मुलींनो, शासनाने काही अटी आणि शर्ती तयार केल्या आहेत. त्यांची पूर्तता केली की ही शिष्यवृत्ती मिळवण्याचा मार्ग सुलभ होतो. या अटी आणि शर्ती पुढीलप्रमाण –

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

(१) शिष्यृत्तीसाठी अर्ज करणाऱ्या मुलीच्या पालकांचं सर्व स्रोतांव्दारे गेल्या वर्षाचे उत्पन्न हे २० लाख रुपयांपेक्षा अधिक नसावे. विद्यार्थी नोकरी करत असल्यास त्याचेही उत्पन्न या मर्यादेत असावे लागते. (विद्यार्थी आणि पालक दोघेही नोकरी करत असल्यास शिष्यवृत्तीचा अर्ज सादर करताना मुलगी आणि पालक यांचे आयकर विवरण पत्र, फॉर्म नंबर १६ आणि तहसिलदार, नायब तहसलिदार किंवा यांच्यापेक्षा वरिष्ठ दर्जाच्या अधिकाऱ्यांनी दिलेले उत्पन्नाचे प्रमाणपत्र सादर करावे लागते. इतर मुलींना मात्र उपरोक्त नमूद श्रेणीच्या अधिकाऱ्यांनी दिलेले, मागील आर्थिक वर्षाचे कुटुंबाच्या उत्पन्नाचे प्रमाणपत्र द्यावे लागते.)

(२) पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थिनींना पदवी परीक्षेत आणि पीएचडी अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थिनीस पदव्युत्तर पदवी परीक्षेत किमान ६० टक्के गुण मिळणे आवश्यक आहे.

(३) पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थिनीचे वय १ जुलै रोजी कमाल ३५ आणि पीएचडी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या मुलीचे कमाल वय ४० असले पाहिजे. दोन्ही अभ्यासक्रम विहीत कालावधीत पूर्ण करणे बंधनकारक आहे.

(४) अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी मुदतवाढ दिली जाणार नाही. हा कालावधी साधारणत: पीएचडीसाठी चार वर्षे, पदव्युत्तर पदवीसाठी दोन वर्षे आणि पदव्युत्तर पदविकेसाठी एक वर्ष असावा किंवा प्रत्यक्ष अभ्यासक्रमाचा कालावधी जो कमी असेल तो, ग्राह्य धरला जातो.

(५)  ही शिष्यवृत्ती कुटुंबातील एकाच सदस्याला फक्त एकदाच दिली जाते.

(६) या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यापूर्वी संबंधित मुलींनी टॉफेल (टेस्ट ऑफ इंग्लिश ॲज फॉरेन लँग्वेज), जीआरई (ग्रॅज्युएट रेकॉर्ड एक्झामिनेशन) या दोन परीक्षा देणे आवश्यक आहे. या परीक्षेतील गुणांचा आधार घेऊन परदेशातील शिक्षण संस्थेत प्रवेश दिला जातो.

(७) अनकंडिशनल ऑफर लेटर (कोणत्याही अटींशिवाय/विनाशर्त प्रवेशपत्र) मिळालेल्या विद्यार्थिनींनाच या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करता येतो. परदेशात जाण्यापूर्वी पासपोर्ट (पारपत्र) आणि व्हिसा मिळवण्याची प्रकिया या दोन्ही बाबी विद्यार्थिनींनाच स्वत: कराव्या लागतात. त्यासाठी संबंधित विद्यार्थिनींना स्वत: खर्च करावा लागतो. ज्या शैक्षणिक संस्थेत आणि अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेला असेल, त्याच कारणासाठी व्हिसा घेणे बंधनकारक असते.

(८) शिष्यवृत्तीमध्ये नियमित अभ्यासक्रमाच्या शुल्काव्यतिरिक्त इतर कोणताही अभ्यासक्रम वा प्रशिक्षणावरील खर्च दिला जाणार नाही. या शिवाय भाषेचे शिक्षण, अभ्यासक्रमाच्या व्यतिरिक्त इतर प्रवास, संशोधन, पूरक शैक्षणिक साहित्य, क्षेत्रीय भेटी, कार्यशाळेतील सहभाग, इंटर्नशिप, संगणक खरेदी यासाठीचा खर्च शिष्यवृत्तीत समाविष्ट  नाही.

कार्यपध्दती

या शिष्यवृत्तीसाठी अर्ज केलेल्या विद्यार्थिनींच्या निवडीसाठी शासनाने कार्यपध्दती निर्धारित केली आहे. अर्ज केलेल्या उमेदवारांची गुणवत्ता यादी तयार केली जाते. ही यादी तयार करताना १० वी, १२ वी , पदवी, पदव्युत्तर पदवी आणि प्रवेश मिळालेल्या संस्थेची THE किंवा QS संस्थेने जाहीर केलेली क्रमवारी लक्षात घेतली जाते. (उदा- एखाद्या उमेदवारास दहावी आणि १२ वी मध्ये ८० टक्क्यांपेक्षा अधिक गुण असल्यास त्याच्या गुणांचे मूल्यांकन प्रत्येकी १०, पदवी परीक्षेत ८० टक्क्यांपेक्षा अधिक गुण असल्यास गुणांचे मूल्यांकन ३० आणि THE किंवा QS ची श्रेणी १ ते ५० असल्यास गुणांचे मूल्यांकन ५० असे केले जाते. याचा अर्थ दोन उमेदवारांना एकाच संस्थेत प्रवेश मिळाल्यास ज्या उमेदवाराचे १० वी, १२ वी आणि पदवीतील गुण हे दुसऱ्यापेक्षा अधिक आहेत आणि त्याच्या गुणांचे मूल्यांकन अधिक होऊन तो किंवा ती गुणवत्ता यादीत वरच्या क्रमांकावर जाईल, त्यांना प्राधान्य मिळेल)

या शिष्यवृत्तीसाठी जाहिरात दिली जाते. साधारणत: एक महिन्याचा कालावधी अर्ज सादर करण्यासाठी दिला जातो. अर्ज ऑनलाइन सादर करावे लागतात. आलेल्या अर्जांतून गुणवत्ता यादीनुसार उमेदवारांची निवड शासनाच्या उच्चस्तरीय समितीमार्फत केली जाते. पीएचडी अभ्यासक्रमासाठी एखाद्या शाखेतील उमेदवार उपलब्ध झाला नाही तर त्या वर्षापुरती ती जागा संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी किंवा पदविका अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांकडून भरली जाते. हेच तत्व पदव्युत्तर पदवी /पदविका अभ्यासक्रमासाठी उमेदवार उपलब्ध झाले नाहीत तर अवलंबले जाते. या जागा संबंधित विषयातील पीएचडी अभ्यासक्रमासाठी दिल्या जातात.

अधिक माहितीसाठी संपर्क – संचालक तंत्र शिक्षण संचालनालय, ३, महापालिका मार्ग, पोस्ट बॉक्स क्रमांक १९६७, मेट्रो चित्रपट गृहासमोर, दूरध्वनी- ०२२-२२६४११५०, मुंबई- ४००००१, http://www.dtemaharashtra.gov.in/

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: International scholarships for women how to study abroad know about process see details kmd