ते प्रचंड मेहनतीनं आणि आत्मविश्वासानं पूर्णही केलं. आता वीणा तिच्या देशसेवेच्या नोकरीत रुजू झाली आहे. तिच्या कामगिरीनं गावखेड्यातल्या असंख्य मुलींना प्रेरणा मिळाली असेल यात शंका नाही.

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Inspirational story of mns officer veena sahumade of chhattisgarh zws