आज २५ नोव्हेंबर, जगभरात आजचा दिवस “महिला हिंसाचार निर्मूलन दिन’ म्हणून साजरा केला जातो. महिला दिनाच्या दिवशी महिलांच्या हक्कांवर अनेकदा चर्चाही होते. जगातील अनेक देशांमध्ये महिलांना पुरुषांच्या बरोबरीने अनेक अधिकारही मिळाले आहेत. स्त्री-पुरुष समानतेवर अनेक गोष्टी ऐकायला येत असल्या तरी आजही जगभरात अनेक महिला रोज हिंसाचाराला बळी पडताना दिसतात.
हेही वाचा- पालकत्व : इतक्या लवकर मासिक पाळी ?
लोकशाही असो की राजेशाही किंवा हुकूमशाही राजवट, महिला आणि मुलींवरील हिंसाचार, गुन्हे आणि मानवी हक्क उल्लंघनाची प्रकरणे सगळीकडेच बघायला मिळतात. युनायटेड नेशन्सच्या रिपोर्टनुसार, तीनपैकी एक महिला तिच्या आयुष्यात किमान एकदा तरी शारीरिक किंवा लैंगिक हिंसाचार किंवा दोन्ही प्रकारच्या हिंसाचाराला बळी पडलेली आहे. महिलांवरील हिंसाचार संपवण्यासाठीच आंतरराष्ट्रीय स्तरावर एक दिवस स्वतंत्रपणे साजरा केला जातो. यालाच ‘महिलांवरील हिंसाचार निर्मूलन आंतरराष्ट्रीय दिवस’ म्हणून ओळखले जाते. लोकांची विचारसरणी बदलून महिलांना त्यांचे हक्क मिळवून देण्याच्या उद्देशाने दरवर्षी हा दिवस साजरा केला जातो.
लॉकडाऊन काळात महिलांच्या हिंसाचाराच्या प्रकरणांमध्ये वाढ
नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरो (NCRB)ने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, २०२० मध्ये लॉकडाऊन दरम्यान महिला आणि मुलांवर होणाऱ्या गुन्ह्यांमध्ये घट झाली आहे. मात्र, देशात गुन्हेगारी प्रकरणांमध्ये २८ टक्के वाढ झाली. २०२० मध्ये देशात दररोज लैंगिक शोषणाची सुमारे ७७ प्रकरणे नोंदवली गेली. जगभरात महिलांवरील हिंसाचाराच्या तीन लाख ७१ हजार ५३० प्रकरणांची नोंद झाली आहे. २०१९ मध्ये या गुन्ह्यांची संख्या चार लाख पाच हजार ३२६ होती.
महिला हिंसाचार निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस कसा सुरू झाला?
डोमिनिकन रिपब्लिकच्या हुकूमशाहीचा पॅट्रिया मर्सिडीज, मारिया अर्जेंटिना आणि अँटोनियो मारिया तेरेसा या तीन बहिणींनी निषेध केला होता. डोमिनिकन हुकूमशहा राफेल ट्रुजिलो यांच्या आदेशानुसार २५ नोव्हेंबर १९६० रोजी या तिन्ही बहिणींची हत्या करण्यात आली. त्यानंतर १९८१ मध्ये लॅटिन अमेरिका आणि कॅरिबियन फेमिनिस्ट एन्सेन्ट्रोसच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत २५ नोव्हेंबर हा दिवस महिलांवरील हिंसाचाराचा विरोध दर्शवण्यासाठी तसेच त्या तीन बहिणींची जयंती म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. १७ डिसेंबर १९९० रोजी संयुक्त राष्ट्र संघाने हा ठराव पास केला.
हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश काय?
हा दिवस साजरा करण्यामागचा मुख्य उद्देश म्हणजे महिलांवरील हिंसाचार थांबवणे आणि महिलांच्या मूलभूत मानवी हक्कांबद्दल आणि लैंगिक समानतेबद्दल समाजात जागरूकता निर्माण करणे.
हेही वाचा- आता ट्रान्सजेंडर खेळाडूंना महिला क्रिकेटमध्ये बंदी! ICC चा मोठा निर्णय…; काय आहे कारण?
यावेळची थीम काय आहे?
या वेळी २०२२ च्या महिलांवरील हिंसाचार निर्मूलनासाठीच्या आंतरराष्ट्रीय दिनाचे घोषवाक्य ‘एकजूट व्हा! असे आहे. महिला आणि मुलींवरील हिंसाचार संपवण्यासाठी एकता आणि सक्रियता निर्माण करणे यामागचा उद्देश आहे’ ही मोहीम २५ नोव्हेंबरपासून सुरू होणार असून १६ दिवस चालणार आहे. संयुक्त राष्ट्रांच्या अधिकृत वेबसाइटवर याबाबत माहिती देण्यात आली आहे. १० डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिनी याची सांगता होणार आहे.