महिलांवर होणारे अत्याचार हा आजही जगातील विकसनशील देशांसह प्रगत देशांमध्ये संवेदनशील मुद्दा आहे. कधी परंपरांच्या नावाखाली तर कधी धार्मिक चालीरितींच्या नावाखाली महिला आणि मुलींवर अत्याचार होत आहे, त्यामुळे जगातून महिला अत्याचारांचे हे सत्र कधी संपुष्टात येईल हे ठामपणे सांगणे कठीण आहे, त्यामुळे जगातील अनेक देश कितीही प्रगतीच्या शिखरावर पोहोचले तरी महिलांवरील अत्याचार ही एक मोठी समस्या म्हणून कायम आहे. म्हणून दरवर्षीप्रमाणे यंदाही २५ नोव्हेंबर रोजी आंतरराष्ट्रीय महिला हिंसाचार निर्मूलन दिन साजरा केला जातो. या पार्श्वभूमीवर जगभरातील अनेक देशामध्ये महिला अत्याचारासंबंधीत अनेक मुद्द्यांना धरुन लोकांनी आंदोलने केली. यावेळी आपल्या देशातील महिला अत्याचारांच्या घटनांना विविध मार्गाने जाहीर निषेध करण्याचा प्रयत्न केला. यामुळे कोणत्या देशात कशाप्रकारे आंदोलन झाली यावर नजर टाकू या ….

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

युरोप आणि अमेरिकेतील आंदोलक उतरले रस्त्यावर

संयुक्त राष्ट्रांनी जाहीर केलेल्या आंतरराष्ट्रीय महिला हिंसाचार निर्मूलन दिनानिमित्त युरोप आणि अमेरिकेतील अनेक आंदोलकांनी रस्त्यावर उतरून मोर्चा काढला. या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी एक निवेदन जारी करत म्हटले की, “लिंगावर आधारित हिंसाचारामुळे अनेकांना वेदनादायी आणि अन्यायकारक गोष्टींचा सामना करावा लागत आहे. जागतिक स्तरावर अंदाजे तीनपैकी एका महिलेला त्यांच्या आयुष्यात कधीतरी शारीरिक हिंसा, बलात्कार किंवा कोणीतरी पाठलाग करत असल्याचा भीतीदायक अनुभव येत आहेत. ही एक संतापजनक गोष्ट आहे.

“विशेषत: संघर्षभय भागात, महिलांवर होणारे अत्याचार आणि बलात्काराला युद्धाचे शस्त्र म्हणून वापरणाऱ्या गुन्हेगारांच्या हातून असंख्य महिला आणि मुलींना नाहक त्रास दिला जात आहेत.

ग्वाटेमालामध्ये मेणबत्त्यांनी साकारला 438 हा आकडा

ग्वाटेमालामध्ये आंदोलकांनी शुक्रवारी संध्याकाळी स्मरणोत्सव सुरू केला, यावेळी महिला अत्याचाराविरोधात रस्त्यावर उतरलेल्या आंदोलकांनी मेणबत्त्यांनी 438 असा आकडा तयार केला. यातून यावर्षी आतापर्यंत मारल्या गेलेल्या महिलांची संख्या दर्शवत निषेध व्यक्त करण्यात आला.

सॅंटियागोमध्ये ‘एक पाऊल मागे जाऊ नका’ चा नारा

चिलीची राजधानी सॅंटियागोमध्ये शुक्रवारी रात्री सुमारे १००० आंदोलकांनी एकत्र येत महिला अत्याचाराच्या निषेधार्थ “एक पाऊल मागे जाऊ नका” असा नारा दिला आणि महिलांच्या संरक्षणासाठी सरकारने कारवाई करण्याची मागणी केली. दरम्यान एका महिला वकिल समूहाच्या अंदाजानुसार, या वर्षी देशात ४० स्त्रीहत्या झाल्या आहेत.

रिओ दि जानेरोच्या प्रसिद्ध कोपाकबाना बीचवरआंदोलकांनी महिलांच्या चपलांच्या ७२२ जोड्या, २०२२ मध्ये नोंदवलेल्या स्त्रीहत्येचे प्रतिनिधित्व करण्यासाठी प्रत्येक जोडी एका महिलेच्या नावापुढे लावली. ज्यात उंच टाचांच्या चपलांपासून स्नीकर्सपर्यंतचे जोड पाहायला मिळाले. २०१९ नंतर महिला अत्याचाराही ही सर्वाधिक संख्या होती.

अर्जेंटिनामध्ये ब्युनोस आयर्समध्ये भावी अध्यक्ष जेवियर मिलेईच्या निवडीशी संबंधित असलेल्या लोकांसह – निदर्शकांनी पॅलेस्टिनी लोकांच्या समर्थनासह महिलांवरील हिंसाचाराचा एकत्रित निषेध केला.

मायलीमध्ये महिलांवरील अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी प्रभारी महिला, लिंग आणि विविधता मंत्रालय बंद करण्याची सूचना केली आहे. तसेच गर्भपात आणि समान वेतन यासह मुद्द्यांवर कठोर भूमिका घेतली आहे.

महिला हत्येच्या घटनेने इटली हादरली

एका २२ वर्षीय विद्यार्थीनीची कथितपणे तिच्या एक्स प्रियकराने केलेल्या हत्येमुळे हादरलेल्या इटलीमध्ये, सुमारे ५० हजार लोकांनी रोममध्ये निदर्शने केली. जिथे कोलोझियम लाल रंगाने उजळला होता.

दरम्यान पडुआ विद्यापीठातून बायोमेडिकल अभियांत्रिकीची पदवी घेणारी जिउलिया सेचेटिन गेल्या आठवडाभरापासून बेपत्ता होती. या प्रकरणामुळे संपूर्ण देश हादरला. यानंतर तिचा मृतदेह अखेरीस व्हेनिसच्या उत्तरेस सुमारे १२० किलोमीटर (७५ मैल) एका दरीत सापडला, याप्रकरणी तिचा २२ वर्षीय एक्स प्रियकर फिलिपो टुरेटा याला जर्मनीमधून अटक करण्यात आली.

जिउलिया सेचेटिनच्या हत्येच्या घटनेवर २२ वर्षीय ग्रंथपाल लुईसा लॉड्यूसने म्हटले की, “हे वर्ष… आमच्यासाठी फार महत्वाचे अर्थ सांगून गेले… विशेषतः या देशातील ज्यांना सर्व महिलांचे हक्क, दावे आणि मुक्तीची काळजी आहे त्यांच्यासाठी, आणखी एक स्त्रीहत्या…

कुटुंबातील सदस्य आणि प्रियकराकडून बलात्काराचे कृत्य

आंतरिक मंत्रालयाच्या माहितीनुसार, १२ नोव्हेंबरपर्यंत इटलीमध्ये महिला पीडितांच्या १०२ हत्येच्या घटना घडल्या आहेत, त्यापैकी ८२ कुटुंबातील सदस्यांनी किंवा सध्याच्या किंवा एक्स प्रियकराने केल्याचे उघड झाले आहे.

तुर्कीतील इस्तंबूलमधील सिसली जिल्ह्यात सुमारे ५०० स्त्रियांनी एकत्र जमून महिलांवरील अत्याचाराचा जाहीर निषेध व्यक्त केला. पोलीस उभे असतानाही अनेक महिलांनी “आम्ही गप्प बसणार नाही” आणि “महिला संघटित आहेत आणि पुरुषांकडून होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात लढत आहेत” अशा आशयाचे बॅनर झळकावले, यावेळी अंकारामध्येही आंदोलक रस्त्यावर उतरले होते.

“तुमच्या मुलींचे संरक्षण करा, त्यांना शिक्षण द्या”

फ्रान्समध्ये हजारो लोकांनी एकत्र येत महिला हिंसाचाराच्या घटनांचा निषेध केलाय. यावेळी अनेकांनी स्त्रियांचा रंग आणि लैंगिक समानता दर्शवणाऱ्या जांभळ्या रंगाचे कपडे परिधान करुन निषेध व्यक्त केला. पॅरिस आणि इतर शहरांमध्येही कडाक्याच्या थंडीत आंदोलकांनी रस्त्यावर उतरून निषेधाचे बॅनर झळकावले, “फ्रान्समध्ये दर सहा मिनिटाला एक बलात्कार होतो” , “तुमच्या मुलींचे संरक्षण करा, त्यांना शिक्षण द्या”. असे या बॅनर्सवर लिहिले होते.

यावर ऑल ऑफ अस एक्टिविस्ट ग्रुपमधील एक अधिकारी मॅले लेनोईर यांनी पत्रकारांना म्हटले की, आम्ही यापुढे अजून मृत्यू पाहू शकत नाही, त्यामुळे सरकारने महिलांवरील हिंसाचार निर्मूलनासाठी अधिक पैसे खर्च करावे, असे आवाहन त्यांनी केले.

सरकारी आकडेवारीनुसार, फ्रान्समध्ये यावर्षभरात १२१ महिलांच्या हत्या झाल्या आहेत. हीच संख्या २०२२ मध्ये ११८ इतकी होती.

स्ट्रासबर्गच्या पूर्वेकडील शहरात कूच करताना २२ वर्षीय लिओनोर मौनौरी म्हणाली की, या घटनेला प्रभावीपणे सामोरे जाण्यासाठी न्याय प्रणाली बदलणे आवश्यक आहे. लैंगिक हिंसाचार सिद्ध करणे कठीण आहे. अनेक प्रकरणे फेटाळली जातात. या समस्येला सामोरे जाण्यासाठी न्याय व्यवस्था चुकीची आहे, असेही तिने अधोरेखित केले.

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: International day for the elimination of violence against women thousand march across globe to denounce violence against women sjr
Show comments