-सिद्धी शिंदे

How Mother Portrayal In Serial Is Disturbing : अलीकडेच ‘मदर्स डे’ होऊन गेला. पाश्चिमात्य देशांत सुरू झालेली ही परंपरा आता भारतातही डोक्यावर घेतली जाते. अर्थात, ज्या आईने स्वतःच्या जिवाची बाजी लावून आपल्या जीवाला जन्म दिला तिचं आईपण साजरं करण्याची कल्पना कुठूनही आली असली तरी ती उत्तमच. पण हे आईपण म्हणजे नेमकं काय? कालानुरूप बदललेल्या गोष्टींमध्ये आईपणाची व्याख्याही बदलली. आणि दुर्दैवाने अन्य गोष्टींमध्ये प्रगती घडत असताना आईपणाची संकल्पना मात्र आणखीनच बुरसट होत गेली. प्राईम टाईमला दाखवल्या जाणाऱ्या काही मालिका, जाहिराती व सिनेमांमधून याचा प्रत्यय अगदी रोज येतो. आईपणाचं मूळ स्वरूप विसरलेल्या अशाच काही मालिकांच्या निर्मात्यांना व प्रेक्षकांना खास आठवण करून देण्याचा हा छोटासा प्रयत्न.

अलीकडेच ‘झी मराठी’वरील चर्चेत असणाऱ्या एका मालिकेत एक सीन पाहिला. ज्यात अमुक एका स्त्री पात्राची आई ही आपल्या लेकीच्या चुका नजरेआड करून तिला अवाजवी मदत करण्यासाठी उपोषणाला बसते असं दाखवलं आहे. यानंतर या आईसाहेबांनी अगदी डोळ्यात पाणी आणून आईच्या मनाचा व हळवेपणाचा उलगडा करण्याचा प्रयत्न केला. आईचं मन हे तिच्या दुर्बळ बाळासाठी तुटतंच, त्याच्या पाठीशी उभं राहण्याचा प्रयत्न करतंच, अशी काही वाक्यं या आईच्या तोंडून ऐकायला मिळाली. मुळात ज्या लेकीसाठी हे सगळं चालू असतं तिला ईर्षा व हव्यास सोडल्यास अन्य कोणत्याही गोष्टीशी घेणं-देणं असेल असं दिसत नाही आणि तरीही तिची आई तिच्यासाठी हळवी होऊन झगडताना दाखवली आहे. या एकूण सीनचा हेतू कदाचित प्रेक्षकांना राग येऊ द्यावा आणि नंतर त्या आईला कशी जाणीव होईल वगैरे दाखवणं असा असावा, पण मुळातच आईपणाच्या नावाखाली हा असा दुबळेपणा बघून कीव येते.

आईपण म्हणजे बाळाच्या सगळ्या चुका पोटात घालणं हा निकषच मुळात चुकीचा वाटतो. उलट चुकांचा आरसा दाखवून बाळाला न्याय समजावणं हे आईचं काम असतं. याचं एक उदाहरण म्हणजे, ‘होणार सून मी या घरची’मधील आई-आजी. लेकाच्या चुकांकडे कानाडोळा करून सुनेला जाच करणाऱ्या सासवांच्या मालिकांमध्ये हे एक पात्र अगदी उजवं ठरलं होतं. मुलाची चूक ही सर्वात आधी आईला कळते, असं म्हणतात. कारण इतर कोणाहीपेक्षा नऊ महिने ती त्या बाळाला जास्त ओळखत असते. अशा वेळी त्या चुकांवर पांघरूण घालून इतरांना दोष देण्याची तुमची एक कृती ही तुमच्याच बाळाला अन्याय कसा करायचा हे शिकवू शकते. बाळाला नेहमी कठोर शिक्षा करा, असं म्हणणं नाही. पण निदान आपलं चुकलंय याची जाणीव त्या बाळाला करून देणं गरजेचं आहे. जेणेकरून भविष्यात या चुका टाळण्याची बुद्धी व समज त्याला येऊ शकते.

आता या चुका काही अगदी भीषण असतील असं नाही. पण ट्रेनच्या प्रवासात, बसमध्ये किंवा इतरही ठिकाणी उद्धटपणे वागणाऱ्या, हट्ट करणाऱ्या मुलांच्या आईलासुद्धा हे लागू होतं. तुमच्या बाळाचा आगाऊपणा हा तुम्हाला गोड वाटत असला तरी त्याचा इतरांना त्रास होत असल्यास त्याला तशी समज देणं गरजेचं आहे. याची पद्धत तुम्हीच ठरवा. यामुळे तुमचं तुमच्या बाळावरचं प्रेम कुठेही कमी होईल असं नाही, उलट तुम्ही एक सुज्ञ व समजूतदार नागरिक बनवू शकता.

मालिका व अगदी खऱ्या आयुष्यातही पाहायला मिळणारी आणखी एक गोष्ट म्हणजे, अनेक आया आपल्या बाळाचा प्रत्येक शब्द झेलला म्हणजे आपण फार महान आई झालो, असं समजतात. बाळाला प्रत्येक गोष्ट देणं हे आईपण नव्हे, तर ती गोष्ट मिळवण्यासाठी सक्षम बनवणं हे खरं आईपण म्हणता येईल. सुदैवाने हा विचार जुन्या पिढीतील आईच्या वागणुकीतून आजवर उत्तमरीत्या दाखवून देण्यात आला आहे. उदाहरणार्थ, याच ‘झी मराठी’वरील आणखी एक मालिका,’यशोदा’.

श्यामच्या आईची कहाणी मांडणाऱ्या या मालिकेत, खरोखरच एक उत्तम आई काय असते हे शिकायला मिळतं. अगदी दाखल्यासह सांगायचं तर, या मालिकेचा एक प्रोमो दाखवण्यात आला ज्यात बयो म्हणजेच श्यामची आई ही आपल्या होणाऱ्या नवऱ्याला असे सांगताना दिसते की, मी माझ्या बाळांना जेवण बनवायलासुद्धा शिकवणार आहे. म्हणजे त्यांचं कधी कुणावाचून अडायला नको. हा लहानसा विचार प्रत्येक आईच्या ठायी रुजायला हवा. कारण भल्याभल्या विचारवंतांनी म्हटल्याप्रमाणे, तुम्ही एखाद्याला पोळी द्याल तर त्याची आजची सोय होईल, पण ती पोळी कशी मिळवायची हे शिकवाल तर त्याची आयुष्याची सोय होईल. आई ही बाळाची पहिली गुरू मानली जाते, त्यामुळे ही शिकवण देणं हे तिच्याच हातात आहे.

हे ही वाचा<< जिनिलीया, चांगली बायको व्हायला आम्ही पण दारुड्या नवऱ्याचा त्रास सहन करायचा का?

आजवर इतिहासात आपण अनेक धन्य माता पाहिल्या आहेत. बाळाला पाठीशी बांधून लढणारी झाशीची राणी, वीर शिवबाला जन्म देणारी जिजाऊ, स्वतःइतकंच इतरांना जपायला शिकवणारी श्यामची आई, हिरकणी, सावित्रीबाई, सिंधुताई आणि अशा असंख्य रूपांतील आईपण हे कणखरतेचं प्रतीक आहे. टीआरपीसाठी हतबल दिसणाऱ्या ‘त्या’ आईच्या रूपाला भुलू नका. उलट तुमच्या बाळासमोर जिद्दीने उभ्या राहिलेल्या, न्यायाने जगणाऱ्या आईचं उदाहरण तयार करा. मैत्रिणींनो, निश्चितच या सगळ्यात प्रसंगी हळव्या व्हा, मोकळ्या व्हा, पण दुबळ्या होऊ नका.

Story img Loader