UPSC म्हणजेच ‘केंद्रीय लोकसेवा आयोग’ याद्वारे आयोजित केल्या जाणाऱ्या नागरी सेवा परीक्षा (CSE) उत्तीर्ण करणे हे एक भले मोठे आव्हान असते. ही परीक्षा अजिबात सरळ सोपी नसून, सर्वात अवघड परीक्षा म्हणून प्रसिद्ध आहे. खरंतर ही परीक्षा नसून उमेदवाराचा एक प्रवास आहे. यासाठी उमेदवाराला अथक परिश्रम करावे लागतात. सातत्य आणि प्रचंड मेहेनत घेणे आणि कोणत्याही प्रकारच्या अडचणींना सामोरे जाण्यासाठी तयार राहण्याची इच्छाशक्ती ही परीक्षा देणाऱ्या उमेदवाराकडे असावी लागते. भारतातील कितीतरी तेजस्वी, हुशार उमेदवार या परीक्षेची तयारी करतात; त्यात यश प्राप्त करतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अशाच या खडतर प्रवासाच्या कहाणीमध्ये उम्मल खैर या IAS अधिकारीच्या संघर्षमय प्रवासाबद्दल आज जाणून घेऊ. आयुष्यातील सर्व कठोर परिस्थितींना हिमतीने सामोरे जाऊन उम्मलने तिचे IAS अधिकारी बनण्याचे स्वप्न पूर्ण केले आहे. राजस्थानची रहिवासी असलेल्या उम्मलच्या आयुष्याची सुरुवातीची वर्षे त्रिलोकपुरीच्या झोपडपट्टीत गेली आहेत. तिचे वडील कुटुंबाचे पालनपोषण करण्यासाठी कपडे विकण्याचे काम करत असत.

हेही वाचा : वडिलांना लहानपणीच गमावले, आई शेतावर मजूर; क्लास न लावता बनलेल्या IAS अधिकारीचा खडतर प्रवास पाहा..

मात्र, लहान वयापासूनच उम्मलची तब्येत काहीशी नाजूक होती. त्यामध्ये तिला दुर्मीळ असा हाडांचा विकार असल्याचे समजले होते. या आजारामुळे तिला आत्तापर्यंत एकूण १६ फ्रॅक्चर्स आणि तब्बल आठ शस्त्रक्रिया कराव्या लागल्या आहेत, अशी माहिती झी न्यूजच्या एका लेखावरून समजते. मात्र, असे असले तरीही उम्मल खचून गेली नाही. नियतीच्या बंधनांना न जुमानता उम्मलने आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली.

उम्मलला तिच्या शिकवणीचा खर्च , कुटुंबाची एकूण आर्थिक परिस्थिती या सर्व गोष्टींसाठी आपणही मदतीचा हातभार लावायला हवा याची समज लहान वयातच आली होती. असे असताना तिने तिचे माध्यमिक शिक्षण एका एनजीओच्या मदतीने पूर्ण केले.

मात्र, तिचे ते शिक्षण पूर्ण होताच कुटुंबाच्या विरोधामुळे उम्मलला तिच्या स्वप्नांची पूर्ती होणार नाही असे वाटू लागले होते. परंतु, घरच्यांच्या तीव्र विरोधाला आणि अशा कौटुंबिक परिस्थितीचा सामना करून, स्वतःची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी उम्मलने तिचे राहते घर सोडले आणि दुसऱ्या झोपडीत स्वतंत्रपणे राहू लागली. तिथेच तिने स्वतःवर आणि अभ्यासात प्रचंड मेहनत घेतली.

हेही वाचा : सामाजिक बंधने झुगारून माउंट एव्हरेस्ट सर करणारी ‘पहिली भारतीय महिला’; पाहा कसा झाला या गिर्यारोहकाचा प्रवास…

कष्टाचे फळ हे कायमच गोड असते असे म्हणतात. त्याचाच प्रत्यय उम्मलला बारावीच्या परीक्षेचा निकाल लागल्यानंतर आला. तिने बारावीच्या परीक्षेत ९१% एवढे चांगले गुण मिळवले होते. तिचा हा उत्तम शैक्षणिक प्रवास पुढे सुरू राहिला. पदवीचे शिक्षण उम्मलने दिल्ली विद्यापीठाअंतर्गत गार्गी महाविद्यालयात घेतले. यानंतर तिच्या मार्गात येणाऱ्या अनेक लहान-मोठ्या समस्यांचा सामना करत, जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या प्रतिष्ठित स्कूल ऑफ इंटरनॅशनल स्टडीजमधून पदव्युत्तर पदवी मिळवली. अर्थातच या सगळ्यांबरोबर उम्मलने यूपीएससी या स्पर्धा परीक्षेची जोरदार तयारी करण्यास सुरुवात केली होती.

तिच्या या अथक परिश्रमांना आणि खडतर प्रवासाला यश मिळाले होते. कारण – यूपीएससी परीक्षेत उत्तीर्ण होऊन तिने ४२० हा अखिल भारतीय रँक पटकावला होता. आता तिचे IAS अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण होण्याचा मार्ग खुला झाला होता. उम्मलचा हा प्रवास आणि तिची कहाणी अनेकांसाठी अतिशय प्रेरणादायी ठरू शकतो. आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी, कोणत्याही समस्यांना तोंड देणे, बिकट परिस्थितीवर मात करणे याचे उत्तम उदाहरण म्हणजे IAS अधिकारी उम्मल खैर आहेत, असे आपण म्हणू शकतो. अनेकांना त्यांच्या इच्छा-आकांक्षा पूर्ण करण्यासाठी स्वतःच्या कुटुंबापासून ते अगदी दुर्मीळ आजाराशी हिमतीने लढण्याची प्रेरणा उम्मल खैरची ही कहाणी देऊ शकते.

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Inspiring success story of ummul kher ias officer who suffered from a rare bone diseases and cracked the competitive exam on her own dha
Show comments