भारतातील ब्रिटिश उच्चायुक्तालयाशी संबंधितांसोबत राजनैतिक बैठकी; विविध विषयांवरील चर्चांचे अध्यक्षस्थान आणि कितीतरी सोहळ्यांना उपस्थिती. आयुष्यभर स्मरणात राहील असा हा अनुभव ‘ती’च्या गाठीशी बांधला गेला. कारण, ‘ती’ला एक दिवसापुरती का होईना चक्क ब्रिटिश उच्चायुक्त होण्याची संधी मिळाली. या दिवसभरात ती परराष्ट्र व्यवहार व सांस्कृतिक खात्याच्या राज्यमंत्री मीनाक्षी लेखी यांना भेटली, वेस्ट यॉर्कशॉयरच्या मेयर ट्रेसी ब्रॅबिन यांना भेटली आणि विप्रोचे कार्यकारी अध्यक्ष रिशद प्रेमजी यांना भेटण्याची संधीही ‘ती’ला मिळाली ती याच एका दिवसासाठी!
आणखी वाचा : यशस्विनी : दुबईमध्ये योग लोकप्रिय करणारी ‘ती’ आहे तरी कोण?
ब्रिटिश कौन्सिलमधील ‘जेंडर अॅडव्हान्समेंट फॉर ट्रान्सफॉर्मिंग इन्स्टिट्यूशन’सारख्या महत्त्वाच्या प्रकल्पावर काम करणाऱ्यांशी तसेच राजकीय क्षेत्रातील स्त्री नेत्यांना सहाय्य करणाऱ्या ‘शीलीड्स’ प्रकल्पाचे काम करणाऱ्यांशी चर्चेची संधीही जागृतीला मिळाली. भारत सरकारचे प्रधान वैज्ञानिक सल्लागार प्राध्यापक अजयकुमार सूद यांच्यासोबत एका पुस्तकाचे प्रकाशनही ‘ती’ने केले. विज्ञान, तंत्रज्ञान, इंजिनीअरिंग, कला व गणित या क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या ७५ भारतीय महिलांची ओळख करून देणाऱ्या पुस्तकाचे प्रकाशन ‘ती’च्या हस्ते झाले. ‘ती’ला ही सुवर्णसंधी मिळाली ती यंदा घेण्यात आलेल्या एका स्पर्धेच्या माध्यमातून. ११ ऑक्टोबरला साजरा केल्या जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय कन्या दिनाचे औचित्य साधून नवी दिल्लीतील ब्रिटिश उच्चायुक्तालयातर्फे २०१७ सालापासून ही स्पर्धा घेतली जाते. ही स्पर्धा जिंकल्याचे बक्षीस म्हणून ‘ती’ला एका दिवसासाठी भारतातील ब्रिटिश उच्चायुक्त म्हणून काम करण्याची संधी मिळाली.
आणखी वाचा : सुंदर मी होणार : निगा हात आणि पायांची
भारतभरातील २७० तरुण मुलींनी या स्पर्धेत भाग घेतला होता. सार्वजनिक जीवनातील कोणत्या स्त्रीपासून तुम्हाला सर्वाधिक प्रेरणा मिळाली आहे, या प्रश्नाचे उत्तर देणारा एक मिनिटाचा व्हिडिओ स्पर्धकांनी पाठवणे अपेक्षित होते. या सर्व व्हिडिओंमधून लखनौच्या २० वर्षीय जागृती यादव या तरुणीच्या व्हिडिओची निवड करण्यात आली आणि तिला २१ सप्टेंबर रोजी एका दिवसासाठी ब्रिटिश उच्चायुक्तांची भूमिका बजावण्याचा सन्मान प्राप्त झाला. बंगळुरू, चंडीगढ व चेन्नई या शहरांतील ब्रिटिश उच्चायुक्तालयांनीही आंतरराष्ट्रीय कन्यादिनानिमित्त अशाच प्रकारच्या स्पर्धा घेऊन विजेत्या मुलींना एक दिवसासाठी ब्रिटिश उपउच्चायुक्त होण्याची संधी दिली.
आणखी वाचा : नातेसंबंध : नातवंडसुद्धा आजोबा- आजी होणारच ना?
जागृती लखनौची असून तिने नुकतीच दिल्ली विद्यापीठातून कॉम्प्युटर सायन्समधील पदवी संपादन केली आहे. जागृतीला वाचनाची खूप आवड आहे आणि आयुष्याबद्दल दृष्टिकोन देणारी सेल्फ हेल्प प्रकारची पुस्तके ती वाचते. या अनुभवाबद्दल जागृती सांगते, “एक दिवसासाठी ब्रिटिश उच्चायुक्तांचे काम करणे हा बौद्धिकदृष्ट्या समृद्ध करणारा अनुभव होता. माझ्यासाठी हा दिवस संधींनी भरलेला होता. वेस्ट यॉर्कशायरच्या मेयरसोबत तसेच भारतातील स्त्री राजकीय नेत्यांसोबत चर्चा करता आली. ‘शीलीड्स’ या प्रकल्पाच्या लाभार्थींशी संवाद साधणे खूपच प्रेरणादायी होते. ब्रिटनमध्ये लिंगसमानतेसाठी किती प्रयत्न केले जात आहेत हे समजून घेता आले. एक तरुण मुलगी म्हणून वेगळ्या दृष्टिकोनातून हे समजून घेण्याची संधी या दिवसामुळे मला मिळाली. यामुळे माझा आत्मविश्वास वाढला आहे. स्त्रियांच्या समाजातील भूमिकेविषयी मी अधिक निश्चयी व संवेदनशील झाले आहे.”
आणखी वाचा : यशोगाथा : ‘ती’ने केली पोलिओवर मात अन् झाली डॉक्टर!
भारतातील ब्रिटिश उच्चायुक्त म्हणून काम करणारे अॅलेक्स एलिस त्या दिवसापुरते उपउच्चायुक्तांच्या भूमिकेत होते. ते म्हणाले, “हाय कमिशनर फॉर द डे या उपक्रमाची मी दरवर्षी वाट पाहात असतो. भारतातील स्त्रियांच्या प्रतिभेची झलक या निमित्ताने पाहायला मिळते. जागृती खूपच स्पष्ट मते असलेली आणि कामावर लक्ष केंद्रित करणारी मुलगी आहे. स्त्रियांची प्रगती झाल्यामुळे आपली सर्वांची प्रगती होते. यूके व भारत लिंगसमानतेला प्रोत्साहन देण्यासाठी एकत्रितपणे खूप काम करत आहेत. भारतात दिल्या जाणाऱ्या चिवनिंग शिष्यवृत्तींपैकी ५० टक्के यंदा स्त्रियांना देण्यात आल्या याचा मला आनंद आहे.”